Friday, June 21, 2024
संगीत
Tuesday, June 18, 2024
थेंब अस्तित्वाचा
चित्र वेध (चित्र सौजन्य:श्री प्रकाश पिटकर)
थेंब अस्तित्वाचा
सुंदर पावसाळी हवा आहे...हिरव्यागार रमणीय परिसरात...पण जंगलात दूर कुठेतरी..कधीतरी.. एका डोंगराच्या उतरंडीवर रुजलेले हे झाड..त्याची नाजूक फांदी आणि त्या नाजूक फांदीवर चार फुलांना चैतन्य देत ओघळणारा सुंदर थेंब..."या" नेमक्या क्षणी टिपलेला...मी.
खूप उंचीवरून ..ढगातून मी पावसाचा होऊन खाली आलो.आम्ही खूप जण होतो. लंपनच्या (संदर्भ वनवास: लेखक प्रकाश संत)च्या भाषेत....साडे सत्तावन कोटी थेंब होतो. वेगाने वेड्यासारखे फक्त आयुष्यभर वहात राहिलो. झाडांचे बुंधे,विविध आकारांचे दगड,कातळ ..कधी धबधबे होऊन कधी नदी होऊन तर कधी ओढा.
असंच वाहताना या झाडावर आलो... वाहणे संपून ओघळणे सुरू झाले.पुढच्या क्षणी काय? पुनर्जन्म की परत वहात राहणे.
नीट विचार केला तर लक्षात येईल..मानवी आयुष्याचा प्रवास या थेंबाने केलेला आहे..आयुष्यभर चारी दिशांना चैतन्य देऊन प्रवाहित राहिला आणि आता "तो" क्षण आलाय...
मातीत पडला तर झिरपून जाईल...उन्हात एक क्षण चमकून वाफ होऊन जाईल... न जाणो खाली डोह असला तर त्या पाण्याशी एकरूप होऊन जाईल...जे काही होईल ते पुन्हा नवे अस्तित्व धारण करण्यासाठीच.
थेंबात चैतन्य असते. चैतन्याचा कधी लोप होत नाही.
लेखन: मुकुंद इंगळे
Sunday, June 16, 2024
इंद्रधनुष्य
चित्र वेध (चित्र सौजन्य:श्री प्रमोद ओरपे)
इंद्रधनुष्य
मस्त ढगांनी आच्छादलेली होऊ घातलेली ओलसर संध्याकाळ...किंवा सकाळ.
आकाशात अवतरलेले नितांत सुंदर इंद्रधनुष्य...सृष्टीच्या सृजनशीलतेने गाठलेला परमोच्च सौंदर्य क्षण. वाहता वारा,कोणत्याही स्वरूपाचा पाऊस,प्रकाश,अंधार,सागर,नद्या,डोंगरदऱ्या,
सुर्य,चंद्र,तारे आणि असिमित असणारे... कधी आकाश तर कधी आभाळ अन असंख्य आकाशगंगा....
या विश्व पसाऱ्यात आपल्या सूक्ष्म बिंदुरुप पार्थिव अस्तित्वाची जाणीव करून देणारे वास्तव...पण त्याच क्षणी या सर्व गोष्टी बघण्याची,अनुभवण्याची, कुवतीप्रमाणे जाणून घेण्याची क्षमता असलेले आपले मन...कधी कधी कुतूहल,उत्सुकता या पलीकडे जाऊन फक्त निवांतपणे अनुभवते...असे ते हे इंद्रधनुष्य.
पण ते दिसायला योग्य कोन तयार व्हावा लागतो..
पाण्याचे हवेतील सूक्ष्म थेंब आणि पाहणाऱ्याच्या पाठून येणारा सुर्य प्रकाश यांच्या संयोगाने सप्तरंगात ते फक्त दिसते.. कधीतरी दिसते.
पाण्याच्या थेंबांसारखी असंख्य माणसे आयुष्यात येतात. काळाच्या आभाळात अनुभवाचा सोबत पण पाठीमागून येणारा प्रकाश सर्वांवर पडतो. आपला दृष्टीकोन योग्य असला की ती व्यक्ती इंद्रधनुष्य होऊन आपल्याच मनावर,मनात सप्तरंगात उमटते...तशीच रहाते.
आकाशातील इंद्रधनुष्य मनाला आनंद देते ..माणसातील इंद्रधनुष्य आनंदाला मन देते.
लेखन:मुकुंद इंगळे
Friday, June 14, 2024
DeLIGHTfully yours
DeLIGHTfully yours
Take it lightly..this is a bulb
DELIGHTfully reflecting ur happiness.
The phase of happines is directly connected to ur face.
The more happy u r...coil will radiate that much brightly. (U can check it right now)
This applies not only to this bulb but to all...who are wired to GLOBE..right now.
The uninterrupted power is provided by mind... the power station exists inside with n numbers of charged CELLs.
This happens only because happiness is the FEELament used ..that glows every moment..making it bright,brighter,brightest
Concept and creation
By Mukund Ingale
Sunday, June 9, 2024
चेहरे "चाळ"तांना..
चेहरे ' चाळ 'तांना
चाळीचा फार थोडा भाग...दोन मजले .. पहिला आणि दुसरा इतकेच दिसताहेत. चाळ जुनी असावी ..पण अजून तरी राहण्यायोग्य असावी. वरच्या वीतभर पत्र्यावर किंचितसे आभाळ रेलले आहे एक झाडाच्या सोबतीने...एका खोलीच्या आजूबाजूचा रंग ..गडद हिरव्या पोपडे पडलेल्या खोलीच्या रंगापेक्षा ताजा,अलिकडला.. तरी साधारण वीसेक वर्षांपूर्वीचा असावा.. चाळीचे कठडे देखील जुने पुराणे.. स्वतः कसेबसे तग धरून उभे आहेत असे वाटणारे.
पाहताक्षणी लक्षात येईल अशी एकच गोष्ट आहे...वेगवेगळ्या दोऱ्यांवर वाळत घातलेले निरनिराळ्या रंगाचे कपडे.जणू चाळीचा चेहरा म्हणजे हे कपडे.
खरं तर प्रत्येकाचा चेहरा पूर्वी या चाळीसारखा होता..असावा.चालिरीतींच्या खोल्यात बालपण विहरत जाता जाता मित्र,नातेवाईक इत्यादी व्याप वाढत गेले असतील पण मनाची खोली चांगली असल्याने काही अडचण नाही आली.दैनंदिन वापराचे आणि मिरवायचे कपडे घेतले गेले असतील...ते विचारही असेच वाळत घातले जात असावेत. पाहणाऱ्याला,संपर्कात आलेल्याला ते स्वच्छ दिसतील...जुने असले तरी जीर्ण नाहीत, टाकण्याजोगे नाहीत हे खरे असले तरी कपडे पाहणाऱ्यांची नजर महत्वाची.संस्कारांचे कठडे आणि नातेसंबंधाच्या दोऱ्या हे विचारांची वसने वेगळ्या दिशांच्या दोरीच्या "ओढीने " सांभाळत असतात. हळु हळु तेच चेहरा बनून जातात.वाळत घातलेल्या कपड्याआड चाळ इतकी झाकली जाते की.. ते कपडेच तिचा चेहरा..ओळख होऊन जातात.
विचारांची रंगीत वस्त्रे रंग माणसाच्या चेहऱ्यावर वाळत घातलेली दिसू लागतात.
वैधानिक इशारा: मात्र कधी कधी चाळीतल्या खोलीत उभ्या असणाऱ्या माणसाला समोरचे दिसत नाही.वाळत घातलेले कपडे...नव्हे विचार आड येऊ शकतात.
लेखन:मुकुंद इंगळे
Saturday, June 8, 2024
ये दिल और उनकी...
ये दिल और उनकी..
हा डोंगर प्रत्येक क्षणी असाच असतो..दिसतो.कधी कसा तयार झाला..तारीख वेळ याची काही नोंद नाही. तो फक्त असतो...स्थिर आणि असाच प्रत्येक क्षणी...आपण पाहू तेव्हा.
मात्र बदलते ते त्याचे रूप.
उन्हाळ्यात कोरडा...करडा..
पावसाळ्यात हिरवागार.. ओलावलेला..
थंडीत धुक्याने आच्छादलेला...
पण तो असतो इथेच..असाच काहीही न करता ..फक्त असतो.त्याची रूपे बदलण्याचे काम ऋतू करतात...त्याच्या वरून वहात जात मुशाफिरी करणारे ढग करतात.तो फक्त त्यांना अंगाखांद्यावर खेळू देतो आणि त्यांच्यावरील स्नेहापोटी त्यांना प्रतिसाद देतो.ढगांशी डोंगराचे वेगळेच नाते असते.
आपलं मन देखील असाच एक अविचल,निश्चल डोंगर असेल का? वरकरणी पाहता निष्क्रिय वाटणारं पण..
ये दिल और उनकी, निगाहों के साये
मुझे घेर लेते, हैं बाहों के साये...या गाण्यासारखं .
आयुष्यात बदलत जाणाऱ्या सुख दुःखाच्या ऋतुंमध्ये आनंद अन् वेदनेच्या ढगांनी वेढले जाऊन,त्यांच्या सावलीत रूप पालटणारं .त्याला प्रतिसाद देणारं ..कधी रुक्ष तर कधी हिरवं होणारं..कधी नापीक तर कधी कोवळे कोंब,धूमारे फुटलेलं ...
आणि अनुभवांच्या हिवाळ्यात निवृत्तीने नित्य आच्छादलेले.
ढगांशी डोंगराचे वेगळेच नाते असते
लेखन: मुकुंद इंगळे