Monday, September 25, 2023

अस्तित्वाची पाकळी

ना जिया लागे ना..एक नितांतसुंदर गीतानुभव

ना जिया लागे ना...!
नेमका किती काळ लोटला माहित नाही ..पण कळायला लागल्यापासुन हिंदी गाण्यांचा लळा लाग़ला. आणि आता आता, अगदी अलिकडे सुरु केलेल्या गीतांतरामुळे ग़ाण्याचे शब्द अधिक प्रेमाने जवळ आले. 
असेच एक अगदी लोकप्रिय गाणे... ना जिया लागे ना.. “आनंद” मधलं. 

ना जिया लागे ना
तेरे बिना मेरा कहीं जिया लागे ना
ना जिया लागे ना

जीना भूले थे कहाँ याद नहीं
ना जिया लागे ना...
तुझको पाया है जहाँ
साँस फिर आई वहीं
ज़िन्दगी तेरे सिवा हाय भाये ना

किती सुंदर कल्पना.. माझ्या हृदयाचे धडकणेच जणु तु भेटल्यावर सुरु झाले. त्या आधीचे जगणे जणु जगणेच नव्हते. 
त्यानंतर एकच ओळ दोनदाच येते गाण्यात. कडव्यांची शिस्त मोडुन... अतिशय सुंदरशी गाण्यातली जागा आहे तिथे ...  
ना जिया लागे ना...
पिया तेरी बावरी से रहा जाए ना 
केवळ “रहावत नाही” हे सांगण्यापुरतीच ही ओळ गाण्यात दोन वेळा ऐकताना कानाला वेगळीच अनुभूती देऊन जाते. हे संगीतकाराची कल्पना कि कवी गुलझार यांची... कल्पना नाही. दोघेही ग्रेटच.
तुम अगर जाओ कभी जाओ कहीं
वक़्त से कहना ज़रा
वो ठहर जाए वहीं
वो घडी वहीं रहे ना, जाए ना
ना जिया लागे ना...

नंतरचे हे कडवे खुपच खास आणि वेगळे. यात कवीला नेमके काय म्हणायचे ते सहज कळत नाही. तु जेव्हा जेव्हा कुठे जाशील तेव्हा समयास देखिल तसेच थांबायला सांगु.. असा समज होईल असे शब्द आहेत. जे या अर्थाने गाण्याच्या मूडशी विसंगत वाटतात. प्रियकर जर कुठे दुर गेलाय आणि जर काळाला थांबवले तर तो आणखी उशिरा नाही का येणार? 
काही सुचेना की असे का लिहिले असेल?
मग असं वाटलं की जेव्हा ती म्हणते आहे की तु कुठे कधी जाशीलचा अर्थ तु माझ्याजवळ आहेसच नेहमी.. कायम...आणि कधी माझ्यापासुन दूर जाण्याची वेळ आली तर काळाला तिथेच थांबायला सांगु..तो क्षण तिथेच थांबुन राहु दे असा अर्थ तिच्या मानसी आणि कवीला अभिप्रेत असावा.
असो. एक सुंदर आनंददायी गाणं ऐकुन खुप समाधान मिळतं एवढं मात्र खरं.
लेखन: मुकुंद इंगळे

Monday, September 4, 2023

Knit नेटके

दर्शनमात्रे मन....

दर्शनमात्रे मन..

प्लॅनिंग सुरू आहे तुमचे..

ती मूर्ती नजरेसमोर येते रिझरवेशन्स..किंवा कार बुकिंग..

.तिथे गेल्यावर उतरायची, राहायची व्यवस्था...ती मूर्ती 

आहेच डोळ्यासमोर..

गर्दी टाळूच शकत नाही...आपण रांगेत उभे राहतो.

देव दर्शनासाठी काहीपण...

अखेर एका रांगेचा भाग होऊन जातो आपण…

तिथे सुद्धा विविध भाव असलेले चेहरे,मंदिर रचना पाहण्यात 

वेळ जातो.

हळूहळू रांग पुढे सरकते..

समोर ती मूर्ती असते (की खरेतर आपण मूर्तीसमोर असतो.)

 डोळे बंद करून आता आतमध्ये फक्त "त्या"ला सामावून घ्यायचे..

फक्त

 "तो" आणि मी..

"तो" आणि मी

असा क्षण मिळावा यासाठी केलेली धडपड...

तो क्षण मिळतो..पण प्रचंड कोलाहलात विरून जातो.

'पुढे सरका'.. एवढाच मंत्रोच्चार ऐकू येतो.डोळे उघडल्यावर 

लक्षात येतं..की आता आपण ढकलले गेलो आहोत पुढे.

आता समोर मूर्ती नाही.

तीर्थाटन संपवून घरी परत .

देवाचं दर्शन झालं का? 

उत्तर हो आहे....पण कुठल्या रुपात?

तुम्ही तिथे हॉटेलवर उतरलात..तिथला मदत करणारा नोकर

रिक्षा केली असेल..तो रिक्षावाला,

जवळच्या दुकानातून मुलांसाठी खाऊ घेतला असेल,

देवळाबाहेर असलेल्या दुकानातून हार,फुले घेतली असतील..

त्या साऱ्यांना देवाचे दर्शन झाले...तुमच्या रुपात,

ते त्यांच्या कर्मयोगामुळे.

घरी परत आल्यावर  आठवा ते तीर्थाटन..

जी पहिली व्यक्ती,गोष्ट,घटना..तुमच्या बंद डोळ्यासमोर 

येईल त्या रुपात तुम्हाला दर्शन झाले होते.

मनातली मूर्ती फक्त निमित्तमात्र.

विश्र्व दर्शनाचा सोहळा "तोच"प्लॅन करतो..तुम्ही फक्त साधन…

आणि साधक.

स्थान महात्म्य म्हणून,

सकारात्मक उर्जेचा प्रसाद मिळावण्यासाठी समर्पित मनाचा नैवेद्य, 

तिथेच जाऊन दाखवावा लागतो.

लेखन:मुकुंद इंगळे

Friday, September 1, 2023

मानसीचा चंद्रवेध तो... तूझे निरंतर लक्ष वेधतो...

मानसीचा चंद्रवेध तो
तुझे निरंतर लक्ष वेधतो 

शास्त्रानुसार चंद्र मनाचा कारक आहे चांद्रयान ३ ने चंद्राबाबत जी माहिती मिळवली ती मनाशी तंतोतंत जुळणारी अशीच आहे.
चंद्रावर यान, लॅन्डर आणि रोव्हर काळजीपूर्वक, योजनाबद्ध उतरवावे लागले.
मनात उतरताना देखील अशी काळजी घ्यावी लागते नाहीतर मनातून कायमचे उतरावे लागते.
चंद्रावरील मातीतील
असंख्य घटकांपैकी काहींचे  पृथःकरण करून झाले आहे.त्या मातीत पाणी आढळले.
मनात सुद्धा ओलावा असतोच की.
मनाच्या देखील काहीच घटकांचा अभ्यास झाला आहे..
कारण चंद्राप्रमाणे मनाचीही
एक बाजू कायम अंधारात असते.
चंद्राप्रमाणे मनात देखील अहंकाराची विवरे आणि
मी पणाच्या (रिकाम)टेकड्या असतात.
चंद्राला पृथ्वी शिवाय अस्तित्व नाही... मनालाही शरीराशिवाय स्वतंत्र अस्तित्व नसते.
चंद्रावर वातावरणाचा अभाव आहे.
मन देखील ज्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावात येते तसे फिरत राहते.. 
स्वतः भोवती आणि त्याच्याभोवती.
एकूण काय...तर मनावर देखील भावनेचा "विक्रम" आणि बुध्दीचा "प्रग्यान" योजनाबद्ध अवतरला असेल तर माणूस मनाच्या जोरावर चंद्रच काय...कोणत्याही ग्रहावर जाऊ शकतो.
दुसऱ्याबद्दलचा पूर्वग्रह सोडता ...
लेखन:मुकुंद इंगळे