Sunday, April 28, 2024

वहिवट

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

वहिवट 

बाहेर प्रचंड उकडतंय...अंगाची तलखी होतेय.समोरच त्या भागात प्रचंड वट असलेलं सावलीचे दुकान दिसले.आणि काही मनाला मिळणाऱ्या विसाव्याच्या क्षणांच्या बदल्यात,मोबदल्यात झाडाखाली जाऊन उभा राहिलो.

झाडाकडे नीट पाहिल्यावर लक्षात आले की पूर्वीच्या पारंब्यांची आता एकेक विशाल फांदी झाली आहे...आणि अशा फांद्यानी मूळ खोड म्हटलं तर जखडून गेले आहे...म्हटलं तर मिठीत सामावून गेले आहे.नव्या पारंब्या उगवणे देखील सुरूच असावे. एकमेकांत गुंतून म्हणावे की गुंफून म्हणावे इतक्या फांद्यांनी झाड विस्तार पावत गेले होते...त्याचे सावलीक्षेत्र त्यामुळे आपोआपच विस्तारले जात होते.

माझ्या शरीराला आणि मनाला आता निवांत,उल्हसित वाटत होते.एकच प्रश्न होता?

झाड सावल्या का विकत होते?झाडाला मला मिळणाऱ्या विसाव्याच्या क्षणात का स्वारस्य होते?

खरं तर ते ही झाडाने दिलेलेच तर होते.पण झाडाखाली उभे राहण्यासाठी झाडानेच मला नवे नाते दिले होते...त्याची व्याप्ती मला त्या नात्याचा विचार करायला लावत होती.मला तिथून हलावेसे वाटत नव्हते.

अजूनही जमिनीवर झिरपणारे काही चकाक उन्हाचे कवडसे हळूहळू सावली होऊन नाहीसे होत राहतील..जेव्हा

त्या टळटळीत उन्हात सावली देणाऱ्या झाडाच्या मनात माझ्या आणि त्याच्या नात्याची नवी पारंबी फुटली असेल कुठेतरी...

नात्यांच्या विविध पारंब्या आपले जीवन व्यापून टाकतात..नव्याने पारंब्या होत आणि जुन्या पारंब्यांच्या फांद्या होत होत...

झाड विकत असते काही विसाव्याचे क्षण..क्षणैक सहवास पण चालेल.. अशा कायमस्वरूपी नात्याच्या बदल्यात.

लेखन:मुकुंद इंगळे 


Friday, April 26, 2024

जंगल वाट

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

जंगलवाट 

हे जंगल अनंत आहे.

चालता चालता वेळ कसा जातो कळत नाही..जंगलाचा वातावरणात 

भरून राहिलेला थरार..आजूबाजूच्या झाडांवरुन ऐकू येणारे पक्षांचे 

दिवसभर कानावर पडणारे आवाज..त्यातील काही दूरवरून पण स्पष्ट 

ऐकू येतात...एखादा वाहणाऱ्या ओढ्याकाठचा..काही क्षण निवांत 

वाहणारे पाणी ऐकावे अशा मोहात,संमोहनात पाडणारा दगड..

कधी झुळूक तर कधी जोरात वाहणारा.. आणि झाडांमधून वाहताना 

बासरीचा आवाज काढत घोंगवणारा वारा.

निसर्ग नियमाप्रमाणे पानगळ सुरूच आहे...मला वाटते जितकी माणसे 

लयाला जातात तितकी पाने देव झाडाला देतो...आणि जितकी पाने 

गळतात..तितके नवे जन्म होत असावेत.

सगळं काही मस्त..तरी दोन प्रश्न उरतात. माझी दिशा बरोबर आहे का?

आणि दुसरा..मी काय गाठणार आहे इतके चालून?

दिशा असणारच बरोबर कारण दिशांची नावे फक्त स्थानसापेक्ष असतात 

खरं तर.त्यामुळे नावापेक्षा दिशा बरोबर सापडली हे "उत्तर" आधाराला घेऊन 

मी चालतो आहे.

गाठायचे काय? ...काहीच नाही.Aimless wandering बस.मग वाटचालीला अर्थ? 

कशाला हवा...त्याचा आग्रह कशाला हवा.

समोरची वाट मला सोबत घेऊन निघाली आहे...मी तिच्या सोबत जात राहणार...एवढेच सत्य.

मी..माझे अस्तित्व विरून..विसरून असाच चालत राहणार. 

मित्र,सख्यांची भरगच्च झाडे सभोवताली असलेल्या जंगलातून असाच चालत राहणार...

मनात त्यांनी दिलेल्या आनंदाची त्यांनीच गायलेली गाणी ऐकत...किंवा स्वतः गात.

हे काळाचे जंगल अनंत आहे...

लेखन: मुकुंद इंगळे


Tuesday, April 9, 2024

वेल डन

चित्र वेध

वेल डन 

रोजच्या धावपळीत मनाच्या शोभिवंत कुंडीत काही बीजे वाहून येतात.काही रुसतात तर काही रुजतात.रुजलेली स्नेहाच्या शिंपडण्याने सहवासाच्या मातीत उमलू लागतात.हळूहळू सुसंवादाच्याच्या खताने जोमाने वाढू लागतात.अन् एक दिवस त्यांना नात्याचे निळे निरभ्र आकाश दिसू लागते.नात्याची वेल आता मुक्तपणे  विश्र्वासाचा आधार घेत बहरू लागते..जाणाऱ्या काळानुरूप विश्वास वेगळ्याच उंचीवर तिला घेऊन जातो.तिला नवे धुमारे फूटतात आणि त्यांचीही पाती वेगळी फुलू लागतात.. वाढू लागतात.ती एकतर नात्याची नवी पिढी तयार होते...नाहीतर जुन्या नात्याचा नव्याने बहरलेला आविष्कार असतो. वेली बहरताना एकमेकांत गुंफत जातात..गुंतत जातात.रागाचे तण मात्र दिसताक्षणी काढून टाकावे लागतात.

आणि वेल छानपैकी बहरत रहाते.

मात्र मनात शोभिवंत कुंड्या अनेक असल्या तर त्यातून बहरलेल्या आयुष्यातल्या विविध नात्यांच्या वेलींकडे पाहताना एकच विचार मनात येतो.... 

वेल डन 

लेखन: मुकुंद इंगळे 


Sunday, April 7, 2024

उदबत्तीचे घर

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

उदबत्तीचे घर

हे एक घर आहे जे प्रत्येक घरात असतंच.त्यात राहणारा प्रत्येक जण मौनात स्वच्छंद... सुवासात फक्त जळत असतो.घराची अवस्था कधी कधी बदलते..परिस्थितीनुसार.कधी अर्धा बटाटा, केळी तर कधी शोभिवंत वस्तू...ज्यात तिघांच्या एकत्र जळण्याची सोय असते.तर कधी चांदीचे बनलेले एका उदबत्तीचा सोय असलेले उदबत्तीचे घर.लावली उदबत्ती की जळल्यानंतर उरलेली राख कधी अंगारा म्हणून मस्तकी लावायची तर कधी फेकून द्यायची..घर स्वच्छ धुवून घ्यायचे नव्या उदबत्ती साठी.

आपला जन्म होतो त्याक्षणी त्या घराचे रूपांतर उदबत्तीच्या घरात होते.आई आणि वडील या दोन उदबत्त्या अडकवून , खोचून घेतात स्वतःला कर्तव्याच्या छिद्रात.एकदाच काय ते त्यांचे आयुष्य हेलकावते...निसर्गदत्त मिळालेल्या त्या कोनाला पत्करून..आपल्या आयुष्याला सुवास यावा म्हणून मंद .. नि:शब्द फक्त जळत राहतात...त्यांच्या आपल्याप्रती असलेल्या लगडलेल्या प्रेमाच्या जाणिवेची राख होईपर्यंत.मग एक वेळ अशी येते की जळण्यासारखं काही उरत नाही.उरते फक्त काडी...सहज असा काडीमात्र उपयोग नसलेली. हे सगळं घडत असताना लक्षात येत नाही की आपण पण आता उदबत्त्या झालो आहोत. नि:स्वार्थी जाळण्यासाठी तयार.

महत्वाचे हे आहे की उदबत्ती चेतवण्यासाठी काडेपेटीची काडी काडेपेटीवर घासावी लागते.नुसत्या उदबत्तीने दुसरी उदबत्ती पेटवता येत नाही.

काडेपेटी म्हणजे हे जग..समाज... आतील काड्या ही आपल्या आजूबाजूची माणसं...ओळखीची किंवा अनोळखी.ती जळायला तयार असतात...अनंत दिवे चेतवत असतात.कळत नकळत आपल्यावर प्रभाव टाकत असतात.अनेकदा काड्या नीट पेटत नाहीत...तेव्हा काडेपेटी वायाही जाते.शाळेतले शिक्षक,कॉलेज मधील प्राध्यापक...आपले मित्र मैत्रिणी..सहकारी...नातेवाईक.. आपलं सारं भावविश्व...आपल्याला एक प्रभावी सुगंध देते आणि एक उदबत्ती तेव्हा दीर्घकाळ जळण्यासाठी सक्षम होते.

एक नवी उदबत्ती पुन्हा जळणार असते आणि स्वतःच्या कर्तृत्वाने उजळणार असते.

लेखन:मुकुंद इंगळे 


Saturday, April 6, 2024

लय विलय

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

लय विलय

हे चित्र स्थिर आहे..पाणी वाहताना दिसत नाही. बर्फाच्छादित शिखरांवरून येणारे वारे जाणवत नाहीत.झाडांची पाने हलत नाहीत.शोभिवंत खांबांच्या मध्ये तितकेच सुंदर कठडे आहेत. स्थिर असल्यामुळेंच टिपॉय वरील शुभ्र फुले पण कोमेजणार नाहीत.हे सर्व जणू काही थांबले आहे..निश्चल आहे.

कारण...

अजून मी तिथे पोहोचलो नाही.

मी जन्माला येताक्षणी हे चित्र सजीव होईल.ते माझे तीन मित्र ही येतील माझ्यासोबत.मला एकटे वाटू देणार नाहीत.माझ्या श्वासांनी झाडांची पाने हलू लागतील.जगण्याच्या सफरीत मला अडचणींचे अनेक डोंगर चढा उतरावे लागतील तेव्हा वाहणारे प्रयत्नांचे वारे मला उल्हसित करतील. जीवन प्रवाह वाहू लागेल.नैतिकतेच्या शोभिवंत खांबांमध्ये माझ्या भल्याबुऱ्या वर्तनाचे कठडे असतील.मात्र ती शुभ्र दिवसांची अन रात्रीच्या गडद हिरव्या देठांची फुले तेवढी मला रोज बदलावी लागतील.रात्रंदिवस माझे तीन मित्र सत्व,रज आणि तम...सोबत असतील ..भटकंती करत आम्ही इथे आलो असू आणि ते तिघे इथून निघून गेलेत.त्यांच्या रिकाम्या खुर्च्या आणि पुन्हा माझ्यासाठी निश्चल झालेले सारे जग ...तो क्षण मी टिपला आहे.

मला त्यात शोधू नका.

लेखन:मुकुंद इंगळे 


Monday, April 1, 2024

वाटणे

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

वाटणे

देवाची पण कमाल आहे.. माणसाला नेमकं का पाठवलय पृथ्वीवर..तेच कळत नाही.येताना भेट म्हणून सर्व काही ग्रहण करण्याची क्षमता असलेला मेंदू दिला आणि भावनांचा कल्लोळगुच्छ दिला.

मेंदू कुलुपाचे काम करतो तर भावना किल्ल्यांचे.

दैनंदिन आयुष्यात मेंदूला प्रश्न पडणारच...कुतूहलाची मास्टर की आणि विचारांची भावना,प्रश्न सुटण्यासाठी धडपड करायची भावना,चिकाटी,जिद्द या किल्ल्या लागतील. प्रत्येक प्रश्नाला वेगवेगळ्या किल्ल्या लागतील..आणि प्रश्नही असेच की ज्याला एकापेक्षा जास्त किल्ल्या लागतील ते कुलूप उघडायला.पण कुतूहलाची मास्टर की हवीच.

कधी कधी वाटतं की आपण कायम कुलुपच आहोत की काय? बालपण,तारुण्य, प्रौढत्व अशी वेगवेगळी कपाटे ..ज्ञान भांडाराने भरलेली जगताना उघडावी लागतात.तेव्हा मात्र आपण किल्ली होतो.

भेटणारी माणसे सुद्धा सुरुवातीला कुलूप असतात..सहवासामुळे मात्र नंतर खुशाल त्यांच्या किल्ल्यांच्या duplicate किल्ल्या  आपल्याला देतात. हवं तेव्हा त्यांच्या मनाचं कुलूप आपण उघडू शकतो.त्याच सोबत आपण कुणासाठी कायम कुलूपच राहायचं हे पण ठरवतात.

आपण जितक्या आपल्या किल्ल्या नाती,मैत्री,छंद अशा कपाटाच्या आत असलेल्या कप्प्यांना उघडायसाठी वापरू... वाटू....तितके "जाताना" बरेच प्रश्न सुटले,उत्तरे मिळाली ..अनेक कुलूपे उघडली याचे समाधान असेल.

कधी कधी यातील काही किल्ल्या हरवतात...तेव्हा त्याच्या duplicate ज्यांना दिल्यात ते येतात,धीर देतात आधार देतात...कुलूप उघडून मनाचे दार कीलकीले उघडते..पुन्हा नव्याने प्रश्न शोधायला,आपल्या किल्ल्या वाटायला.

गंमत म्हणजे वाटायला शब्द पण असा आहे की ज्यात मनाला वाटणे ही भावना आणि दुसऱ्याला देणे हे देखील आभिप्रेत आहे.

चला किल्ल्या वाटायला...नव्या नव्या प्रश्नांच्या  शोधात.

लेखन: मुकुंद इंगळे