Friday, November 8, 2024

Relationshop

*Relationshop
चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

या..आज तुम्हाला माझे आयुष्याचे दुकान दाखवतो.हा इथे असा मी एकटाच बसून असतो...वाचत राहतो..ही जुनी पुस्तकं..ही सर्व पुस्तके म्हणजे जणू आयुष्यात आलेली माणसं...का भेटली या निमित्ताचे बंधन नाही.वेगवेगळ्या आवरणात,कमी अधिक पानांची..रंगीबेरंगी...कधी एकटी कधी समूहाने. प्रत्येकाचा विषय वेगळा.
आणि त्यांच्यासोबत जपलेली जुनी नाती.नातं नवं नसतंच कधी..ज्याक्षणी निर्माण होतं..त्या क्षणी ते जुनं होतं.
कुणी पुस्तके घेऊन आलंच तर उतरतो खाली...आणि त्या पुस्तकांना तोलून मापून  झाल्यावर त्यांना बरेचदा बंधमुक्त करून याच कपाटात ठेवतो. जी बंधनात दिसतील ती नाती विस्कळीत करून न चालणारी.
दिसताना दिसतील सगळी कशीही कुठेही ठेवल्यासारखी...पण माझ्या लक्षात असतं ना सगळं.
कधीतरी कुणीतरी नुसतंच येऊन माझी पुस्तके चाळत रहातात..त्यात रमतात. त्यांच्या स्नेहाच्या बदल्यात माझ्याशी नातं जोडून जुनं नातं घेऊन जातात.
आणखी काही गोष्टी जुन्याच दिसतील इथे...चार दिशांचा वारा देणारा पंखा...अजून एक वर ठेवलाय तो पूर्वीचा...माझ्या वडिलांनी खूप वर्षे वापरला तो...पण सांभाळतो मी त्याला.
हे हेल्मेट..दुकानात येताना बाईकवरून येतो...ते हे थोरामोठ्यांच्या आशिर्वादाचे हेल्मेट घालून.
एक निळ्या ताडपत्रीची वळकटी आहे वर जपून ठेवलेली...
ऋणानुबंधांची... पावसापाण्यात सर्व पुस्तकं सुरक्षित ठेवण्यासाठी वापरतो मी.
आणि एक जीवन परिपूर्ण जगण्याची तहान भागवण्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत...
या दुकानात असताना या पलीकडे काहीही लागत नाही.
असा एकेक दिवस जातो माझा...या पुस्तकांच्या गर्दीत..त्यांच्या सहवासात.. नात्यांच्या भांडारात..
स्वतःला शोधण्यात.
 *लेखन: मुकुंद इंगळे*

Thursday, November 7, 2024

ऋतुचक्र

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
ऋतुचक्र 
जाग आली तेव्हा मनाच्या किनाऱ्यावर विचारांची वर्दळ नव्हती. स्वप्नांच्या काही चांदण्या जाणिवेच्या सागरातील पाण्यावर अजूनही चंद्रासवे परावर्तित होऊन तरंगत होत्या.थोड्या वेळाने जातील त्या ..प्रकाश किरणे येतील तेव्हा.
या अंधाराला एक छानशी ऊब आहे...रात्री मिट्ट काळोखात पाहिलेल्या स्वप्नाची..रोज दिसतात वेगवेगळी स्वप्नं..चांदण्यात लपेटलेली...कुणीतरी रोज त्यांना आणून चंद्रावर ठेऊन जातं आणि नंतर एकेक करून ती माझ्या नजरेत...नजरेसमोर तरंगत रहातात...तशीच अस्पर्श.
अथांग पसरलेला मी मग फक्त जाणिवेतून कालक्षणाच्या लाटांवर लहरत राहतो... किनाऱ्यावर झिरपत रहातो.
एकेका स्वप्नाकडे पहात...
म्हणून वरून वाटला तरी किनारा कधीच कोरडा नसतो...लाख स्वप्ने फुलवणारी ओल आकाशाच्या ओढीने त्यात भिनलेली असते.नवी स्वप्ने तयार होत रहातात...
क्षणोक्षणी किनारा आकाशाशी विलक्षण ओढीने जोडला जात असतो..
ऋतूचक्र सुरूच राहते... 
लेखन:मुकुंद इंगळे

Tuesday, November 5, 2024

प्रकाशाच्या सावल्या

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

प्रकाशाच्या सावल्या

सगळीकडे अनामिक अथांग अंधार पसरला आहे.आत आणि बाहेर विश्र्वामध्ये.. 

आत पाहिले तरच बाहेरच्या अंधाराच्या आणि स्वतःच्या मनाच्या अस्तित्वाची जाणीव होते.

असंख्य आकाशगंगा,ग्रह तारे यांनी व्यापलेली अगणित विश्वे असतील...तितकीच मनात आहेत..अंधाराने जोडली गेलेली...

आणि जिथे सूर्य आहेत तिथे फक्त प्रकाश निर्माण होतो आहे..

कधी बारा राशीतून फिरताना तर कधी बारा महिन्यांची तावदाने असलेल्या माझ्या मनात राहताना.

सूर्याचा प्रकाश जिथे पोहोचतो तिथून तो परावर्तित होतो..काही कवडसे मनापर्यंत देखील येतात आणि त्यांच्या क्षमतेएवढाच उजेड उजळतो मनाला.

न उजळलेला असिमित अंधार माझी क्षमता आहे... मनाचे सर्व कोपरे उजळवण्याची आस कुतूहलाच्या अगणित छिद्रांवर अवलंबून आहे ज्यातून जिद्दीचे झोत आतवर पोहोचतात....आणि सावल्यांची पण जाणीव करून देतात.

अंधार आणि प्रकाशाच्या खेळात तयार होणाऱ्या काळाच्या सावल्यांमधेच आत मी आणि बाहेर विश्व..दोघेही रमून जातो...तितकीच असते माझ्या अस्तित्वाची जाणीव...आणि माझ्यापुरती विश्वाची जाणीव.

लेखन:मुकुंद इंगळे