Sunday, January 26, 2025

कुंपणावरची मधमाशी

कुंपणावरची मधमाशी

परवा एका आगळ्या वेगळ्या मंदिरात जायचा योग आला.नव्याने उभारलेल्या त्या मंदिरातील बालदेवता तिथे सहज वावरत होत्या आणि त्यांची योग्य मानसपूजा करणारे गुरुजन प्रसन्न मुद्रेने,आईच्या वात्सल्याने आपल्या देवतांना मायेची ऊब देत होत्या.

सुशिक्षा....स्वमग्न मुलांमध्ये प्रगती घडवून त्यांना अधिक सक्षम करणाऱ्या संस्थेची नवी शाखा ठाणे येथे सुरू झाली..त्या वास्तूला भेट देण्याचा योग आला.

मुलांच्या आवश्यकतेनुसार वर्गांची सुयोग्य रचना केलेली वास्तू ....त्यांना उमजेल अशा चित्र भाषेत तयार केलेली भित्तीचित्रे...प्रत्येक भिंतीवर विषयानुरूप केलेली कलात्मक सजावट...मुलांसाठी आयोजित केलेले नावीन्यपूर्ण खेळ...म्हणजे त्यांना कुंपणपलिकडे असलेल्या आकाशाची ओळख करून देण्यासाठीचे तुमचे प्रयत्न..

(तिथेच एका भिंतीवर असलेल्या त्रिमित लाकडी कुंपणावर चिकटवलेले एक मधमाशी...मनात अजून भिरभिरते आहे)

सुशिक्षाच्या गुरुजनांपैकी प्रत्येकाचे खास अभिनंदन.तुम्ही सर्वजण या मधमाशी सारखे निरंतर कार्यरत आहात.

ज्या निष्ठेने,प्रेरणेने हे कार्य सुरू झाले...आणि वाढत राहिले,त्या मूळ प्रेरणेचा स्त्रोत अजूनही आम्हाला तुमच्यामध्ये वाहताना दिसला.

तुमचं सर्वस्व ..म्हणजे तुम्ही आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आनंदात केलेली आपल्या प्रयत्नांची गुंतवणूकच जणू.

सुशिक्षाजनहो.. आपणा सर्वांना मनापासून सलाम..फार मोठे कार्य तुमच्या हातून घडते आहे..घडत राहो या शुभेच्छा.

या कार्यक्रमासाठी, वास्तूसाठी,वस्तुरचनेसाठी ,सजावटीसाठी..ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांचे आभार आणि अभिनंदन.

लेखन:मुकुंद इंगळे 

Tuesday, January 21, 2025

अम्लान

चित्र वेध 
(चित्र सौजन्य:अनामिक)
अम्लान 
गेली कित्येक वर्षे ही सुंदर ताज्या मनमोहक चाफ्याने भरलेली परडी अशीच आहे..माझ्या मनात.
आठवणीतल्या...तुझ्या माझ्या अगणित न झालेल्या भेटीत...पण तुझ्या फक्त दर्शनाने फुललेल्या आठवांचा चाफा...
तुला आठवतं का...सुट्टी लागली की तू तुझ्या काकांकडे यायचीस...माझ्या घरावरूनच त्यांच्याकडे जाणारी वाट होती...तू तिथूनच त्यांच्याकडे जायचीस....सुट्टीत रमायचीस...गावातल्या मैत्रिणींसोबत उनाडायचीस..
आणि काही दिवसांनी त्याच वाटेने कुठल्याशा गावात की शहरात परत जात असावीस.
त्या वाटेवर एक तळे होते. तळ्याच्या काठावर अनेक चाफ्याची झाडे होती.
तू आल्यावर ..तुला पाहिल्यावर त्या चाफ्याचा गंध थेट मनात पसरत असे.
जितके दिवस तू असायचीस तितके दिवस चाफा दिवसरात्र फुलत असायचा...आपली नजर भेट गंधित व्हायची अधून मधून..पण बोलणं झालं नाही कधी...
माझ्या मनातलं सगळं,चाफ्याची फुले तुझ्याशी गंधबोलीतून तुला सांगायची.. शब्दात कधी ते उतरवता आलंच नाही...मलाही आणि ..तुलाही.
अशीच एक सुट्टीच्या काळात तू आली होतीस..तुझ्या आठवणींच्या झाडाखाली ... तळ्याकाठच्या देवळात बसलो होतो.त्या दिवशी तू परत जाणार होतीस...पुढच्या मे महिन्यापर्यंत डोळ्यांना कोरड पडणार होती. तू अचानक समोर आलीस..तुझ्या हातात एक चाफ्याचे फुल होते. क्षणभर वळून माझ्याकडे पाहिलेस..आणि हात उंचावून ते मला दाखवलेस ..आणि समोरच्या मूर्तीला वाहीलेस... अन् निघून गेलीस.
त्या फुलाच्या गंधाने मनाचा गाभारा भरून गेला होता...मी उठलो..ते फुल डोळे भरून पाहून घेतलं...त्या सुगंधित क्षणांच्या परडीत आधीची नजरबंद अम्लान फुले देखील होती.
इतकी वर्षे झाली...त्या क्षणांची परडी अजूनही टवटवीत,प्रफुल्लित चाफ्याच्या फुलांनी भरलेली आहे.
जिथे कुठे तू असशील तिथे या क्षणी चाफ्याचा सुवास तुझ्या आजुबाजूस दरवळेल...
या क्षणी...
याच क्षणी
लेखन: मुकुंद इंगळे