चित्र वेध (चित्र सौजन्य: कोल्हापूर देवस्थानची छायाचित्र ‘सुप्रभात’ साठी आली आहेत)
किरणोत्सव
रोज सुर्य उगवतो,रोज किरणे सर्वदूर पोहोचतात आणि सृष्टीतील अंधार नाहीसा होऊन जग उजळते.पण असे कोल्हापूरच्या महालक्ष्मी प्राचीन हेमाडपंती मंदिरातल्या देवीबाबत वर्षातून काही ठराविक वेळेसच घडते.कारण अनेक हे घडण्यासाठी अनेक खगोलीय घटनांचा योगायोग घडून यावा लागतो.
सूर्य रोजचाच,किरणे रोजचीच..देवळाची दारे रोजचीच..दारापासून मुर्तीपर्यंतचे अंतर रोज तेव्हढेच...पण त्यासाठी सुर्य दक्षिणायनात हवा..९ ते १२ नोव्हेंबर आणि ३१जानेवारी ते २फेब्रुवारी या दरम्यान ६ दिवस किरणोत्सव होतो.पहिल्या दिवशी देवीच्या पावलावर पडणारी किरणे सहाव्या दिवशी देवीच्या चेहेऱ्यापर्यंत पोहोचतात आणि देवीचे रूप एका वेगळ्याच तेजाने तळपू लागते.
आपला देह देखील एक मंदिर आहे आणि त्यात मनाची मूर्ती स्थापित केलेली आहे.
रोज सुर्य उगवतो,किरणे शरीरावर पडतात...पडत राहतात...वर्षानुवर्षे.पण मनावर पडत नाहीत,जाणवत नाहीत.आपण कधी कधी मंदिरात जात असतो,देवाला डोळे मिटून नमस्कार करत असतो पण तरीही....
आणि मग कधीतरी आपण एखाद्या मंदिरात गेलेलो असतो. आजूबाजूचे वातावरण शांत असते…मंदिरात "त्या"च्याशिवाय आणि आपल्याशिवाय कुणीच नसते. कुणा भक्ताने लावलेल्या उदबत्तीचा सुवास पसरलेला असतो..त्या प्राचीन मंदिरात,आधी भेट दिलेल्या अनंत भक्तांची सकारात्मक ऊर्जेची प्रासादिक कारंजी मनाला जाणवायला लागलेली असतात. शरीर आपोआप ताणरहीत झालेले असते..हात जोडले जातात आणि आतला "तो"पाहण्यासाठी आपण डोळे अलगद मिटून घेतो.कदाचित बाहेरचा सुर्य तात्पुरता आपल्यासाठी तेव्हा दक्षिणायनात येत असावा.
डोळे बंद केल्याक्षणी स्वतःचे अस्तित्व लोप पावून कशाचीच जाणीव उरत नाही.मनावर पडलेल्या श्रद्धेच्या किरणांमुळे ते मात्र चमकत रहाते.. तेजाने..
काही क्षण असेच जातात...आणि अचानक सर्व जाणीवा तीर्थयात्रेवरून परततात.
मनावर किरणोत्सव झालेला असतो आणि मनाचा गाभारा असीम अनुभूतीने भरून आणि भारून गेलेला असतो.
समोरच्या मुर्तीतला "तो" श्रद्धेचा किरण बनून "आत" येऊन गेलेला असतो.काही क्षण तरी मी
अज्ञान,ज्ञान,विज्ञान या पलीकडील तेजस्वी शून्यात जाऊन आलेला असतो.
लेखन:मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment