Friday, February 9, 2024

सळसळ आणि पानगळ

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

सळसळ आणि पानगळ

झाड बहरत असतं...मुळातून येणाऱ्या प्रेरणेतून....

प्रेरणेचा मूळ स्त्रोत झाड जिथे असेल त्या प्रदेशाच्या जमिनीत असतो.

प्रेरणेने बळ दिलं की फांद्या तग धरतात...हळू हळू बहरतात…

आणि त्यांना प्रेरणेचीच  हिरवी पाने फुटू लागतात. ऋतुकालपरत्वे 

झाडाच्या फांद्या पानांनी भरून जातात...आजूबाजूला वाहणारे वारे 

कुठूनही आले तरी पाने सळसळतात.. सळसळताना पानांचा सुंदर 

आवाज येतो.वाऱ्याला स्वतःचा आवाज कधीच नसतो.

मग शिशिर येतो..आणि पानगळ सुरू होते.नुकतीच उगवलेली पाने 

तग धरून राहतात..जुनी गळून जातात... गळत जातात.कधी तरी 

झाडावरची संपूर्ण पाने जाऊन फक्त कोरड्या वाटणाऱ्या फांद्या दिसतात.

मग वसंत येतो..आणि पुन्हा झाडाच्या फांद्या नव्याने अंकुरायला लागतात..

हळू हळू पाने दिसू लागतात...सुरवातीला लालसर दिसणारी पाने नंतर हिरव्या ताजेपणाने बहरतात.काही पाने जुनी होत जातात तशी सळसळ झाल्यावर खाली पडतात... वारा जोरात आल्यावर त्याच्या सोबत दूरवर उडत जातात.


सर्व ऋतूत उभं असणारं झाड म्हणजे आपण..मुळातून मिळणारी जगण्याची प्रेरणा म्हणजे शिशिरातल्या विचारांच्या पानगळीनंतर "जुन्याच" फांद्यांवर वसंतात नव्या विचारांची पालवी फुटावी... 

हे स्थित्यंतर म्हणजे आपलं जगणं.


सळसळ आणि पानगळ असल्याशिवाय झाडाच्या जगण्याला अर्थ उरणार नाही...नाही का!

लेखन: मुकुंद इंगळे


No comments:

Post a Comment