आठवणींच्या चिमण्या
घरात चुकून शिरलेली चिमणी बाहेर पडण्यासाठी तगमगत असते...अन असे करता करता अनेक कानाकोपऱ्यात फडफडत जाते…..तसच तू मनात आलीस की असेच करतेस...भुर्रकन येतेस आणि कोणत्याही आठवणींवर क्षणभर बसतेस... आणि लगेच निघून जातेस..
एक चिमणी घरात आली...बुजून जाऊन सांदीत बसली..जाईल बाहेर थोड्या वेळाने. तुझ्या आठवणीसारखी...मनाच्या कुठल्याशा कोपऱ्यातून बाहेर येतेच ती पण
खूप कलकलताहेत आज चिमण्या सकाळी सकाळी... त्यांनी तुला काल इथे पाहिलेलं दिसतंय...नाहीतर इतक्या आठवणीने, आवेगात एकमेकींना दुसरं काय सांगणार
परवा एक चिमणी धिटाईने खिडकीतून आत आली आणि दारातून बाहेर उडून गेली...रोज तुला आठवताना मी मनाच्या खिडकीत एक आठवण ठेवतो...आणि थोड्या वेळाने ती भूतकाळाच्या दरवाजातून दूर उडून गेलेली पहातो.
अंगणातल्या चिमण्यांना मी लपून पहातो.. त्या येतात, दाणे टिपतात आणि कुणाची चाहूल लागली की लगेच पसार होतात..
मी पण आपल्या आठवणींकडे चोरून पाहतो.त्या मनात येतात, नादावतात आणि वर्तमानाची चाहूल लागताच पसार होतात.
मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment