कालच भंडारदऱ्याला आलो..तशी बऱ्यापैकी रात्र झाली..तिथले श्याम - मस्तानी हॉटेल आधीच बुक केले म्हणून बरे झाले..फार पर्यटक आलेत. रात्री जेवलो आणि झोपलो.खोलीचं निरीक्षण करायला आता कुठे वेळ मिळाला सकाळी. आटोपशीर ..स्वच्छ आखीवरेखीव पांढऱ्या शुभ्र भिंती आणि हिरवेगार छप्पर असलेल्या दोन खोल्या..त्याला लागून सुंदर बाल्कनी..एक छान छोटे गोल टेबल आणि तू आणि मीच बसू अशा दोनच खुर्च्या.
खिडकीचा शुभ्र पडदा बाजूला केला..आणि हरवून गेलो.समोर कळसूबाई, रतनगड धुक्यात हरवलेले दिसले..मन हरखून गेलं..जुन्या ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यावेळेस रतनगड चढताना वाटेत पाहिलेली, मनात अजून रेंगाळलेली शुभ्र रान फुले..असतील का ती झाडे अजून तशीच? ...विचार मनात घोळत असतानाच चहाचा घोट घ्यावा म्हणून बाल्कनीच्या उजव्या टोकाकडे, टेबलाकडे वळलो आणि माझे लक्ष या दोन गुलाबाच्या शुभ्र फुलांकडे गेले. थोड्याच वेळापूर्वी इथल्या कर्मचाऱ्याने आणून चहासोबत सजवून ठेवली होती..
मन प्रसन्न झालं..जणू हे गुलाब त्यांच्या रानात असलेल्या भावंडाबद्दल मला वाटणारी हुरहूर कमी करू पहात होते.
आठवणींचे धुके नाहीसे झाले होते..विषाद संपून वातावरणातला प्रसन्न बदल मनात या फुलांच्या रूपाने साठवला आणि रतनेश्वर मंदिराकडे जायला निघालो...निघताना टिपलेला हा प्रसन्न क्षण..खास तुमच्यासाठी.
(काही खरे काही खोटे) म्हणजे
Fakemytrip by Mukund