Saturday, October 23, 2021
Friday, July 30, 2021
गंधबोली
गंधबोली
दोन फुले आपसांत
बोलू लागी सुवासात
तुझा माझा सूर जुळे
सुखद ओल्या पावसात
कुणी कधी रोपविले
कधी कुणी दिले पाणी
जगण्यास बळ देण्या
मातीवर ऊन आणि
मग आला धीर जरा
कोंब आला मनासही
भार वाटे जीवनाचा
मातीतल्या मातेसही
उन्ह पाऊस हौसेने
तिचे पुरवी डोहाळे
एक रोप झाले मग
रम्य डहाळे डहाळे
आनंदरंग देऊन गेले
फुलपाखरांचे थवे
नव्या स्वप्नात मातीच्या
फुल जन्मा आले नवे
सुगंध मात्र दिला कुणी
की माय मातीचीच भेट
स्वतः फुलता फुलता
बोले मनाशीच थेट
आहे जीवन जोवर गंध
परस्परांचा भावबंध
आठवातही निरंतर
दरवळेल ऋणानुबंध
रचना:मुकुंद इंगळे
Wednesday, July 28, 2021
गाज वेळ
आठवणींच्या चिमण्या
Thursday, July 22, 2021
परतवारी
विठ्ठलाच्या डोळा आज आनंदाच्या धारा
स्वतः विठ्ठल होऊन जाई भक्त हा माघारा
आस त्याच्या दर्शनाची काल झाली पुरी
पंढरीचा राया आता राही माझ्या उरी
दिसे ना काही दुजे ना सुचे आता काही
डोळ्यातुन आता फक्त विठ्ठलच वाही
सर्वांथे विठ्ठल झाला एकेक वारकरी
ज्याच्या त्याच्या मनी वसे देवाची पंढरी
झाली सार्थ देवा माझ्या आयुष्याची वारी
भेटे मज विठू माझा मनाचिये द्वारी
आनंदात विलीन होई आता दिंडी सारी
वारकरी होऊन विठ्ठल करी परतवारी
रचना: मुकुंद इंगळे
Monday, July 19, 2021
गीतांतराच्या गंमती... ना जिया लागे ना
गीतांतराच्या गंमती...
ना जिया लागे ना
नेमका किती काळ लोटला माहित नाही ..पण कळायला
लागल्यापासुन हिंदी गाण्यांचा लळा लाग़ला. आणि आता आता, अगदी अलिकडे सुरु केलेल्या गीतांतरामुळे ग़ाण्याचे शब्द अधिक
प्रेमाने जवळ आले.
असेच एक अगदी लोकप्रिय गाणे... ना जिया लागे ना..
“आनंद” मधलं. ग़ाण्यातला विरही मूड पकडुन पहिलं कडवं सुचलं.
ना मन लागेना
ना जिया लागे ना
तुझ्याविना
माझे कुठे मन.. लागेना
तेरे बिना मेरा कहीं
जिया लागे ना
ना.. मन
लागे ना...
ना जिया लागे ना
विसरले जगणे
कुठे आठवत नाही
तू भेटलास
तेव्हा
स्पंदने
जाणवली ही
त्यानंतर एकच ओळ दोनदाच
येते गाण्यात. कडव्यांची शिस्त मोडुन... अतिशय सुंदरशी गाण्यातली जागा आहे तिथे ...
ना.. मन
लागे ना...
पिया तेरी बावरी से रहा जाए ना
केवळ “रहावत नाही” हे सांगण्यापुरतीच ही ओळ गाण्यात
दोन वेळा ऐकताना कानाला वेगळीच अनुभूती देऊन जाते. हे संगीतकाराची कल्पना कि कवी गुलझार
यांची... कल्पना नाही. दोघेही ग्रेटच.
तू जेव्हा जाशी कुठे जाशी कधी
तुम अगर जाओ कभी जाओ कहीं
समयास सांगु काही
वक़्त से कहना ज़रा
थांबुदे तसाच तो ही
वो ठहर जाए वहीं
ते क्षण तसेच राहोत ना वाहोत ना
वो घडी वहीं रहे ना, जाए ना
ना.. मन लागे ना...
ना जिया लागे ना...
नंतरचे हे कडवे खुपच खास आणि वेगळे.
यात कवीला नेमके काय म्हणायचे ते सहज कळत नाही. तु जेव्हा जेव्हा कुठे जाशील तेव्हा
समयास देखिल तसेच थांबायला सांगु.. असा समज होईल असे शब्द आहेत. जे या अर्थाने गाण्याच्या
मूडशी विसंगत वाटतात. प्रियकर जर कुठे दुर गेलाय आणि जर काळाला थांबवले तर तो आणखी
उशिरा नाही का येणार?
काही सुचेना की
असे का लिहिले असेल?
मग असं वाटलं की जेव्हा ती म्हणते
आहे की तु कुठे कधी जाशीलचा अर्थ तु माझ्याजवळ आहेसच नेहमी.. कायम...आणि कधी माझ्यापासुन
दूर जाण्याची वेळ आली तर काळाला तिथेच थांबायला सांगु..तो क्षण तिथेच थांबुन राहु दे
असा अर्थ तिच्या मानसी आणि कवीला अभिप्रेत असावा.
असो. एक सुंदर आनंददायी गाणं ऐकुन खुप समाधान
मिळतं एवढं मात्र खरं.
मुकुंद इंगळे
Tuesday, July 6, 2021
Gitantar Tu pyar ka sagar hai
(चाल:तू प्यार का सागर है)
प्रेमाचा सागर तू..
तुझ्या थेंबाची आस आम्हा
माघारी बोलव तू...
जाऊ सोडून जगास तेव्हा
प्रेमाचा सागर तू…
व्याकुळ मनीचा वेडा पक्षी
भरारीस अधीर किती
कोमल पंख अधू नजर घेउनी
जायचे पैलतटी
आता अम्हा दावीसी ही
चूकली वाट कुठे ते तू
एकीकडे हे जीवनगाणे
तितकेच मरण खरे
कुणास ठाऊक यातील सीमा
प्रश्न हा फक्त उरे
कानी या दिशा ती सांग
की आलो इथवर कसे ते तू
गीतांतर:मुकुंद इंगळे
Gitantar: Rajanigandha ful tumhare
(चाल:रजनीगंधा फुल तुम्हारे)
निशिगंधाच्या तुझ्या फुलांनी
सुगंधित झाले जीवन हे
ओ ss..अशी दरवळे प्रीत प्रियाची
गंधित माझे रे मन हे
अधिकार माझ्या सजणाचा
हर स्पंदनी जो या नात्याचा
मी बंधनी त्याच्या संगे ही
जाणियले हे गुपित कधी
किती सुखावह बंधन हे
हरेक क्षणी माझ्या नयनी
बस पाहते मी स्वप्ने त्याची
मन सांगे मज मी रंगभरी
एक मेघछाया जणू प्रेमभरी
बरसेन तयाच्या अंगणी मी
©गीतांतर:मुकुंद इंगळे
Gitantar Panthi hu mai us pathaka
(चाल: पंथी हूँ मैं उस पथ का)
पथीक आहे मी, या पंथाचा
अंत नाही ज्याचा
हीच दिशा दुर्दम्य आस अन
आधार माझ्या मनीचा
©गीतांतर:मुकुंद इंगळे
Gitantar :fulonke rang se dil ki kalamse
रंग फुलांचे, हृदयात लेऊन
लिहिली तुला मनोगते मी...
किती किती कसं काय,
छळतेस नितक्षणी,
सांगू तुला कसे मी....
तरीही स्वप्ने, पाहतो तुझी मी,
तुझ्या आठवणींत होतो मी जागा ...
तुझ्याच विचारात गुंतून जातो ,
जणू गजऱ्यात गुंफे धागा..
हा ..मेघ नि वीज, चंदन नि जलसे
अभंग प्रेम अपार..
घ्यावे लागतील,जन्म आपल्यास
कितीदा वारंवार..!
गीतांतर: मुकुंद इंगळे
Tuesday, May 18, 2021
तू ...कोण?
अजूनही अधूमधून दिसतेस मला तू..अजूनही आपली ओळख नाही
झालेली...पुढे होईल की नाही देव जाणे.
१९७६..पावसाळा सुरु होत होता. कॉलेज नुकतंच सुरु झालं होत. अजून
सर्व मुली ‘पाहून’ही नव्हत्या झाल्या ..आणि एका सकाळी तू वर्गात
आलीस. अगदी फ्रेश तयार झालेला मित्रांचा ग्रुप, तुझा अतिशय फ्रेश,
प्रसन्न चेहरा पाहून खलास झाला. गोरा रंग म्हणजे संगमरवर हे तुला
पाहताक्षणी पटलं .नितळ चेहरा, धारदार नाक आणि जबरदस्त डोळे..
गुलाबी काड्यांच्या चष्म्यातूनही किंचीतशी हिरवट झाक दाखवणारे..
नियमानुसार तुझ्या जाण्यायेण्यावर वेळा ठरू लागल्या. तू ज्या तासाला
बंक मारायाचीस तेव्हा आम्ही पण बाहेर असायचो. आम्ही म्हणजे
आणखीही काही जण होते ...आमच्यासारखे पण स्वतंत्र निरिक्षक..
आमच्या ग्रूपव्यतिरिक्त .
आणि एके दिवशी, साधारण महिना दोन महिन्यांनी तू दिसलीस
त्याच्याबरोबर. कृश म्हणावी अशी शरीरयष्टी..डोळ्यावर येणारे केस ...
तू नेमकं काय पाहिलंस
त्याच्यात ते तुलाच ठाऊक. तो पण होता आमच्याच वर्गात. मधल्या
दिवसांनी जादू केली तुम्हा दोघांवर. पण जोडी मस्त जमली. आमच्या
चडफडण्याचा काहीही उपयोग झाला नाही. एकदा तुमच जमल्यावर
नावगाव जाणून घेण्याची उत्सुकताच संपली.
मग मात्र तुम्ही दोघे नियमित दिसु लागलात एकमेकांसोबत...एकमेकांत
गुंतुन गेला होतात कधी पायऱ्यांवर तर कधी लायब्ररी मध्ये, कॉलेजच्या
स्नेहसमेंलनाच्या कार्यक्रमात ..वर्गात पण असे बसायचात की एकमेकांना
खाणाखुणा करू शकाल.
चार वर्षे गेली. पदवी मिळाली आणि पोटार्थी नोकरी पण मिळाली.
नोकरीसाठी मुबंई गाठली. बाकी पुन्हा कुणी भेटण्याची शक्यता नव्हतीच.
दहा दिशांना उडून गेलेले पक्षी आपण. काही काळ एकत्र होतो. तेही
बिनओळखीचे. हे असं खूपदा होतं. त्यात काय.. आता कोण भेटणार परत.
जे मित्र झाले ते राहणार. तेच तेव्हढे भेटत राहणार. काळाच्या कसोटीवर
माणसं संबंध घासून घेत असतात. जे राहतात ते बावनकशी समजले तरी
जातात.
चार वर्षाचा कॉलेजचा काळ आला आणि अपरिचितासारखा निघून गेला.
आता खरी जिंदगी सुरु झाली होती. साधारण दीड वर्षाने तुम्ही दोघेही मला
दिसलात.आणि अधूनमधून शनिवारी रविवारी संध्याकाळी दिसतच राहिलात.
माझ्या घराच्या थोडं आधी ५ मिनिटे आधी अंतरावर एका इमारतीत तुम्ही
भाड्याने जागा घेतली होती.
एकदा दिसलात असेच आणि लक्षात आल की तुझी चाल मंदावलीय.
पोटातला भार वाढू लागलाय. आणि तुझ्या चेहऱ्यावर आणखी तेज आले.
तो तुझी खूप काळजी घेताना दिसायचा. सामान आणताना तुला हाती काही
घेऊ द्यायचा नाही.माझ्या काही सेकंदाच्या निरिक्षणात इतके लक्षात यायचे तर प्रत्यक्षात तो खूपच काळजी घेत असेल तुझी. नंतर तू गेली असशील माहेरी कारण आता तो
एकटाच दिसायचा अधून मधून.
खूप दिवसांनी तू पण दिसलीस आणि परत दिसू लागलात कधी तुम्ही
दोघे कधी तुम्ही तिघे. नाही म्हटलं तरी थोडास बाळसं तू पण धरलं होतस.
काळ वहावत गेला. सुखी समाधानी संसाराचे साधारण आठवे किवा नववे वर्ष
असेल कदाचित. आणि अचानक कुणीतरी सांगितले .. बहुधा कामवाल्या बाईने ..
की त्या इमारतीतील कुणीतरी हृदयविकाराच्या झटक्याने गेले. कोण याचं
उत्तर ‘तो’ हे अनपेक्षितपणे खूप उशिरा मिळालं. आणि खूप दिवसांनी तू
दिसलीस. एकटीच. हातात सामानाची पिशवी. गोऱ्या हातावर पिशवीचे बंद
जिथे काचले होते तिथे लाल चट्टा उठलेला. आणि चेहऱ्यावर उदास भाव,
सोबती अचानक निघून जाण्याने भांबावलेली, कदाचित हे मलाच जाणवलं
असेल.
तुझ्या डोळ्यात त्याची आठवण मला तेव्हाही दिसत होती.
काळ वहातच होता. तू दिसायचीस अधून मधून, मोठ्या होत जाणाऱ्या
लेकासोबत. त्याच्यामागे.. सर्व वेदना गिळून, तू छान सांभाळला असावास
संसार ...शिकवलं असशील लेकाला. सांगितलं असशील त्याला त्याच्या
स्वप्नांबद्दल. सगळं
मनातलं दु:ख गिळून. खूप हिमतीने जगते आहेस तू.
परवा तू अचानक एका दुकानात लेकासोबत दिसलीस आणि हे सगळं
सिनेमासारखं समोर उभं राहिलं.
बघता बघता, छिद्र पडलेल्या पिशवीतून अजाणतेपणे सांडावा तसा
बर्याच वर्षांचा काळ सांडत गेला. काय गंमत आहे ना. जर उद्या
मी तुला भेटून हे सगळ सांगितलं तर तू खलासच होशील. माणसाचं माणसाशी
काय असतं नातं ? तुझ्या अख्या आयुष्याच्या वाटचालीचा मी खुप लांबचा
साक्षीदार आहे असं कसं म्हणणार मी. जिचं नाव गाव माहित नाही,
ज्याचे नाव गाव माहित नाही ते मला अपरिचित वाटत नाहीत.
असं असू शकतं? त्यांचं सुखदु:ख देखील... दु:खाला अंतर नाही ‘अंतर’
लागते हेच खरं. पण तू न बोलता खूप शिकवलंस. तुझ्या चेहऱ्यावरचे ठाम
भाव तुझ्या आयुष्याला सामोरे कसे जावे हेच सांगतात.. डोळ्यात जिद्द तेव्हाही दिसत
होती.
माहित नाही आपल्या दोघांच्या जाण्या"आधी हे तुला कळेल का...
आणि कळले तरी तुझी प्रतिक्रिया काय असेल? अथवा कळण्याची गरज पण नाही.
पण मला मात्र लक्षात येत नाहीय की आपण ओळखीचे की अनोळखी ...की हे
अनोळखीपण हाच एक
दुवा आहे आपल्यातला,
हँटस आँफ टू यु ....परमेश्वर तुला भरभरून आयुष्य
देवो.
कथाकार: मुकुंद इंगळे
Monday, May 17, 2021
Bench mark आयुष्याचा
मला आठवतंय की
बरेचदा आपण तिथे बसलेले असायचो....
बोलायचो, ठरवायचो..!
कुणा मैत्रिणीच्या लग्नासाठी काढलेली मेंदी तू दाखवली होतीस एकदा...
त्यावेळेसच चैत्रात तुझ्या हातावरच्या रेषा पण पाहिल्या होत्या ..
एकदा अचानक आलेल्या पावसाने आपल्याला मस्त भिजवले होते...
तुझ्या ओल्या हातावरचे ओघळणारे पाण्याचे थेंब खूप सुंदर चकाकत होते.
मग बराच काळ आपण भिजतच राहिलो
एकमेकांत.
इथेच तू त्यादिवशी म्हणाली होतीस "आता
भेटणे शक्य नाही" म्हणून..
जेव्हा आठवणींचा पालापाचोळा आजूबाजूला तसाच पडून होता तेव्हा...
आणि हे सांगताना तू थरथरत्या हाताने माझा अन
बाकाचा हात घट्ट
धरून ठेवला होतास..
ग्रीष्म सुरू झाला आणि त्यानंतर ऋतू बदललाच नाही..
मी अनेकदा इथे यायचो त्यानंतर..
तुझे भास आणि स्पर्शाचे आभास निरखत
बसायचो.
आज संध्याकाळीच आलोय..वसंत, वर्षा,
शिशिर आणि ग्रीष्म इतका प्रवास झालाय...
दमलो नाही थकवा नाही.. कारण तुझी भेट.!.
हे बघ बाकी साऱ्या हिरव्या सृष्टीत आपल्या
आठवणींचे हे बाजूला वाढलेले,
फुललेले रंगीबेरंगी झाड बघण्यासाठी येतो मी इथे नेहमी.
तटस्थपणे पहात बसतो हे झाड...दुरून..
काहीसे अंतर राखून आणि
तुला अंतरात राखून..!
आत्ता चुकून आलीस तर लगेच बसू नकोस या बाकावर...आठवणींचा रंग
अजून ओला आहे..
या रंगीबेरंगी झाडाची खाली इतस्ततः पडलेली रंगीत पाने फुले पाहिलीस ना..
कदाचित पुढच्या काही दिवसात हा बाक पण असाच "रंगुन" जाईल..
रंगीत पानेफुलें त्यावरती गळून पडण्याइतके हे झाड पण वाढत राहील.
मी इथेच असेंन एकटा..या बाकासारखा..
फक्त "रंगून" गेलेला आणि रंगून "गेलेला"..!
चित्रकथा: मुकुंद इंगळे

