चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
अंतर दर्शन
हिमालयातील डोंगराच्या पार्श्वभूमीवर एका देवळाचा कळस आणि थोडासा भाग दिसतो आहे.कळसाला नमस्कार केला तरी तो आतल्या देवाला पोहोचतो असेही समजले जाते..त्यासाठी देवळातच जायला हवे असे नाही.असंच एक देऊळ आपल्याला नेहमी थोडंसंच दिसतं.त्याला हिमालयातील डोंगरासारखे असंख्य कळस आहेत. देऊळ पाहण्यासाठी शुचिर्भूत होण्यासाठी महासागर आहेत.देऊळ पहात फिरताना दमलात तर पाण्यासाठी नद्या,सरोवरे आहेत.दमल्यावर घटकाभर विसावण्यासाठी जंगले आहेत. एकटेपणा वाटू नये म्हणून विविध प्राणी ते सूक्ष्म जीव आजूबाजूला आहेत.
गाभारा तर फारच देखणा आहे.त्याची नेमकी उंचीच मोजता येत नाही..निळ्या रंगाच्या वेड लागेल एवढ्या छटा दिसतील.गाभारा पाहता पाहताच संध्याकाळ होईल..आणि सभोवती अनंत चांदण्या जडवलेले चंद्र रत्न झळकू लागेल...आणि तुम्ही गाभाऱ्यातच रमून जाल.दमून झोपी जाल.पक्ष्यांच्या किलबिलाटाने जागे व्हाल.संपूर्ण गाभारा लालसर भगव्या रंगात न्हाऊन निघालेले पूर्वेचे सूर्यबिंब तुम्हाला उल्हसित करेल.
काय म्हणताय..देवाचे दर्शन कधी होईल?ते
ते कुठेही आणि कधीही होऊ शकते.फक्त डोळे मिटा...देऊळ जितकं पाहून झालंय ते आठवा..तो दिसेलच असं नाही..पण जाणवेल मात्र नक्की.
या देवळात देव नाही.. फक्त गाभारा आणि कळस.आणि आपल्या मनात हे प्रचंड विश्व घेऊन फिरणारा भक्त.देव त्याच्यापाशी आहे.डोळे बंद केल्यावर जाणवला तर ठीक..नाहीतर घ्या कळसाचे दर्शन...उघड्या डोळ्यांनी..जेव्हा कळसापलिकडले आकाश दिसेल तुम्हाला...द्वैत अद्वैत काहीच शिल्लक राहणार नाही हृदयात आणि तुमचा नमस्कार पोहोचेल त्याच्यापाशी.
लेखन: मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment