Sunday, February 25, 2024

सु - व्यत्यय

सु-व्यत्यय

काही काही अडथळे खूप रचनात्मक असतात.इथेच बघा ना .. सुर्याची सकाळची कोवळी किरणे या शुष्क झाडाने अडवली आणि त्या किरणांची प्रभा प्रसन्नतेने सुंदर होऊन गेली. जणू त्या राकट रांगड्या फांद्यांना किरणांची पाने आलीत आणि प्रकाशाचे झाड दिसू लागले.

मात्र हा नजारा पाहायला आपण त्यापासून योग्य अंतरावर असायला हवं.

भिंतीवर पडणाऱ्या प्रकाशाला दोन्ही हाताच्या बोटांनी अडथळा निर्माण करून भिंतीवर पडणाऱ्या छायेतून पक्षी, कुत्रा इत्यादी गोष्टी दाखवता येतात...हा देखील रचनात्मक अडथळा.ओडिशातील रावणछायाचा खेळ..किंवा भर उन्हात सावली देणारा वृक्ष किंवा वाहत्या पाण्याच्या प्रवाहात अडथळा आणू उडणारी कारंजी....अनेक उदाहरणे सापडतील.

सगळेच अडथळे प्रगती रोखत नाहीत...तर आपण योग्य अंतरावरून सकारात्मकतेने अनुभवले तर ते आयुष्यात आनंदही निर्माण करू शकतात.

लेखन: मुकुंद इंगळे


Friday, February 23, 2024

रि-डेव्हलपमेंट

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

रिडेव्हलपमेंट

सध्या पुनर्विकासाचे कितीतरी प्रकल्प येता जाता दिसतात.इमारतीला ३५-४०वर्षे झाली की पुनर्विकास करावा लागतो...सध्याचे रहिवासी तात्पुरते स्थलांतर करतात आणि मग ४-५ वर्षात नवी बहुमजली सुसज्ज इमारत तयार होते.मधल्या काळात साईट वर सभोवती लावलेले निळ्या रंगाचे पत्रे,लहान मोठे काँक्रीटचे मिक्सर,राबीट आणि प्रचंड धूळ.. एवढ्याच गोष्टी दिसत असतात.

इमारत जुनी झालेली असते,सतत दुरुस्तीची कामे निघतात...त्यामुळे पुनर्विकासाचा निर्णय घ्यावा लागतो.त्यालाही दोन पर्याय असतात...कुठल्यातरी बिल्डरकडून नवी इमारत सर्व कागदपत्रांची पूर्तता करून बांधून घेणे किंवा स्वयंपुनर्विकास करणे.

केवळ जुनी झाली म्हणून एखादी इमारत पुनर्विकसित करावी लागते.

आपलं मन आपल्यासोबत जन्माला येतं.. तितकंच दिवसागणिक वृद्ध होत जातं...त्याचां पुनर्विकास नको का करायला?

मनाच्या अशा साईटवर जुन्या विचारांचे राबिट सगळीकडे विखरून पडलेले,नव्या विचारांचे काँक्रिट मिक्सर सुरूच आहेत...मनात अनेक इमले चढणार तो भार सहन व्हावा म्हणून खोलवर पाया भरावा लागणार.नव्या मनात राहणार नवे विचार..तेच रहिवासी.मात्र विचार मनोवेगे कुठेही जाऊ शकत असल्याने लिफ्टची सोय नसली तरी चालेल.पार्किंगची मात्र हवी..कधी कधी आपल्याला अग्रक्रमानुसार त्यांना काही काळ पार्क करून ठेवावे लागेल...म्हणून पार्किंग हवं.

पण खरं तर मनाला अशा प्रकारच्या पुनर्विकासाची अजिबात गरज नसते...ते स्वतःहुन अद्ययावत होत असते.पालक गुरुजनांच्या कष्टांमुळे पाया नेहमीच भक्कम असतो.तात्पुरत्या विचारांचे भाडेकरू जास्त दिवस टिकत नाहीत...मात्र सण,उत्सव,परंपरा या सांस्कृतिक सार्वजनिक सोहळ्यात कायमचे उत्साही रहिवासी भाग घेतात.

अनुभवांचे मजले काळानुरूप चढत रहातात त्यामळे दृष्टीच्या बाल्कनीज मधून दिसणाऱ्या दृश्याचा कक्षा रुंदावतात.छंदांच्या उद्यानात प्रयत्नांच्या शोभिवंत प्रांगणात लावलेले गायन,वादन,चित्रकला इत्यादी वृक्ष जोमाने बहरतात.मनातले वातावरण नित्य ताजे ठेवतात.

मन म्हणजे एखादी जीर्ण होत जाणारी इमारत नव्हे..तर परमेश्वराने वेरूळ मधले, एका दगडात वरून कोरत आणलेले नक्षीदार,कलात्मक कैलासनाथ लेणे आहे...ते पुरातन होत नाही पण श्र्वासासोबत नित्य चिरंतन असते.

त्याची रि-डेव्हलपमेंट प्रत्येक क्षणी होत असते.

लेखन: मुकुंद इंगळे


Wednesday, February 21, 2024

नजर आणि दृष्टी

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
*नजर आणि दृष्टी*
कॅमेरा कधी कधी एखाद्या छायाचित्रातील जवळच्या गोष्टी स्पष्ट आणि मागील गोष्टी अस्पष्ट दाखवतो...त्यासाठी छायाचित्र काढताना भिंग, हव्या असलेल्या परिणामानुसार, मागे पुढे सरकवून काढावे लागते.
पण आपली दृष्टी,पाहताना दूर आणि जवळ असलेल्या गोष्टींमधील अंतर त्रिमिती स्वरूपात स्पष्टपणे दाखवते.

आपल्या मनाला या दोन्ही कला अवगत असतात....
एखादा ओळखीचा माणूस भेटला तर ते कॅमेऱ्याच्या भिंगाप्रमाणे...त्याचा आपल्याला माहीत असलेला भूतकाळ डोळ्यासमोर पार्श्वभूमी म्हणून काहीसा अस्पष्ट, पण नोंद घ्यावी लागेल इतके भान ठेवून त्याच्याशी वागते...
तेव्हा आपण *नजरेने* पाहतो त्याच्याकडे.

तर नव्याने ओळख होतांना...ओळखीच्या संदर्भांची ..वर्तमानातील काळाचे पदर...त्यातील अंतर...त्रिमितीय पद्धतीनुसार स्पष्टपणे उलगडते.
यावेळी आपण *दृष्टीने* पाहतो त्याच्याकडे.
समोरच्या माणसाला "आत" रजिस्टर करण्यासाठी आवश्यक असलेली ही KYC( Know Your Consciousness) प्रोसेस असावी बहुधा.
लेखन:मुकुंद इंगळे 

Tuesday, February 20, 2024

मनातलं जी मॅप

चित्र वेध

मनातलं जी मॅप

रोजच्या जगण्यात कितीतरी माणसे आपल्याला भेटतात..आपण त्यांच्या सहवासात कधी काही काळ अथवा दीर्घ काळ असतो...पण ती सारी आपल्यापर्यंत किंवा आपण त्यांच्या पर्यंत नेमके कसे पोहोचतो? आपण आपल्या मनाचे "जी" मॅप सतत वापरत असतो आणि त्या त्या माणसाकडे जाण्याचा मार्ग ते ॲप आपल्याला सतत दाखवत असते.एखादी व्यक्ती आपल्याला कशी भेटली याचा मनाच्या ड्राईव्ह मधे जतन केलेला लॉग काढून पहा.

सर्वप्रथम आपल्याला जवळचे मार्ग..जसे काही इव्हेंट...सहल,कार्यक्रम, ऑफीस इत्यादी गोष्टी दिसतील..जी व्यक्ति भेटली होती तिच्या ठिकाणी,विठ्ठलाला लावतो त्या गंधाच्या उलट आकाराची लोकेशनची लाल खूण दिसेल.तिथपर्यंत जायचे अनेक मार्ग दिसतील कदाचीत...पण तुम्ही भेटलात तोच जवळचा रस्ता आहे..होता हे तुमच्या लक्षात येईल.कुतूहल म्हणून एखाद्या इतर रस्त्याला निवडून पाहिलं तर त्या व्यक्तीकडे जाणारे आपल्या मित्रांचे पुल,व्यक्तित्वाचे टॉवर्स,प्रेरणेची शाळा कॉलेजेस..कर्तृत्वाची उद्याने..एकत्रित सम विचारांचे रिक्षा स्टँड, त्या मार्गावरील विचारांच्या वाहतुकीची वर्दळ इत्यादी गोष्टी दिसतील.आणि डावीकडे खाली तिथपर्यंत पोहोचण्याचा वेळ खरं तर दिसायला हवा.

आपण स्टार्ट पर्याय निवडून समोर येणाऱ्या मार्गाने वळणे घेत, निमित्ताच्या खुणा पहात,त्या प्रत्येक व्यक्तीजवळ गेलेलो असतो..जात असतो.विविध माणसांना मित्र,नातेवाईक,सहकारी...इत्यादी अनेक निमित्ताने भेटत असतो...पण त्यांच्या मनाने तुमची नोंद घेतल्यावर आपण खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीजवळ पोहोचतो.

मनाचा "जी"मॅप उघडुन पहा..किती जणांच्या "मन"या डेस्टिनेशनला आपण पोहोचलो आहोत...आणि किती वेळात.

लेखन:मुकुंद इंगळे 

Monday, February 19, 2024

"माळ"लेले गजरे

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

"माळ"लेले गजरे

किती छान प्रसन्न वाटतंय नुसतं या भरगच्च गजऱ्यांकडे पाहून.फुलला गंध असतोच..पण गजरा म्हणजे दोऱ्यात ओवलेला सुगंध.आता एकत्र दिसणारे गजरे थोड्या वेळात वेगवेगळे होतील आणि "त्याच्या" फक्त रोमांचक,प्रेमळ भावनेत गुंतून "तिच्या" केसात माळले जातील. हार आणि गजरा यात हा फरक आहे.हार अनेक भावनांमध्ये गुंतलेला असतो.त्यामुळे तो कधी घातला जातो तर कधी चढवला जातो. गजऱ्याचे तसे नाही...तो फक्त माळला जातो.

या प्रत्येक गजऱ्याचा दोरा वेगळा दिसत असला तरी "दोरा" म्हणून तो एकच आहे...आपल्या परमेश्वरासारखा.

प्रत्येक गजरा उद्या कोमेजणार आहे..पण तरीही तो दोघांच्या नात्यातला सुगंध नाजूक भावनेतून दरवळत ठेवेल...निदान गजरा माळण्याच्या क्षणापुरता तरी..आणि नंतर त्या क्षणाच्या जाणिवेतून...दिवस पुढे सरकेल.

निश्चितपणे अनिश्चित आयुष्य असूनही ते गुंफले गेल्यावर, एकमेकांच्या नात्याचा गुंता न करता...अलिप्त राहूनही परस्परांच्या सहवासात दरवळत रहातात.

फुले कोमेजून जातील,शेवटी फक्त गंधभारीत दोरा उरेल...पण मनात नात्याचा गुंफलेला गजरा कायम टवटवीत राहील.

लेखन: मुकुंद इंगळे 

Saturday, February 17, 2024

Flame-in-go

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

Flame-in-go

हे पक्षी खूप लांबचा प्रवास करून विस्तीर्ण जलाशयावर उतरतात...काही तिथेच रहातात...तर काही परत निघून जातात.काहींच्या पंख फडफडण्याचा आवाज येतो तर काही शांतपणे विहार करत रहातात.काही वरवर तरंगतात ..काही खोलवरचे पाहतात.

इतक्या संख्येने येत असले तरी एकमेकात गुंतत नाहीत.

त्यांचा थवा गुलाबी भासतो..जवळून पाहिले की त्यातल्या इतर छटाही नजरेस पडतात.

ते सतत काही ना काही हालचाल करतच असतात..स्थिर राहत नाहीत.

आकाशातून आलेले पक्षी पाण्यावर लाटा निर्माण करतात...आपल्या अस्तित्वाने ..बदलून टाकतात वातावरण...रात्रंदिवस.

आणि एक दिवस असा येतो की ते परत जातात...सारे काही शांत झाल्यासारखे वाटते. पण ते जिथे जातात तिथे वातावरण बदलते...

स्थलांतर हा त्यांचा स्थायीभाव असल्याने ते फिरतच रहातात...परत परत येतच रहातात.

विचारांचे हे पक्षी खूप लांबचा प्रवास करून मनाच्या विस्तीर्ण जलाशयावर उतरतात.

लेखन:मुकुंद इंगळे 

Friday, February 16, 2024

व्हेलेंटाईन डे

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
व्हेलेंटाईन डे 
तू ठेऊन गेलेली फुले दिसली आणि खुप छान वाटले.मन भूतकाळात परत गेले.कॉलेजच्या ग्रंथालयात आपली झालेली ओळख..काही मोजक्याच भेटीगाठी...नंतर तू लग्न होऊन कुठेशी निघून गेलीस.नंतर अजिबात गाठभेट नाही..बोलणे नाही.मोबाईल वगैरे गोष्टी अजून अस्तित्वात यायच्या होत्या तेव्हा.

आणि गेल्या वर्षी,अचानक तू एका कॉन्फरन्समधे दिसलीस..नंतर भेटलीस..याच रिसॉर्टमधे.. याच बेंचवर..फेब्रुवारीत.
आधी बराच वेळ आपल्यापैकी कुणीच बोलले नाही.नंतर आपण एकमेकांशी ..एकमेकांच्या तत्कालीन परिस्थितीवर बोललो..पण या संभाषणापेक्षा आधीचे मौन जास्त बोलके होते. परत दरवर्षी भेटू..इथेच असे ठरवून आपण मोबाईल क्रमांकाची अदलाबदल केली आणि आपापल्या दिशांना गेलो.
पुढच्या फेब्रुवारीत तुझा मेसेज आला आणि मी परत "कॉन्फरन्स"ला आलो.
बेंचवर फुले आणि तुझ्या पुस्तकात किल्ली ठेऊन तू गेली असशील..त्या फुलांना..किल्लीला तुझा परीसस्पर्श लाभला होता.त्याच रूम मधे तू काल राहिली होतीस...कालच व्हेलेंटाईन डे होता.
आज मीही तिथेच राहीन..रात्री तू भेट म्हणून दिलेलं रॉय किणीकरांचं रात्र उत्तररात्र वाचण्याचा प्रयत्न करत..तुझ्या त्याच जुन्या आठवणीत रमून जाईन.. सकाळी सज्जात उभे राहून ताज्या कॉफीचा वाफाळता कप घेऊन मी समोरच्या दरीकडे पहात उभा असेन...मोबाईल वर रफी माझ्यासाठी गात असेल..लाल पत्थर मधलं गाणं...आणि माझ्यासोबत ते ऐकायला दरीतून धुकं वरती येत असेल..
उनके खयाल आये,आके चले गये..
दीवाना जिंदगी को बनाके चले गये
दरी अशीच कायम राहील..पण धुकं मात्र पुन्हा पुन्हा नजरेसमोर येत राहील
परत भेटूच(?)पुढच्या वर्षी.
लेखन:मुकुंद इंगळे