Friday, July 30, 2021

गंधबोली

गंधबोली

दोन फुले आपसांत

बोलू लागी सुवासात

तुझा माझा सूर जुळे

सुखद ओल्या पावसात

कुणी कधी रोपविले

कधी कुणी दिले पाणी

जगण्यास बळ देण्या

मातीवर ऊन आणि

मग आला धीर जरा

कोंब आला मनासही

भार वाटे जीवनाचा

मातीतल्या मातेसही

उन्ह पाऊस हौसेने

तिचे पुरवी डोहाळे

एक रोप झाले मग

रम्य डहाळे डहाळे

आनंदरंग देऊन गेले

फुलपाखरांचे थवे

नव्या स्वप्नात मातीच्या

फुल जन्मा आले नवे

सुगंध मात्र दिला कुणी

की माय मातीचीच भेट

स्वतः फुलता फुलता

बोले मनाशीच थेट

आहे जीवन जोवर गंध

परस्परांचा भावबंध

आठवातही निरंतर 

दरवळेल  ऋणानुबंध

रचना:मुकुंद इंगळे

Wednesday, July 28, 2021

गाज वेळ


गाज वेळ
मिट्ट काळोखातून अंधार वाट काढत चालला आहे.किनाऱ्यावरून येणाऱ्या वाऱ्याच्या आवाजासोबत समुद्राची गाज ऐकू येते आहे..जणू अहोरात्र सुरू असलेलं एखादं मन. लहानमोठ्या भावनांच्या लाटा उठाव्यात आणि अस्तित्वाच्या किनाऱ्यावर येऊन आदळत रहाव्यात..अपेक्षांची वाळू क्षणभर ओली व्हावी ...आणि लाट ओसरताच कोरडी वाटावी. मी इथेच काठावर पडून असतो...स्वत: "वेळ" असूनही मी कुठेच जात नाही.वाळूतले प्रयत्नांचे प्रवाळ नेहमी नव्याने वाळूत नक्षी काढत असतात.. त्या नक्षीमुळेच दिवसा एखादा वाळूचा कण अभ्रकासारखा चमकत रहातो.मी मात्र रात्रीच्या चंद्रप्रकाशात चमकणारे कण आकाशासोबतच, किनाऱ्यावर देखील शोधतो.किर्र काळोखात दिवस देखील विसावून गेलाय..
मनातल्या अस्वस्थतेच्या सागराची जाणीव होऊ देत...सुखाची भरती असो अथवा दु:खाची ओहोटी... रात्रभर माझ्या सोबत आहे ही गाज. निरखत, ऐकत तटस्थ.. एक एक लाट..!
मुकुंद इंगळे

आठवणींच्या चिमण्या

आठवणींच्या चिमण्या
घरात चुकून शिरलेली चिमणी बाहेर पडण्यासाठी तगमगत असते...अन असे करता करता अनेक कानाकोपऱ्यात फडफडत  जाते…..तसच तू मनात आलीस की असेच करतेस...भुर्रकन येतेस आणि कोणत्याही आठवणींवर क्षणभर बसतेस... आणि लगेच निघून जातेस..

एक चिमणी घरात आली...बुजून जाऊन सांदीत बसली..जाईल बाहेर थोड्या वेळाने. तुझ्या आठवणीसारखी...मनाच्या कुठल्याशा कोपऱ्यातून बाहेर येतेच ती पण

खूप कलकलताहेत आज चिमण्या सकाळी सकाळी... त्यांनी तुला काल इथे पाहिलेलं दिसतंय...नाहीतर इतक्या आठवणीने, आवेगात एकमेकींना दुसरं काय सांगणार

परवा एक चिमणी धिटाईने खिडकीतून आत आली आणि दारातून बाहेर उडून गेली...रोज तुला आठवताना मी मनाच्या खिडकीत एक आठवण ठेवतो...आणि थोड्या वेळाने ती भूतकाळाच्या दरवाजातून दूर उडून गेलेली पहातो.

अंगणातल्या चिमण्यांना मी लपून पहातो.. त्या येतात, दाणे टिपतात आणि कुणाची चाहूल लागली की लगेच पसार होतात..
मी पण आपल्या आठवणींकडे चोरून पाहतो.त्या मनात येतात, नादावतात आणि वर्तमानाची चाहूल लागताच पसार होतात.
मुकुंद इंगळे

विदेहभान

Thursday, July 22, 2021

 

परतवारी

विठ्ठलाच्या डोळा आज आनंदाच्या धारा

स्वतः विठ्ठल होऊन जाई भक्त हा माघारा

आस त्याच्या दर्शनाची काल झाली पुरी

पंढरीचा राया आता राही माझ्या उरी

दिसे ना काही दुजे ना सुचे आता काही

डोळ्यातुन आता फक्त विठ्ठलच वाही

सर्वांथे विठ्ठल झाला एकेक  वारकरी

ज्याच्या त्याच्या मनी वसे देवाची पंढरी

झाली सार्थ देवा माझ्या आयुष्याची वारी

भेटे मज विठू माझा मनाचिये द्वारी

आनंदात विलीन होई आता दिंडी सारी

वारकरी होऊन विठ्ठल करी परतवारी

रचना: मुकुंद इंगळे


Monday, July 19, 2021

गीतांतराच्या गंमती... ना जिया लागे ना

 

गीतांतराच्या गंमती... ना जिया लागे ना

नेमका किती काळ लोटला माहित नाही ..पण कळायला लागल्यापासुन हिंदी गाण्यांचा लळा लाग़ला. आणि आता आता, अगदी अलिकडे सुरु केलेल्या गीतांतरामुळे ग़ाण्याचे शब्द अधिक प्रेमाने जवळ आले.

असेच एक अगदी लोकप्रिय गाणे... ना जिया लागे ना.. “आनंद” मधलं. ग़ाण्यातला विरही मूड पकडुन पहिलं कडवं सुचलं.

ना मन लागेना 

ना जिया लागे ना

तुझ्याविना माझे कुठे मन.. लागेना 

तेरे बिना मेरा कहीं जिया लागे ना

ना.. मन लागे ना...

ना जिया लागे ना

 

विसरले जगणे कुठे आठवत नाही

जीना भूले थे कहाँ याद नहीं
ना जिया लागे ना...

तू भेटलास तेव्हा

स्पंदने जाणवली ही

तुझको पाया है जहाँ
साँस फिर आई वहीं
जीवनी तुझ्या विना ना रुची ना

ज़िन्दगी तेरे सिवा हाय भाये ना
किती सुंदर कल्पना.. माझ्या हृदयाचे धडकणेच जणु तु भेटल्यावर सुरु झाले. त्या आधीचे जगणे जणु जगणेच नव्हते.

त्यानंतर एकच ओळ दोनदाच येते गाण्यात. कडव्यांची शिस्त मोडुन... अतिशय सुंदरशी गाण्यातली जागा आहे तिथे ...  

ना.. मन लागे ना...

ना जिया लागे ना...
प्रिया तुझ्या वेडीला रे ही रहावेना

पिया तेरी बावरी से रहा जाए ना

केवळ “रहावत नाही” हे सांगण्यापुरतीच ही ओळ गाण्यात दोन वेळा ऐकताना कानाला वेगळीच अनुभूती देऊन जाते. हे संगीतकाराची कल्पना कि कवी गुलझार यांची... कल्पना नाही. दोघेही ग्रेटच.

तू जेव्हा जाशी कुठे जाशी कधी

तुम अगर जाओ कभी जाओ कहीं

समयास सांगु काही

वक़्त से कहना ज़रा

थांबुदे तसाच तो ही

वो ठहर जाए वहीं

ते क्षण तसेच राहोत ना वाहोत ना

वो घडी वहीं रहे ना, जाए ना

ना.. मन लागे ना...

ना जिया लागे ना...

 

नंतरचे हे कडवे खुपच खास आणि वेगळे. यात कवीला नेमके काय म्हणायचे ते सहज कळत नाही. तु जेव्हा जेव्हा कुठे जाशील तेव्हा समयास देखिल तसेच थांबायला सांगु.. असा समज होईल असे शब्द आहेत. जे या अर्थाने गाण्याच्या मूडशी विसंगत वाटतात. प्रियकर जर कुठे दुर गेलाय आणि जर काळाला थांबवले तर तो आणखी उशिरा नाही का येणार?

काही सुचेना की असे का लिहिले असेल?

मग असं वाटलं की जेव्हा ती म्हणते आहे की तु कुठे कधी जाशीलचा अर्थ तु माझ्याजवळ आहेसच नेहमी.. कायम...आणि कधी माझ्यापासुन दूर जाण्याची वेळ आली तर काळाला तिथेच थांबायला सांगु..तो क्षण तिथेच थांबुन राहु दे असा अर्थ तिच्या मानसी आणि कवीला अभिप्रेत असावा.

असो. एक सुंदर आनंददायी गाणं ऐकुन खुप समाधान मिळतं एवढं मात्र खरं.

मुकुंद इंगळे

 


Tuesday, July 6, 2021

Gitantar Tu pyar ka sagar hai

 

(चाल:तू प्यार का सागर है)

प्रेमाचा सागर तू..

तुझ्या थेंबाची आस आम्हा

माघारी बोलव तू...

जाऊ सोडून जगास तेव्हा

प्रेमाचा सागर तू…


व्याकुळ मनीचा वेडा पक्षी

भरारीस अधीर किती

कोमल पंख अधू नजर घेउनी

जायचे पैलतटी

आता अम्हा दावीसी ही

चूकली वाट कुठे ते तू


एकीकडे हे जीवनगाणे

तितकेच मरण खरे

कुणास ठाऊक यातील सीमा 

प्रश्न हा फक्त उरे

कानी या दिशा ती सांग

की आलो इथवर कसे ते तू

गीतांतर:मुकुंद इंगळे

Gitantar: Rajanigandha ful tumhare

 

(चाल:रजनीगंधा फुल तुम्हारे)

निशिगंधाच्या तुझ्या फुलांनी

सुगंधित झाले जीवन हे

ओ ss..अशी दरवळे प्रीत प्रियाची

गंधित माझे रे मन हे 


अधिकार माझ्या सजणाचा

हर स्पंदनी जो या नात्याचा

मी बंधनी त्याच्या संगे ही

जाणियले हे गुपित कधी

किती सुखावह बंधन हे


हरेक क्षणी माझ्या नयनी

बस पाहते मी स्वप्ने त्याची

मन सांगे मज मी रंगभरी

एक मेघछाया जणू प्रेमभरी

बरसेन तयाच्या अंगणी मी

©गीतांतर:मुकुंद इंगळे


Gitantar Panthi hu mai us pathaka

 

(चाल:  पंथी हूँ मैं उस पथ का)

पथीक आहे मी, या पंथाचा


अंत नाही ज्याचा


हीच दिशा दुर्दम्य आस अन 


आधार माझ्या मनीचा 

©गीतांतर:मुकुंद इंगळे

Gitantar :fulonke rang se dil ki kalamse

 


रंग फुलांचे, हृदयात लेऊन

लिहिली तुला मनोगते मी...

किती किती कसं काय,

छळतेस नितक्षणी,

सांगू तुला कसे मी....

तरीही स्वप्ने, पाहतो तुझी मी,

तुझ्या आठवणींत होतो मी जागा ...            

तुझ्याच विचारात गुंतून जातो ,

जणू गजऱ्यात गुंफे धागा.. 

हा ..मेघ नि वीज, चंदन नि जलसे

अभंग  प्रेम अपार..

घ्यावे लागतील,जन्म आपल्यास

कितीदा वारंवार..!

गीतांतर: मुकुंद इंगळे


Gitantar : Awaj deke hame tum bulao