Thursday, April 24, 2025

व्रतस्थ

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

व्रतस्थ

माझ्या अवती भोवती हिरव्यागार ताज्या विचारांच्या शेतीचे वाफे दूरवर गेलेले दिसत आहेत...ते मेंदूतील पेशींच्या जंगलाकडे जातात.

बाजूला एक अखंड वाहणारा काल-वा...तुम्ही मला पाहताय हा क्षण देखील त्यातून असाच वहात पुढे जाईल...

कालवा आणि शेतांची उतरंड यांच्यामध्ये एक छोटीशी पण सुंदर पायवाट आहे... तारतम्याची ..वावरताना वापरायला ती पुरेशी आहे.

दुसऱ्या बाजूला स्वप्नांची सुरेख बाग आहे...सध्या क्षमतेच्या कुंपणात आहेत स्वप्नांची झाडे...जसजशी स्वप्ने फुलून विशाल होतील तसतसे कुंपण आकाशाखालच्या .. क्षितिजाचे होत होत विस्तारत जाईल.

माझ्या अस्तित्वाचे घर बाजूलाच आहे...बाहेर  विश्वासाच्या दोरीवर दोन टॉवेल्स..एक निळसर.. ..दुसरा शुभ्र ..दोन भावावस्थांचे... वातावरणातील बदलाचे हेलकावे टिपत आहेत.

आणि या सर्वात मी उभा आहे...फांद्यांचे बाहू पसरून... तुमचे स्वागत करायला...

शुभ्र फुलांनी डवरलेला...बहरलेला...

पायऱ्यांवर बसलेल्या स्वनामिकाकडे पहात..

एक व्रतस्थ.

लेखन: मुकुंद इंगळे 

मो 9323611034