Monday, November 28, 2022

वात - चाल


Fakemytrip by Mukund
म्हणजे (काही खरे काही खोटे)
वात - चाल
तिरुवनंतपुरमहून अल्पुषाकडे निघालात की वाटेवर कोचीच्या पुढे पारावूरचा फाटा लागतो.गर्द झाडीत लपलेली घरे हळूहळू दिसू लागतात.आणि एलूर गाव लागते.गावातून पुढे गेल्यावर जवळच हे मंदिर आहे.
खास केरळी पद्मनाभ पद्धतीने बांधलेले हे देऊळ  देवाचे दर्शन घेतानाच अंतर्मुख करते. लाकडी कडीपाटावरील रेखीव कोरीव काम,उंच गाभारा..जवळच एक पुष्करणी . 
देवळाचेही दर्शन घेत आपण बाहेर येऊन बसलो आणि त्या समोरच्या झाडाचे हे दृश्य बघतोय.

चौकोनी नीटनेटका बांधलेला पार, बुंध्याच्या अवतीभवती मातीत उगवलेली काही नवी रोपे आणि एक जुनी समई ..पारंपारिक दिवे..निलाविलाक्कु म्हणतात तिला.
सहज मनात विचार आला.आपल्या पूर्वजांनी किती विचारपूर्वक ही ऊर्जा स्थाने,प्रेरणास्थाने तयार केली आहेत.
देऊळ प्राचीन..झाड जुने.. पार जुनाच पण वेळोवेळी दुरुस्त केलेला.. समई जुनीच..छान काळाची पुटे चढलेली.
पण पहिल्यांदा त्यात वाती चेतवून कुणी तरी डोळ्यात भरणारे दृश्य पाहिले असेल..डोळे भरून ..कित्येक शतकांपूर्वी. आणि आज मी पाहतोय तेच दृश्य ..अगदी तसेच, त्याच पवित्र भावनेने,भरून जाऊन.. भारुन जाऊन.
फरक फक्त वातींचा आहे.आजच्या या वाती जोडतात दोन काळाच्या अंतराचा धागा ..प्रकाशतात आणि उजळतात मनाचा गाभारा. प्रत्येक पिढीच्या वाती नव्या पण ज्योती त्याच..तितक्याच प्राचीन.
आणि मी मलाच दिसतोय...असाच "आत" आणि आतासुद्धा वाती चेतवून याच  वातावरणात,याच जागी असाच निवांत बसलेला...
काही शतकांपूर्वी.
मुकुंद इंगळे

Sunday, November 6, 2022

एका दिवसात दोनदा सेक्युलर

एका दिवसात दोनदा सेक्युलर

(ही फेक ट्रीप नाही तर खरा अनुभव आहे)
ताज पहायला गेलो होतो.तिकिटे आधीच बुक केलेली असल्याने त्या वेळेला तिकीट द्वाराशी पोहोचलो.तिकिटे दाखवली आणि बॅगा, पर्स इत्यादी तपासायच्या रांगेत उभे राहिलो.माझ्या पत्नीच्या पर्समध्ये हनुमान चालीसाचे छोटेसे पुस्तक त्या अधिकाऱ्याला दिसले.त्याने ते सोबत नेण्यास मनाई केली.कारण ताज ही कबर असल्याने तुम्ही ते आत घेऊन जाऊ शकत नाही असे सांगितले.प्रश्न धार्मिक भावनांचा आणि त्या  दुखावण्याचा होता.आम्ही विनंती केली की इतक्या छोट्याशा पुस्तकाने काय फरक पडतो.पण तो ऐकेना.शेवटी त्याला विनंती केली की हे पुस्तक तुमच्या कार्यालयात ठेवा आणि आम्हाला सोडा.त्याने सांगितले की ठीक आहे.त्याने स्वतः ते पुस्तक त्या कार्यालयातील काऊंटरवरील पेपरवेटखाली ठेवले. आम्ही पुढे जाऊन ताज पाहून परत आलो.आणि पुस्तक परत घेण्यासाठी काउंटरवर आलो. आधीचा तपासनीस नव्हता..जो होता तो म्हणाला की असे पुस्तक दिसत तर नाही.तुम्ही आत येऊन बघा हवं तर.आत गेलो पेपरवेटखाली काहीच नव्हते.मात्र खाली पाय ठेवण्यासाठी असलेल्या लाकडी दांडीखाली ते पडलेले दिसले.नशीब आमच्या धार्मिक भावना बळकट असल्याने दुखावल्या गेल्या नाहीत. पुस्तक उचलले आणि आम्ही फत्तेपूर सिक्रीच्या दिशेने निघालो .
फत्तेपूर सिक्रीला महान अकबराचे माहात्म्य समजण्यासाठी गाईड सोबत होता.तिथली कबर का मजार सुंदर सजवलेली होती.डोक्याला रुमाल बांधूनच आत प्रवेश होता. बाहेर गुलाबाची फुले,फुलांच्या चादरी,अत्तर कबरीवर वहाण्यासाठी उपलब्ध होते. बाकी सर्व माहिती,मोगलांचा वैभवशाली(?) इतिहास,जोधाबाईचे स्वयंपाकघर,भिंतीवरील नक्षी इत्यादी गोष्टी दाखवत गाईड एका महालात घेऊन आला आणि एका रिकाम्या कोनाड्याकडे बोट दाखवून म्हणाला हे जोधाबाईचे देवघर.इथे जोधाबाई कृष्णाची पूजा करायची ..सध्या ती मूर्ती आग्र्याला वस्तुसंग्रहालयात आहे... इति गाईड. 75वर्षात मूर्ती परत देवघरात आणाविशी वाटली नाही.75वर्षात फत्तेपूर सिक्री येथील देवघर म्हणून.. सेक्युलर का होईना, प्रसिद्धी करावीशी वाटली.साधी गोष्ट..आता देवघर पाहू..जरा चप्पल बाहेर काढा हे नाही मनात येत गाईडच्या...कारण मी सेक्युलर म्हणून माझ्या कुठल्याच भावना दुखावल्या जात नाहीत.
एका दिवसात आम्ही दोनदा सेक्युलर ठरल्याचे  अपरिमित समाधान सोबत घेऊन आम्ही सिक्री सोडली ...
आणि सोबत होता भारताच्या इतिहासाचा दुर्दैवी विषाद...
मुकुंद इंगळे

Friday, November 4, 2022

अद्वैत

Fakemytrip by Mukund
म्हणजे (काही खरे काही खोटे)
अद्वैत
नांगरेवाडी मागे टाकून येवण्याच्या दिशेने निघाले की 2 किलोमीटरवर, छोटासा कुरांड्याचा घाट लागतो..रस्ता बरा आहे..छोटी छोटी वळणे घेत गाडी पुढे जात असते आणि "घाट संपला" अशी पाटी दिसते त्याच क्षणी हा प्रशस्त काशाचा तलाव दिसतो.गावातल्या काशी विश्वेश्वरावरून हे नाव पडले आहे.मी येतो अधूनमधून..पण गाडीने नाही.. सायकलवरून.
यातल्या कमळांशी गप्पा मारायला.दुरून वाटतात तितकी एकाकी नाहीत ती..दिवसभर आभाळाशी बोलत असतात.
गेलो की गुलाबी पाकळ्या अजून गुलाबी होतात आणि पाण्याच्या तूषारांनी चमकतात.त्यांचे संदेश पाण्यात उमटणारे तरंग माझ्यापर्यंत पोहोचवतात...आणि ती आणि माझे मान तासनतास आवाज न करता बोलत बसतात..त्यांच्या नव्हे..माझ्या सुखदू:खाबद्दल.
एकदा विचारलं त्यांना त्यांच्या कोमेजण्याबद्दल..
म्हणाली नव्या पाकळ्या लेऊन परत उमलतो.
तुम्ही आज आला आहात तर शांतपणे आपले मन काठावर न ठेवता पाण्यात सोडून द्या. बघा एका तरी कमळाचा तरंग त्याला प्रतिसाद देईल.
काय म्हणताय.. लोकं वेडा म्हणतील? हरकत काय.. इथं कोण शहाणं आहे?
फक्त जाताना एक करा..पलीकडे ते वाकलेले झाड दिसतंय ना त्याला सांगा ते खूप सुंदर आहे आणि त्याचे प्रतिबिंब देखील.
मुकुंद इंगळे

Tuesday, November 1, 2022

भग्न मग्न

Fakemytrip by Mukund
म्हणजे (काही खरे काही खोटे) 
भग्न मग्न
दोन वर्षापूर्वी ताज पाहायला गेलो होतो.आधी एकदा बघितला होता..एक कबर छान सुशोभित केलेली..गर्दी होती चांगलीच.मुख्य दरवाजा पासून विद्युत गाडीने तिकीट खिडकीजवळ सोडले आणि तिथून आत आलो.उजवीकडे सुंदर, गुलाबी रंगाचे उत्तम स्थितीत असलेले सज्जे आणि डावीकडे हळू हळू चालत असताना ताज थोडा थोडा दिसू लागला.
मला प्रश्न पडला की तीन चारशे वर्षात या सज्ज्यांच्या भिंती, खांब,खांबासाठी खाली आधाराचे दगड हे झिजले कसे नाहीत? अगदी टकाटक कसे राहिले?
ताज पाहून परत येताना तिथल्या शासनाच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्याला कुतूहल म्हणून हा प्रश्न विचारला.त्याने सांगितले की याची देखरेख आम्हीच करतो. या प्रकारे दगडात कलाकुसर करणारी राजस्थानी कलाकार इथे आहेत.जेव्हा एखादा चिरा,आधाराचा दगड झुकतो,निखळतो तेव्हा अगदी हुबेहूब तसाच बनवला, घडविला जातो आणि जुन्याची जागा घेतो. जुना जबाबदारी पूर्ण करून पुढील प्रवासाला जातो आणि नवा नव्याने वारसा सांगत उभा राहतो.आणि हे सर्व शासकीय काम आहे.
क्षणभर विचारात पडलो...जुन्या सज्ज्याना केवळ "झिजल्यामुळे"बदलता येते.पण कुणा माथेफिरूच्या हातोड्याचे घाव सोसलेल्या मंदिरांचे, कलात्मक मुर्त्यांचे विद्रुपीकरण झाले त्याचे पण नूतनीकरण व्हायला हवे.जिथे शक्य आहे तिथे हे व्हायलाच हवे.
कारण असे करणे म्हणजे नुसती दुरुस्ती नव्हे तर काळाने मूर्ख माथेफिरू मानसिकतेवर घेतलेला सुड ठरेल आणि संस्कृती संवर्धनाची फुंकरदेखील
बरोबर ना..तुम्हाला काय वाटते?
मुकुंद इंगळे