Monday, December 30, 2024

सरगम

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
सरगम

सरगम

प्रमाणबद्ध लय...

आणि लयबद्ध अस्तित्व..

सुंदर अंतर्मनाचा बाहेर दिसणारा 

मोहक force.. आवेश 

विविध भावनांची रंग वसने .. त्यातील काही गहिरे...तर काही कमी गहिरे ..अशी रंगसंगती..

या एका क्षणांत...या क्षणी थांबलेला ...

भासणाऱ्या हृदयाचा ठोका..

म्हणजेच आयुष्याचा ताल...ठेका...

या क्षणात थांबलेला..

जे गेले मागे ते मागे पडले हे दर्शविणारे हस्तक...

आणि सर्वात सुंदर...

निमुळत्या काळाच्या पायाच्या बोटांच्या पंचमहाभुतांनी साधलेली..

या क्षणाची आनंदाची,सुखाची,नात्याची... 

स्व अस्तित्वाची नेमकी सम...

की स्पंदनात स्थिरावलेली सरगम...

लेखन: मुकुंद इंगळे 


Friday, November 8, 2024

Relationshop

*Relationshop
चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

या..आज तुम्हाला माझे आयुष्याचे दुकान दाखवतो.हा इथे असा मी एकटाच बसून असतो...वाचत राहतो..ही जुनी पुस्तकं..ही सर्व पुस्तके म्हणजे जणू आयुष्यात आलेली माणसं...का भेटली या निमित्ताचे बंधन नाही.वेगवेगळ्या आवरणात,कमी अधिक पानांची..रंगीबेरंगी...कधी एकटी कधी समूहाने. प्रत्येकाचा विषय वेगळा.
आणि त्यांच्यासोबत जपलेली जुनी नाती.नातं नवं नसतंच कधी..ज्याक्षणी निर्माण होतं..त्या क्षणी ते जुनं होतं.
कुणी पुस्तके घेऊन आलंच तर उतरतो खाली...आणि त्या पुस्तकांना तोलून मापून  झाल्यावर त्यांना बरेचदा बंधमुक्त करून याच कपाटात ठेवतो. जी बंधनात दिसतील ती नाती विस्कळीत करून न चालणारी.
दिसताना दिसतील सगळी कशीही कुठेही ठेवल्यासारखी...पण माझ्या लक्षात असतं ना सगळं.
कधीतरी कुणीतरी नुसतंच येऊन माझी पुस्तके चाळत रहातात..त्यात रमतात. त्यांच्या स्नेहाच्या बदल्यात माझ्याशी नातं जोडून जुनं नातं घेऊन जातात.
आणखी काही गोष्टी जुन्याच दिसतील इथे...चार दिशांचा वारा देणारा पंखा...अजून एक वर ठेवलाय तो पूर्वीचा...माझ्या वडिलांनी खूप वर्षे वापरला तो...पण सांभाळतो मी त्याला.
हे हेल्मेट..दुकानात येताना बाईकवरून येतो...ते हे थोरामोठ्यांच्या आशिर्वादाचे हेल्मेट घालून.
एक निळ्या ताडपत्रीची वळकटी आहे वर जपून ठेवलेली...
ऋणानुबंधांची... पावसापाण्यात सर्व पुस्तकं सुरक्षित ठेवण्यासाठी वापरतो मी.
आणि एक जीवन परिपूर्ण जगण्याची तहान भागवण्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत...
या दुकानात असताना या पलीकडे काहीही लागत नाही.
असा एकेक दिवस जातो माझा...या पुस्तकांच्या गर्दीत..त्यांच्या सहवासात.. नात्यांच्या भांडारात..
स्वतःला शोधण्यात.
 *लेखन: मुकुंद इंगळे*

Thursday, November 7, 2024

ऋतुचक्र

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
ऋतुचक्र 
जाग आली तेव्हा मनाच्या किनाऱ्यावर विचारांची वर्दळ नव्हती. स्वप्नांच्या काही चांदण्या जाणिवेच्या सागरातील पाण्यावर अजूनही चंद्रासवे परावर्तित होऊन तरंगत होत्या.थोड्या वेळाने जातील त्या ..प्रकाश किरणे येतील तेव्हा.
या अंधाराला एक छानशी ऊब आहे...रात्री मिट्ट काळोखात पाहिलेल्या स्वप्नाची..रोज दिसतात वेगवेगळी स्वप्नं..चांदण्यात लपेटलेली...कुणीतरी रोज त्यांना आणून चंद्रावर ठेऊन जातं आणि नंतर एकेक करून ती माझ्या नजरेत...नजरेसमोर तरंगत रहातात...तशीच अस्पर्श.
अथांग पसरलेला मी मग फक्त जाणिवेतून कालक्षणाच्या लाटांवर लहरत राहतो... किनाऱ्यावर झिरपत रहातो.
एकेका स्वप्नाकडे पहात...
म्हणून वरून वाटला तरी किनारा कधीच कोरडा नसतो...लाख स्वप्ने फुलवणारी ओल आकाशाच्या ओढीने त्यात भिनलेली असते.नवी स्वप्ने तयार होत रहातात...
क्षणोक्षणी किनारा आकाशाशी विलक्षण ओढीने जोडला जात असतो..
ऋतूचक्र सुरूच राहते... 
लेखन:मुकुंद इंगळे

Tuesday, November 5, 2024

प्रकाशाच्या सावल्या

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

प्रकाशाच्या सावल्या

सगळीकडे अनामिक अथांग अंधार पसरला आहे.आत आणि बाहेर विश्र्वामध्ये.. 

आत पाहिले तरच बाहेरच्या अंधाराच्या आणि स्वतःच्या मनाच्या अस्तित्वाची जाणीव होते.

असंख्य आकाशगंगा,ग्रह तारे यांनी व्यापलेली अगणित विश्वे असतील...तितकीच मनात आहेत..अंधाराने जोडली गेलेली...

आणि जिथे सूर्य आहेत तिथे फक्त प्रकाश निर्माण होतो आहे..

कधी बारा राशीतून फिरताना तर कधी बारा महिन्यांची तावदाने असलेल्या माझ्या मनात राहताना.

सूर्याचा प्रकाश जिथे पोहोचतो तिथून तो परावर्तित होतो..काही कवडसे मनापर्यंत देखील येतात आणि त्यांच्या क्षमतेएवढाच उजेड उजळतो मनाला.

न उजळलेला असिमित अंधार माझी क्षमता आहे... मनाचे सर्व कोपरे उजळवण्याची आस कुतूहलाच्या अगणित छिद्रांवर अवलंबून आहे ज्यातून जिद्दीचे झोत आतवर पोहोचतात....आणि सावल्यांची पण जाणीव करून देतात.

अंधार आणि प्रकाशाच्या खेळात तयार होणाऱ्या काळाच्या सावल्यांमधेच आत मी आणि बाहेर विश्व..दोघेही रमून जातो...तितकीच असते माझ्या अस्तित्वाची जाणीव...आणि माझ्यापुरती विश्वाची जाणीव.

लेखन:मुकुंद इंगळे 


Thursday, October 3, 2024

देवी स्तुती

देवी स्तुती 

तेजस्वी आरक्त वर्ण, आभुषित कनक कर्ण 

गौरी नतमस्तक हूँ, संकट को करे विदिर्ण 


मानस मे रुप सजे, शक्ति को बाहु भजे 

तेजोमय आभा से, मन अंध:कार त्यजे 

विराट तव छायामे, मेरा अस्तित्व पर्ण 

गौरी नतमस्तक हूँ, संकट को करे विदिर्ण


तुझको मै जान लूँ, इतना संस्कार दे 

ध्यानमे बसी रहो, मनमे संचार दे 

जगन्माता प्रेममयी, हो दर्शन आनंद पूर्ण

गौरी नतमस्तक हूँ, संकट को करे विदिर्ण


अलंकार हो शस्त्र, शक्ति तव साज हो 

रणचंडिके नवदुर्गे,साक्षात्कार आज हो

मनके महिषासुरोंका  विनाश हो संपूर्ण

गौरी नतमस्तक हूँ, संकट को करे विदिर्ण 

मुकुंद इंगळे 

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 

Thursday, September 5, 2024

इंद्रधनुची इंद्रधून

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
इंद्रधनुची इंद्रधून
काल खूप सुंदर पाऊस पडत होता..
आणि अचानक इंद्रधनुष्य दिसू लागलं.समोरच्या डोंगराच्या पलीकडे असावं.. क्षितिजावर..नेमकं कुठून..सुरू होतंय नी संपतय..
डावीकडून उजवीकडे..की उजवीकडून डावीकडे कळत नव्हतं.पण मन आनंदून गेलं..आनंदाच्या भरात ते थेट ओल्या मनातच रुतलं... रुजलं.
आणि अंतरंगात परमेश्वराने आनंदाचे सुबक,सुंदर भावनांचे एक मोरपीस प्रत्येकाच्या हृदयात ठेवलेले असते.. त्यात सप्तरंग  उगवले...जणू काही इंद्रधनु ची आता मोरपंखी इंद्रधून होऊन
तानेसह       साकारलेली
नादासवे      रेखलेली
पिसातील    गर्द
हिरव्या        मखमलीत 
निळेपणाने   पसरलेली
पारलौकिक  धन्यतेकडे 
जाणारी       नी
स्पंदनात ऐकू येणारी सरगम..त्या पिसाकडे नुसतं तुम्ही पाहिलं की ती ऐकू येईल.
आणि ती तुम्हाला ऐकवल्याशिवाय मला समाधान मिळणार नाही.
तुमचा हा क्षण सुरंगी आणि सुरेल होऊन जाईल एवढं मात्र नक्की.
लेखन:मुकुंद इंगळे 
http://manmukta.blogspot.com/

Friday, August 30, 2024

एक शाम रसिली...रफिली..!

एक शाम रसिली...रफिली..!

वो एक हसीन शाम थी..मुझसा दिवाना जिसके ऊपर लाख निगाहें ठहरी थी..तेरे मेरे सपने मुझे कवी बना रहे थे...जब रुख से नकाब तूमने हटाया और मैने चौदाहवी का चांद दिल के झरोखेसे देखा.. तुम्हारे रंग और नुर की बारात जिंदगी का साथ निभाते निभाते... मन में चली आयी. ऐसा मौका फिर से मिले इसलीये तो मैने प्रेम पत्र लिखकर मेरे मन में नाचने वाले मोर से परदा हटाया था...
तबसे तुम्हे पुकारता चला आया...तेरी प्यारी सुरत को मेरे लिखे खत मे  ढालते समय सर चकरा ना जाता तो ही तू इस तरहसे दर्द ए दिल से क्या हुवा तेरे वादोंको ये बार बार देखके..मेरे प्यार के सितारे बदन से लपेटकर.. आखिर तुम जो मिल गये ...तब मस्त बहारोंका आशिक बनके, तुम्हारा चांदसा रोशन चेहरा देखके ..अपने आपको कर चले हम फिदा..सिर्फ तुमपे...
इतनी हसीन वो एक शाम थी 
लेखन:मुकुंद इंगळे

Wednesday, August 28, 2024

समर्पण

चित्र वेध ( चित्र सौजन्य:अनामिक)

पूजा करताना एका विशिष्ट क्षणी मी देवाला फुल वाहिलं आणि डोळे मिटून त्याच्याकडे (की आत) पाहिलं.

मला आठवलं..ते फुल ताजे मिळवण्यासाठी सकाळी उठून गेलो होतो बाजारात..विविध फुलांतून हेच नेमके नजरेत भरले आणि आता वाहिले.

या संपूर्ण कृतीत माझं असं काहीच नाही. फुलं "त्याची ", फुलवाला "तो" स्वतः...ते आणणारा "त्याचीच" निर्मिती....तरी देखील एक गोष्ट उरते मनात त्या क्षणी.त्याने दिलेल्या मनातला समर्पण भाव.

उद्या हे फुल कोमेजून जाईल. उद्या कशाला..परवा मथुरेतली कृष्ण जन्माची चित्रे टीव्ही वर पहात होतो. सुंदर गर्द जांभळ्या रंगाची कमळे वाहिली जात होती....आणि दहाव्या मिनिटाला ती कुणीतरी तिथून उचलली आणि नव्या फुलांसाठी जागा केली.

कारण वाहिल्या क्षणी ती निर्माल्य झाली होती.एक समर्पणाचा क्षण त्या प्रत्येक वाहणाऱ्याला मिळून गेला होता...कायमचा.

या पार्श्वभूमीवर हा कृष्ण वेगळा भासतो...नेहमी देवाचे डोळे उघडे असतात आणि भक्ताचे मिटलेले ..

यात कृष्णाचे डोळे  मिटलेले आहेत...सुंदर फुल जवळ ठेऊन तो कुणाला वाहणार आहे ते ?एखाद्या राधेच्या की मीरेच्या सुंदर निरभ्र मनाला? तोच जाणे. 


समर्पित केलेल्या फुलाने दिलेला प्रत्येक क्षण आपल्याला अलिप्त करत असतो...बाह्य..भौतिक जगापासून.त्यामुळे तो क्षणही लक्षात नसतो ठेवायचा...फक्त दुरून तटस्थपणे तो क्षण कालौघात विरताना फक्त अनुभवायचा असतो.

म्हणून "मी" आणलेलं.."मी"  वाहिलेलं फुल "त्याला"अर्पण होतं तेव्हा "मी" उरत नाही मात्र "तो" त्या क्षणी "आत" येतो आणि त्याचे दर्शन घेण्यासाठी डोळे आपोआप मिटले जातात.




Saturday, August 24, 2024

प्राजक्त सडा

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
आपण देखील प्राजक्त असू...
अनामिक अलौकिक 
झाडावरून काळासवे ओघळणारा...
घरंगळताना आपणही करत असू  सुगंधाची लयलूट...
वाऱ्याच्या झुळूकीसवे..
कालचक्र ओलांडताना ..

मातीचा अलगद स्पर्श होईपर्यंतचेच जगणे असणारा...

मातीवर अनेक फुले पडतात त्याला सडा म्हणतात...
पण
प्रत्येक फुल पडताना एकएकटेच पडते... एकटे पडते..
काय गंमत आहे...
एकट्यालाही सडा च म्हणतात.
एक प्राजक्त सडा
एक विरक्त सडा
लेखन:मुकुंद इंगळे

Monday, August 19, 2024

तुम जो मिल गये हो...एक प्रवाह

तुम जो मिल गये हो

कातळाच्या आत जिथे प्रकाशाचे किरण सुद्धा पोहोचत नाहीत अशा ठिकाणी न दिसणाऱ्या झऱ्यातून थेंब थेंब सुर टपटपत असतात ...ते वाहू लागतात त्या क्षणी एका नदीचा जन्म होतो.ते ठिकाण दिसत नसते..ती जागा नेमकी आहे सुरस्वी मदन मोहन यांच्या अथांग,अनंत सुरावटीनी व्यापलेल्या मनात कुठेतरी. या थेंबांनी हलकेच वाजणारी सुरावट...सुरू होते सुंदर आवर्तनाच्या प्रवाहाने..ती या गान प्रवाहाला वाहतं करते.आणि प्रवाहाचे ओढा नंतर नदी असे प्रवाहित प्रत्यंतर झाल्याचे फक्त आपल्या जाणिवेला समजते...

आणि आपली समाधी भंग न करता त्यात रफीचा मधाळ आवाज ऐकू येतो...

तुम जो मिल गये हो..

पुन्हा चार थेंबाची सुरावट..

तो ये लगता है...

के  जहाँ मिल गया...ऐकताना एक परिपूर्ण..प्रसन्न आपल्याच नादात,लयीत वाहणारी नदी, पार्श्वसंगीतातून आपल्या मनात वाहू लागते.

एक भटके हुवे राही को, कारवाँ मिल गया...

वाहताना वाटेत येणाऱ्या लहान मोठ्या दगड पाषणांना रफीच्या आवाजातील चढ उतारांनी अभिषिक्त करत पुढे जात असतो..आणि एक pause... तो खास आधीचे प्रवाह रूप क्षणभर आठवण्यासाठी घेतलेला..आणि सोबत सुरू होते मेघगर्जना आणि प्रचंड सुंदर पाऊस...जो शेवट पर्यंत आपल्याही मनाला चिंब भिजवत रहातो.

पुन्हा वाहणे सुरू होते

तुम जो....

पुढे 

बैठो ना दूर हमसे..मधील पहिले गायलेले "दूर" आणि नंतर गातानाचे "दूर" आपल्याला रफीच्या आणखी "जवळ" नेते आणि त्या प्रवाहात सोबत घेऊन जाते आपल्या अस्तित्वासहित.

एका थेंबाने सुरू केलेल्या प्रवाहाला, कारवाँला आता "आसमाँ" मिळत असतो.

रफीचे हमिंग प्रवाहाची दिशा बदलल्याचे सूचित करते.वेग आणि आवेग वाढू लागतात आणि लय वाढते. आपली घालमेल वाढते वाढते..आणि एकदम सारं काही शांत होतं.

समुद्राच्या लाटा ढगांच्या गडगडाटात किनाऱ्यावर आदळत असताना दिसतात ..अन् फक्त दोन ओळींसाठी लता नावाची लाट आपल्यावर आदळते आणि अनावर सुखात पुन्हा भिजवून जाते.

पण पुन्हा प्रवाह मूळ लयीत येतो.

तुम क्या जानो तुम क्या हो... असं विचारणाऱ्या जलौघाला स्वागतार्ह सोबत मिळालेली असते.

पुन्हा रफीचे हमिंग... आणि वाहण्याची दिशा बदलते..लय वाढते.जणू डोंगरउतारा वरून पाणी बेधुंद सुसाट वाहते आहे.

नव्या आयुष्याची दिशा सापडल्यावर " कारवाँ मिल गया" तल्या गया वर अप्रतिम सुंदर लकेर घेऊन रफी आपल्याला तुडूंब आनंदात भिजवून गात रहातो.

पाऊस कोसळतच रहातो.

गाणं संपतच नाही...रफी लता कानात ऐकू येतच रहातात...आपल्या श्वासात भिनुन...स्पंदनात एकच लय शब्दरूप होऊन ऐकू येते...

तुम जो मिल गये हो

तो ये लगता हैं

के जहाँ मिल गया

लेखन: मुकुंद इंगळे 




Thursday, August 15, 2024

कंदील..काजळी...का जळी?

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

कंदील..काजळी...का जळी?

एक कंदील जळतो आहे.

देहाच्या सुबक चौकटीत दोन बाजूंनी...कर्म आणि श्रद्धा यांनी बद्ध केला गेलेला..

त्या दोन्ही बाजूंच्या वर सुख आणि दुःख याची दोन छिद्रे आहेत...त्यातून सहज निघू नये अशी अडकवलेली दैव नावाची गोलाकार कडी.... बहुधा वर कुठेतरी, विधात्याने प्राक्तनाच्या खिळ्याला लावून ठेवली असावी...सहज दिसत नाही..पण अंदाज लावू शकतो.

दोन बाजू खाली येतात तिथे अनाहत ज्ञान ऊर्जेचा स्रोत देणारे इंधन साठवण्याची छोटीशी टाकीवजा जागा आहे.इंधन पुरवठा नियमित रहावा यासाठी आत्मविश्वासाचा गोल (Goal) आकाराचा नियंत्रक आहे.

त्याच्या वरील बाजूस...जिद्दीची वात ओवून ठेवलेला प्रयत्नांचा बर्नर आहे. वात आणि बर्नर यांचे योग्य संयोजन जिद्दीचा जळताना अपव्यय टाळते.

एक काचेसारखा पारदर्शी,नितळ,नाजूक पण आजूबाजूच्या तप्त वातावरणात पण टिकून रहाणारा..मनाचा गोल.. इंधन टाकी आणि वरील कडी जोडणारा एक दुवा आहे.संस्कारांच्या नेटक्या दिसणाऱ्या तारांनी मनाला स्थित केले आहे.,स्थिर केले आहे.

वात जळताना आपले वर्तन,विषय विकार, विसंवाद,अविश्वास,गैरसमजामुळे काचेवर काजळी धरते..आणि कंदीलातील  प्रकाश यामुळे झाकोळला जातो.

तेव्हा त्या मनाला बाहेर काढून पुन्हा स्वच्छ..पुन्हा पुन्हा स्वच्छ करावे लागते.

एक सुंदर स्वच्छ नितळ काचेतून वात जळताना तेवणारा प्रकाश पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर पडतो.त्यालाही ऊर्जा देतो.

मात्र या साऱ्यात एक भाग महत्वाचे कार्य करतो.

वरच्या दोन बाजू आणि मनाच्या काचेच्या वरील भागात असलेले एक वायुविजन संकुल..ज्याला सगळ्या दिशांनी आरपार लहान लहान आनंद,छंद,भटकंती,संगीत असे झरोके असतात. त्यातून आतली तापलेली, ताण असलेली हवा बाहेर जाते आणि बाहेरील नवी ताजी हवा आत येते...कंदिलाच्या एकूण तापमानाचा समतोल राखते.

आपण देहाचे साधन वापरून जिद्दीच्या जळणाऱ्या तेजाची निर्मिती प्रयत्नांनी करत रहावी. बाहेरील जगाशी आणि आतल्या जगाशी समतोल साधावा..

मनावरची काजळी नित्य काढत रहावी.

(काजळी हा शब्दच जणू प्रश्न विचारतोय..की काचेवरील जमलेल्या काजळीतून जर प्रकाश बाहेर जाणार नसेल तर तू का जळी ? का जळतो आहेस?) 

देहाचा कंदील विधात्याने इथे वापरण्यासाठी.. दिलाय.पण एक दिवस इंधन संपेल.

त्याने देताना जितका स्वच्छ, नीट दिला होता तसाच त्याला परत द्यायला हवा ना.

बाकी आयुष्यभर आपण जळताना दिलेल्या प्रकाशाचे आणि काजळीचे सुद्धा रेकॉर्डस तो ठेवतो आहे ...त्याच्या दैनंदिनीत.

कदाचित तेच आकाशिक रेकॉर्डस असावेत.

लेखन: मुकुंद इंगळे 

Friday, June 21, 2024

संगीत

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
संगीत
हृदयाच्या डोंगरातून मनात अनाहत कोसळणारा धबधबा म्हणजे संगीत.
ज्यात भावनांचे आल्हाददायी आलाप असतात..
वेदना विसरवणारे राग असतात..
सतत प्रसन्नता वाटेल अशा हरकती असतात.. 
बेधुंद करणाऱ्या तल्लीनतेच्या अनुभूती असतात...
आनंदाच्या लक्ष्यवेधी तानांचा कल्लोळ असतो...
स_तत
र_हावी 
ग_र्द 
म_नात वहात,वाजत...
असं जे मुग्धपणे लुब्ध होऊन ऐकताना वाटते ते स्पंदन... मन जिवंत असण्याचे एकमेव प्रमाण...
कारण हृदयाचे मनात ऐकू येणारे स्पंदन म्हणजे संगीत.
मुकुंद इंगळे

संगीत दिनाच्या हार्दिक शुभेच्छ

Tuesday, June 18, 2024

थेंब अस्तित्वाचा

चित्र वेध (चित्र सौजन्य:श्री प्रकाश पिटकर)

थेंब अस्तित्वाचा

सुंदर पावसाळी हवा आहे...हिरव्यागार रमणीय परिसरात...पण जंगलात दूर कुठेतरी..कधीतरी.. एका डोंगराच्या उतरंडीवर रुजलेले हे झाड..त्याची नाजूक फांदी आणि  त्या नाजूक फांदीवर चार फुलांना चैतन्य देत ओघळणारा सुंदर थेंब..."या" नेमक्या क्षणी टिपलेला...मी.

खूप उंचीवरून ..ढगातून मी पावसाचा होऊन खाली आलो.आम्ही खूप जण होतो. लंपनच्या (संदर्भ वनवास: लेखक प्रकाश संत)च्या भाषेत....साडे सत्तावन कोटी थेंब होतो. वेगाने वेड्यासारखे फक्त आयुष्यभर वहात राहिलो. झाडांचे बुंधे,विविध आकारांचे दगड,कातळ ..कधी धबधबे होऊन कधी नदी होऊन तर कधी ओढा.

असंच वाहताना या झाडावर आलो... वाहणे संपून ओघळणे सुरू झाले.पुढच्या क्षणी काय? पुनर्जन्म की परत वहात राहणे.

नीट विचार केला तर लक्षात येईल..मानवी आयुष्याचा प्रवास या थेंबाने केलेला आहे..आयुष्यभर चारी दिशांना चैतन्य देऊन प्रवाहित राहिला आणि आता "तो" क्षण आलाय...

मातीत पडला तर झिरपून जाईल...उन्हात एक क्षण चमकून वाफ होऊन जाईल... न जाणो खाली डोह असला तर त्या पाण्याशी एकरूप होऊन जाईल...जे काही होईल ते पुन्हा नवे अस्तित्व धारण करण्यासाठीच.

थेंबात चैतन्य असते. चैतन्याचा कधी लोप होत नाही.

लेखन: मुकुंद इंगळे 

Sunday, June 16, 2024

इंद्रधनुष्य

चित्र वेध (चित्र सौजन्य:श्री प्रमोद ओरपे)


इंद्रधनुष्य


मस्त ढगांनी आच्छादलेली होऊ घातलेली ओलसर संध्याकाळ...किंवा सकाळ.

आकाशात अवतरलेले नितांत सुंदर इंद्रधनुष्य...सृष्टीच्या सृजनशीलतेने गाठलेला परमोच्च सौंदर्य क्षण. वाहता वारा,कोणत्याही स्वरूपाचा पाऊस,प्रकाश,अंधार,सागर,नद्या,डोंगरदऱ्या,

सुर्य,चंद्र,तारे आणि असिमित असणारे... कधी आकाश तर कधी आभाळ अन असंख्य आकाशगंगा....

या विश्व पसाऱ्यात आपल्या सूक्ष्म बिंदुरुप पार्थिव अस्तित्वाची जाणीव करून देणारे वास्तव...पण त्याच क्षणी या सर्व गोष्टी बघण्याची,अनुभवण्याची, कुवतीप्रमाणे जाणून घेण्याची क्षमता असलेले आपले मन...कधी कधी कुतूहल,उत्सुकता या पलीकडे जाऊन फक्त निवांतपणे अनुभवते...असे ते हे इंद्रधनुष्य.

पण ते दिसायला योग्य कोन तयार व्हावा लागतो..

पाण्याचे हवेतील सूक्ष्म थेंब आणि पाहणाऱ्याच्या पाठून येणारा सुर्य प्रकाश यांच्या संयोगाने सप्तरंगात ते फक्त दिसते.. कधीतरी दिसते.

पाण्याच्या थेंबांसारखी असंख्य माणसे आयुष्यात येतात. काळाच्या आभाळात अनुभवाचा सोबत पण पाठीमागून येणारा प्रकाश सर्वांवर पडतो. आपला दृष्टीकोन योग्य असला की ती व्यक्ती इंद्रधनुष्य होऊन आपल्याच मनावर,मनात सप्तरंगात उमटते...तशीच रहाते.

आकाशातील इंद्रधनुष्य मनाला आनंद देते ..माणसातील इंद्रधनुष्य आनंदाला मन देते.

लेखन:मुकुंद इंगळे 


Friday, June 14, 2024

DeLIGHTfully yours

PUN-day-MIc 
by Mukund Ingale 

DeLIGHTfully yours

Take it lightly..this is a bulb 

DELIGHTfully reflecting ur happiness. 

The phase of happines is directly connected to ur face.

The more happy u r...coil will radiate that much brightly. (U can check it right now)

This applies not only to this bulb but to all...who are wired to GLOBE..right now.

The uninterrupted power is provided by mind... the power station exists inside with n numbers of charged CELLs.

This happens only because happiness is the FEELament used ..that glows every moment..making it bright,brighter,brightest

Concept and creation

By Mukund Ingale

Sunday, June 9, 2024

चेहरे "चाळ"तांना..

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

चेहरे ' चाळ 'तांना 

चाळीचा फार थोडा भाग...दोन मजले .. पहिला आणि दुसरा इतकेच दिसताहेत. चाळ जुनी असावी ..पण अजून तरी राहण्यायोग्य असावी. वरच्या वीतभर पत्र्यावर किंचितसे आभाळ रेलले आहे एक झाडाच्या सोबतीने...एका खोलीच्या आजूबाजूचा रंग ..गडद हिरव्या पोपडे पडलेल्या खोलीच्या रंगापेक्षा ताजा,अलिकडला.. तरी साधारण वीसेक वर्षांपूर्वीचा असावा.. चाळीचे कठडे देखील जुने पुराणे.. स्वतः कसेबसे तग धरून उभे आहेत असे वाटणारे.

पाहताक्षणी लक्षात येईल अशी एकच गोष्ट आहे...वेगवेगळ्या दोऱ्यांवर वाळत घातलेले निरनिराळ्या रंगाचे कपडे.जणू चाळीचा चेहरा म्हणजे हे कपडे.

खरं तर प्रत्येकाचा चेहरा पूर्वी या चाळीसारखा होता..असावा.चालिरीतींच्या खोल्यात बालपण विहरत जाता जाता मित्र,नातेवाईक इत्यादी व्याप वाढत गेले असतील पण मनाची खोली चांगली असल्याने काही अडचण नाही आली.दैनंदिन वापराचे आणि मिरवायचे कपडे घेतले गेले असतील...ते विचारही असेच वाळत घातले जात असावेत. पाहणाऱ्याला,संपर्कात आलेल्याला ते स्वच्छ दिसतील...जुने असले तरी जीर्ण नाहीत, टाकण्याजोगे नाहीत हे खरे असले तरी कपडे पाहणाऱ्यांची नजर महत्वाची.संस्कारांचे कठडे आणि नातेसंबंधाच्या दोऱ्या हे विचारांची वसने वेगळ्या दिशांच्या दोरीच्या  "ओढीने " सांभाळत असतात. हळु हळु तेच चेहरा बनून जातात.वाळत घातलेल्या कपड्याआड चाळ इतकी झाकली जाते की.. ते कपडेच तिचा चेहरा..ओळख होऊन जातात.

विचारांची रंगीत वस्त्रे रंग माणसाच्या चेहऱ्यावर वाळत घातलेली दिसू लागतात.

वैधानिक इशारा: मात्र कधी कधी चाळीतल्या खोलीत उभ्या असणाऱ्या माणसाला समोरचे दिसत नाही.वाळत घातलेले कपडे...नव्हे विचार आड येऊ शकतात.

लेखन:मुकुंद इंगळे 

Saturday, June 8, 2024

ये दिल और उनकी...

चित्र वेध (चित्र सौजन्य: श्री प्रकाश पिटकर)

ये दिल और उनकी..

हा डोंगर प्रत्येक क्षणी असाच असतो..दिसतो.कधी कसा तयार झाला..तारीख वेळ याची काही नोंद नाही. तो फक्त असतो...स्थिर आणि असाच प्रत्येक क्षणी...आपण पाहू तेव्हा.

मात्र बदलते ते त्याचे रूप.

उन्हाळ्यात कोरडा...करडा..

पावसाळ्यात हिरवागार.. ओलावलेला..

थंडीत धुक्याने आच्छादलेला...

पण तो असतो इथेच..असाच काहीही न करता ..फक्त असतो.त्याची रूपे बदलण्याचे काम ऋतू करतात...त्याच्या वरून वहात जात मुशाफिरी करणारे ढग करतात.तो फक्त त्यांना अंगाखांद्यावर खेळू देतो आणि त्यांच्यावरील स्नेहापोटी त्यांना प्रतिसाद देतो.ढगांशी डोंगराचे वेगळेच नाते असते.

आपलं मन देखील असाच एक अविचल,निश्चल डोंगर असेल का? वरकरणी पाहता निष्क्रिय वाटणारं पण..

ये दिल और उनकी, निगाहों के साये 

मुझे घेर लेते, हैं बाहों के साये...या गाण्यासारखं .

आयुष्यात बदलत जाणाऱ्या सुख दुःखाच्या ऋतुंमध्ये आनंद अन् वेदनेच्या ढगांनी वेढले जाऊन,त्यांच्या सावलीत रूप पालटणारं .त्याला प्रतिसाद देणारं ..कधी रुक्ष तर कधी हिरवं होणारं..कधी नापीक तर कधी कोवळे कोंब,धूमारे फुटलेलं ...

आणि अनुभवांच्या हिवाळ्यात निवृत्तीने नित्य आच्छादलेले.

ढगांशी डोंगराचे वेगळेच नाते असते

लेखन: मुकुंद इंगळे 

Monday, June 3, 2024

मानसी

चित्र वेध
मानसी
जातेच आहेस तिथे तर...
बहुतेक उजवीकडे छोटे दार आहे ते उघड म्हणजे या ठिकाणी येशील.खूप सुंदर फुले असलेल्या तितक्याच सुंदर कुंड्या आहेत.त्यांना पाणी घाल..त्यांनाही फ्रेश वाटू दे जरा.
टेबलावरची मोठी फुलांची टोपली थोडी सरकव..नाहीतर चहाचा कप आणि किटली ठेवण्यासाठी जागा उरणार नाही. किटलीवर टिकोझी पण लागेल..वातावरण थंड आहे ...कपात चहा जास्त वेळ गरम नाही रहाणार.
खुर्चीत बसलीस तर समोरचे फक्त हिरवेगार डोंगर दिसतील...पण वाहतं पाणी नाही दिसणार.थोडी फिरवून घे डावीकडे.. दूरवरून संथ वाहणारा प्रवाह मनात निरव देखील वाहू लागेल.
सर्व रंगीत फुले,पाने झाडे...निसर्ग यांची प्रेमाने विचारपूस कर.
वाऱ्यामुळे झाडाच्या फांद्या हलतील...काही पाने उडून अंगावर पडतील.त्यांना झटकू नकोस..तू आल्यामुळे आनंदित झालेल्या झाडाची तुझे स्वागत करण्याची ती परंपरा आहे.राहू देत पाने तशीच.
समोर पाहता पाहता एक क्षण असा तुला जाणवेल की तू या पर्णफुलात फुलत आहेस..प्रवाह होऊन वाहते आहेस...डोंगर होऊन फक्त अविचल आहेस आणि या सर्वासहीत निळे अलिप्त निरभ्र आकाश होऊन चहा पीत निवांत  बसलेल्या कुमुदकडे पहाते आहेस.
एकतर तंद्री मोडेल किंवा चहा गार होईल...घे परत एक कप ओतून...निवांत निसर्गाचा उल्हसित करणारा एकेक  घोट घेत रहा.
मुकुंद इंगळे

Monday, May 13, 2024

चेतना

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

चेतना

सगळीकडे अंधार आहे ...एक दोन रस्त्यावरचे दिवे आणि तरीही सुसाट वेगाने धावणाऱ्या गाड्या.वेगामुळे गाडी कॅमेऱ्यात स्थिर टिपता पण येत नाही.पण वेगामुळे गाडीच्या दिव्याच्या प्रकाशाची शलाका मात्र अखंड दिसते.जणू दोन दिव्यांच्या प्रकाशाचे त्या क्षणी झालेल्या हालचालीचा आलेख.तोच तेवढा खरा.पुरेसा असतो अंधार नाहीसा करायला. प्रकाशाचा वेग आणि आवेग दोन्ही दिसतात चित्रात...अन् त्यामुळेच अंधाराची व्याप्ती देखील कळते.

अंतराळात जसा अंधार आहे तसाच शरीरात सुद्धा.एखादी रक्तवाहिनी मेंदूपर्यंत रक्त वाहून नेते अशाच अंधारात.पण तिथेही आत अंधार असला तरी सुप्त चैतन्य असते..असावे. रक्तवाहिन्यांसारखे जाणिवांचे ..कदाचित अंधारामुळे न दिसणारे जाळे पण शरीरात आहे. पंचेंद्रियानी टिपलेल्या अनुभवाचे, संवेदनेचे..प्रकाशात ..जाणिवेत रूपांतर केले जात असावे आणि मग त्या प्रकाशाची जाणिव मेंदूपर्यंत वाहून नेली जात असावी... क्षणोक्षणी..श्वास सुरू असेपर्यंत.

तुम्हाला फक्त एक स्थिर कॅमेरा लागेल..दुरून ते टिपण्यासाठी.नक्की हा वर आहे अगदी तसाच फोटो येईल.संवेदना वाहतानाचा..अगणित जाणिवांच्या प्रकाशाचा .

आनंद,दु:ख,वेदना इत्यादी अनेक संवेदना.. शरीरात सुसाट गाड्यांसरख्या फिरत असतात.

जर स्थिर मनाच्या कॅमेऱ्यात तटस्थपणे टिपल्या तर दिसतील त्या क्षणी. 

टिपल्याच नाही तरी त्यांचे वहन अहोरात्र होतच  राहील.

चेतनेचे असंख्य प्रकाशबिंदू मेंदूत लखलखत रहात असतीलच...हर क्षणी..!

लेखन:मुकुंद इंगळे 


Wednesday, May 8, 2024

ओ मेहेस्कूबा

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

ओ मेहेस्कुबा

पूर्ण तयारीनिशी आपली ही पाण्याखालची सफर सुरू आहे.हर क्षणी नवनवे अनुभवांचे प्रदेश दृष्टोपत्तीस येत आहेत.मनाचा विशाल पसरलेला अथांग समुद्र.कितीतरी खोल...अगम्य आहे.अजूनही ज्ञानाचा प्रकाश पोहोचू शकत नाही अशा अगणित जागा इथे आहेत. आणि विविध विचारांचे विशाल.. सर्वदुर पसरलेले प्रचंड कातळ...त्यांचेच डोंगर आणि दऱ्या.

अगणित छटांचे ..विविध भावनांचे लहान लहान ते देवमाशासारखे प्रचंड आकाराचे मुक्त संचार करणारे मासे आजूबाजूला संक्रमण करत आहेत.

षड्रीपूंच्याच्या लोभस हिरव्यागार वनस्पती, वेली त्यांची जंगले,शेवाळे...लहान मोठ्या प्रसंगांचे अनंत शंख शिंपले. जुन्या बुडालेल्या घटनांचे..भूतकाळाचे सांगाडे..

सारं काही पहातोय आपण...

व्यक्तिमत्वाचा स्कुबा सुट परिधान करून....सफर सुरू ठेवायची. पाठीवर कर्तृत्वाच्या प्राणवायूचा काही काळ पुरेल असा सिलिंडर आहेच.

पाण्यात अवरोध न होता शिताफीने,जलद,सहज हालचाल करता यावी यासाठी पायाला लावलेले पसरट..आजूबाजूच्या लोकांशी असणाऱ्या संपर्काचे,नात्याचे आकाराने मोठे फीन्स..पावले आहेत.

खोलवर जाताना वाढणाऱ्या दाबाला आणि एकूणच पाण्याखालच्या संचाराला नियंत्रित करण्यासाठी मेंदू नावाचा संगणकमीटर..

प्रत्येक गोष्ट नजरेला नीट,व्यवस्थित दिसावी...आणि पाहताना डोळ्यात, नाका तोंडात पाणी जाऊ नये म्हणून व्यवस्थित लावलेले  वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाचे हेल्मेट ...सगळं काही व्यवस्थित आहे.

थांबू नका... मनक्रमण करत रहा.

हेल्मेटवरचा प्रखर प्रकाश देणारी इच्छाशक्तीची विजेरी मात्र अहोरात्र 'ऑन'च असायला हवी.

आपण फक्त तटस्थपणे या स्कुबा सफरीचा आनंद घेत राहू..त्यातले साहस अनुभवत राहू.

लेखन: मुकुंद इंगळे 


Tuesday, May 7, 2024

स्वप्नाचा कंदील

चित्र वेध (चित्र सौजन्य: अनामिक)

स्वप्नाचा कंदील 

कधी कधी असं होतं..आपण काहीतरी शोधत असतो..ते न सापडता वेगळंच काहीतरी शोधण्याच्या जागी दिसतं...आणि ते नव्यानं पाहिल्यासारखे आपण हरखून जातो. कधी होतं असं?  

दिवसभराच्या थकव्यानंतर झोप मस्त लागते.कधीतरी अचानक पहाटे जाग येते...का जागे झालो काहीच कळत नाही. बाहेरच्या शोभिवंत कंदीलाचा प्रकाश, चंद्र किरणांसोबत अर्धवट उघड्या खिडकीतून झिरपत असलेला दिसतो. परत झोपेच्या शोधात डोळे बंद करून आपण ... फक्त असतो.

तेव्हा ना धड झोप ना धड जाग..अशा अवस्थेत अचानक...तर्काच्या साऱ्या कसोट्या सोडून डोळ्यासमोर एखादे सुंदर स्वप्न चित्रपटासारखे उलगडू लागतो.कधी आपण त्यातले पात्र रंगवतो..तर कधी फक्त प्रेक्षक असतो.

खरी जाग आल्यावर आपण ते स्वप्न पुन्हा..तसेच,तिथेच शोधतो..पण सुरेख हुरहूर लावणारे ते स्वप्न काही केल्या परत आठवत नाही.आपण अस्वस्थ होतो..पण उदास होत नाही....मात्र मनात रेंगाळणारी एक आनंददायी हुरहूर सतत सोबत रहाते. एक अनामिक समाधान असंच मनाला जाणवत राहतं.

अजून तसा थोडा अंधार असतो बाहेर... आपण ज्या स्वप्नाला मनात शोधत असतो त्याने या कंदीलाप्रमाणे रात्र बहरून आणि भारून टाकलेली  असते. शोभिवंत कंदीलासारखे...एक स्वप्न डोळ्यासमोर तरळून गेलेले असते.

कंदीलाभोवती फुलांनी घातलेल्या मोहक आणि आर्जवी मिठीप्रमाणे... एक सुंदर रात्र, मनासोबत प्रसन्नपणे गुरफटून गेलेली असते...केवळ न आठवणाऱ्या स्वप्नामुळे. 

लेखन:मुकुंद इंगळे 





Monday, May 6, 2024

फुलकित

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
फुलकीत 
आमचं असं काहीच ठरलेलं नसतं..कुणी आधी फुलायचं की एकत्र फुलायचं....आम्हालाही माहीत नसतं.या तळ्यात स्थिर वाटणाऱ्या पाण्याला वारा दुरून डोंगरावरून येऊन तरंग निर्माण करतो.तो वाहताना अंगावरून पुढे गेला की मोहरुन जातो आम्ही..फुलण्यासाठी मोहरणे आवश्यक असते. आनंदाच्या भरात ते मोहरणे आठवून हलकेच स्मित ओठावर येते.तुम्हाला वाटतं की पाकळ्या किलकिल्या झाल्यात..लवकरच आम्ही फुलणार.
पायाशी गुदगुल्या करणारं, कधी कधी हलणारे पाणी देखील सुखावह असते. पाकळ्यांचे स्मित आणखी खुलते.आणि..दिवस रात्र, काळ वेळ कुठलीही असताना तो क्षण येतो.मिटल्या, अर्ध्या खुललेल्या पाकळ्यांचे सुख त्या क्षणी अनिर्बंध होते..आणि एक फुल पूर्ण उमलते.
जे पाहणाऱ्याला आनंद देते ते स्वतः किती आनंदात जगत असेल. देठाशी जोडलेल्या फुलाला कधी हताश,मलूल पाहिलंय का कुणी.
या तळ्यासारखी अनेक तळी आसपास आहेत.नीट पहा स्वतःच्याच डोळ्यात.
सगळीकडे हे असेच होते.विविधरंगी फुले सहज त्यात कधीही फुलण्याच्या प्रक्रियेत रमलेली दिसतील.भावनेच्या तीव्रतेचे मनाकडून वाहत येणारे वारे तरंग निर्माण करतील.पायाशी असणारे आसक्तीचे पाणी...या मुळे तो क्षण कधीही उगवेल.
अन् डोळ्यांच्या तळ्यात एक अश्रूंचे फुल उमलेल.
भावना अनंत,तळी अनंत,फुलांचे रंग अनंत...फुल फक्त एकच...अश्रूंचे.
कधी आनंदाने उगवलेले..कधी आवेगाने.
लेखन: मुकुंद इंगळे

Saturday, May 4, 2024

3D

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

3D

काही वेळापूर्वी एक यान पांढऱ्या धुराची रेघ ढगांच्या अंगावर उमटवून आकाशात गेलं. ती रेघ आता अस्पष्ट होऊ लागली आणि एखाद्या ओरखड्यासारखी दिसू लागली आहे.

मी हे सर्व दुरून पाहताना हे चित्र द्विमितीय.. एकाच प्रतलावर पहात असतो.

ओरखड्याची खूण नाहीशी होईल थोड्या वेळात.काही कोटी मैलावरून इथे प्रकाश देणारा सुर्य...त्याच्या खिजगणतीत देखील हा पांढऱ्या धुराच्या खुणेचा प्रसंग नसेल...त्याला ढगांच्या थरांबद्दल,रचनेबद्दल काहीच माहीत नसेल.

हा सर्व फक्त या कोणातून पाहणाऱ्याच्या, माझ्या नजरेच्या मनाचा (की मनाच्या नजरेचा)खेळ आहे.

 मनात भक्तीचे, श्रद्धेचे विविधरंगी ढग दाटून येतात.आणि त्या अनेकविध पदरांतून मी श्रद्धास्थानाकडे ...म्हणजेच देवाकडे पहात असतो.

दुःखाचे एक यान कुठून तरी येते आणि वेदनेचा एक ओरखडा, चरा मनावर उमटतो.कालांतराने त्याची तीव्रता कमी होते.पण तो उमटतो तेव्हा त्या देवाचे किती काळ पूजन..खऱ्या भक्तीभावाने केले हे मी देवालाच सांगून ...जणू या यातना "तरीही" तू मलाच का दिल्यास असा व्यवहारी पण अव्यवहार्य..त्याला दोष देणारा.. प्रश्न विचारत असतो.

मन स्थिर करून या चित्राकडे नीट पाहिले तर त्रिमितीय उलगडा होतो यानाची रेषा,ढग यात अंतर असू शकेल...त्या सर्वापलिकडे सुर्य, नैमित्तिक माझ्या समोर आलेल्या ढगांबद्दल अनभिज्ञ असेल.

या सर्व दिसणाऱ्या गोष्टीतील अंतर.... 'अंतरा'तून त्याकडे पाहिले तरच दिसते.

सुर्य..माझा देव प्रकाशत राहीलच...मी जोपर्यंत 2D नजर 3D करत नाही...तोवर मी भक्तीच्या तुलनेत सुखाची नव्हे....तर दुःख न देण्याची प्रार्थना,अपेक्षा करत राहणार.

देवाची भक्ती,श्रद्धा याचा आपल्या वेदनेशी.. दुःखाशी कुठल्याच गुणोत्तराने संबंध नसतो.

देव,दैव आणि दुःख...या 3D चे आकलन मला हे चित्र देऊन गेले.

लेखन:मुकुंद इंगळे 


Wednesday, May 1, 2024

देखावा एक हॅपनिंग

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

देखावा..एक हॅपनिंग

थोडे थोडे पायवाटेने वर जात राहू...आधी त्या सुंदर बहरलेल्या झाडाजवळ पोहोचायचे आहे.तिथून परिसर आणखी सुंदर दिसेल...मन उल्हसित होईल.थकवा निघून जाईल..मन रिचार्ज होईल.

निळ्याशार मनाच्या पार्श्वभूमीवर विचारांचे शुभ्र ढग आपापल्या गतीने सरकत राहतील..आकार बदलत राहतील.

त्याच मनाचा दुसरा भाग असलेली, कर्तृत्वाने हिरवीगार बहरलेली जमीन..टेकडी, जवळून पाहताना ओबडधोबड दिसते.पण लांबून खूप विलोभनीय दिसते..तिथल्या वर खाली नेणाऱ्या पायवाटा सुद्धा दिसतात.

जितके आकाश तितकीच जमीन दिसते.

स्थिर वाटणारा जीवनाचा हा रम्य देखावा...जशी उंची गाठाल तसतसा बदलत जातो. आकांक्षांचे आकाश शुभ्र विचारांना खुणावत रहाते...आणि आपण लहान मोठ्या पायवाटा दैनंदिन,नित्य..दररोज न चुकता चढत राहतो..शुभ्र विचारांचे ढग हिरवाईत रूपांतरित करत राहतो.

बाजूच्या घरात..वेगवेगळ्या श्याम श्वेत विचारांसोबत, हृदय.. बरे वाईट परिमाण उपभोगत वस्तीला असते.

थंडीत चांगल्या उबेसाठी काही विचार जाळायची फायर प्लेस आत आहे.आणि त्याचा धूर विरून जाण्यासाठी मोठमोठी धुराडी, चिमण्या देखील.

काही विचार सांभाळून ठेवावे लागतात. ते असतात नसानसांत सांभाळलेले... धडधडण्यासाठी विचाराप्रज्वलन गरजेचे आहे. कदाचित यामुळेच फायर प्लेस ला hearth म्हणत असतील.जास्तीचा h for हरक्षणी अनुभवायला मिळणारे happening असावे.

धडधड नाही तर हा देखावाच अस्तित्वात नाही.

लेखन: मुकुंद इंगळे 

Sunday, April 28, 2024

वहिवट

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

वहिवट 

बाहेर प्रचंड उकडतंय...अंगाची तलखी होतेय.समोरच त्या भागात प्रचंड वट असलेलं सावलीचे दुकान दिसले.आणि काही मनाला मिळणाऱ्या विसाव्याच्या क्षणांच्या बदल्यात,मोबदल्यात झाडाखाली जाऊन उभा राहिलो.

झाडाकडे नीट पाहिल्यावर लक्षात आले की पूर्वीच्या पारंब्यांची आता एकेक विशाल फांदी झाली आहे...आणि अशा फांद्यानी मूळ खोड म्हटलं तर जखडून गेले आहे...म्हटलं तर मिठीत सामावून गेले आहे.नव्या पारंब्या उगवणे देखील सुरूच असावे. एकमेकांत गुंतून म्हणावे की गुंफून म्हणावे इतक्या फांद्यांनी झाड विस्तार पावत गेले होते...त्याचे सावलीक्षेत्र त्यामुळे आपोआपच विस्तारले जात होते.

माझ्या शरीराला आणि मनाला आता निवांत,उल्हसित वाटत होते.एकच प्रश्न होता?

झाड सावल्या का विकत होते?झाडाला मला मिळणाऱ्या विसाव्याच्या क्षणात का स्वारस्य होते?

खरं तर ते ही झाडाने दिलेलेच तर होते.पण झाडाखाली उभे राहण्यासाठी झाडानेच मला नवे नाते दिले होते...त्याची व्याप्ती मला त्या नात्याचा विचार करायला लावत होती.मला तिथून हलावेसे वाटत नव्हते.

अजूनही जमिनीवर झिरपणारे काही चकाक उन्हाचे कवडसे हळूहळू सावली होऊन नाहीसे होत राहतील..जेव्हा

त्या टळटळीत उन्हात सावली देणाऱ्या झाडाच्या मनात माझ्या आणि त्याच्या नात्याची नवी पारंबी फुटली असेल कुठेतरी...

नात्यांच्या विविध पारंब्या आपले जीवन व्यापून टाकतात..नव्याने पारंब्या होत आणि जुन्या पारंब्यांच्या फांद्या होत होत...

झाड विकत असते काही विसाव्याचे क्षण..क्षणैक सहवास पण चालेल.. अशा कायमस्वरूपी नात्याच्या बदल्यात.

लेखन:मुकुंद इंगळे 


Friday, April 26, 2024

जंगल वाट

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

जंगलवाट 

हे जंगल अनंत आहे.

चालता चालता वेळ कसा जातो कळत नाही..जंगलाचा वातावरणात 

भरून राहिलेला थरार..आजूबाजूच्या झाडांवरुन ऐकू येणारे पक्षांचे 

दिवसभर कानावर पडणारे आवाज..त्यातील काही दूरवरून पण स्पष्ट 

ऐकू येतात...एखादा वाहणाऱ्या ओढ्याकाठचा..काही क्षण निवांत 

वाहणारे पाणी ऐकावे अशा मोहात,संमोहनात पाडणारा दगड..

कधी झुळूक तर कधी जोरात वाहणारा.. आणि झाडांमधून वाहताना 

बासरीचा आवाज काढत घोंगवणारा वारा.

निसर्ग नियमाप्रमाणे पानगळ सुरूच आहे...मला वाटते जितकी माणसे 

लयाला जातात तितकी पाने देव झाडाला देतो...आणि जितकी पाने 

गळतात..तितके नवे जन्म होत असावेत.

सगळं काही मस्त..तरी दोन प्रश्न उरतात. माझी दिशा बरोबर आहे का?

आणि दुसरा..मी काय गाठणार आहे इतके चालून?

दिशा असणारच बरोबर कारण दिशांची नावे फक्त स्थानसापेक्ष असतात 

खरं तर.त्यामुळे नावापेक्षा दिशा बरोबर सापडली हे "उत्तर" आधाराला घेऊन 

मी चालतो आहे.

गाठायचे काय? ...काहीच नाही.Aimless wandering बस.मग वाटचालीला अर्थ? 

कशाला हवा...त्याचा आग्रह कशाला हवा.

समोरची वाट मला सोबत घेऊन निघाली आहे...मी तिच्या सोबत जात राहणार...एवढेच सत्य.

मी..माझे अस्तित्व विरून..विसरून असाच चालत राहणार. 

मित्र,सख्यांची भरगच्च झाडे सभोवताली असलेल्या जंगलातून असाच चालत राहणार...

मनात त्यांनी दिलेल्या आनंदाची त्यांनीच गायलेली गाणी ऐकत...किंवा स्वतः गात.

हे काळाचे जंगल अनंत आहे...

लेखन: मुकुंद इंगळे


Tuesday, April 9, 2024

वेल डन

चित्र वेध

वेल डन 

रोजच्या धावपळीत मनाच्या शोभिवंत कुंडीत काही बीजे वाहून येतात.काही रुसतात तर काही रुजतात.रुजलेली स्नेहाच्या शिंपडण्याने सहवासाच्या मातीत उमलू लागतात.हळूहळू सुसंवादाच्याच्या खताने जोमाने वाढू लागतात.अन् एक दिवस त्यांना नात्याचे निळे निरभ्र आकाश दिसू लागते.नात्याची वेल आता मुक्तपणे  विश्र्वासाचा आधार घेत बहरू लागते..जाणाऱ्या काळानुरूप विश्वास वेगळ्याच उंचीवर तिला घेऊन जातो.तिला नवे धुमारे फूटतात आणि त्यांचीही पाती वेगळी फुलू लागतात.. वाढू लागतात.ती एकतर नात्याची नवी पिढी तयार होते...नाहीतर जुन्या नात्याचा नव्याने बहरलेला आविष्कार असतो. वेली बहरताना एकमेकांत गुंफत जातात..गुंतत जातात.रागाचे तण मात्र दिसताक्षणी काढून टाकावे लागतात.

आणि वेल छानपैकी बहरत रहाते.

मात्र मनात शोभिवंत कुंड्या अनेक असल्या तर त्यातून बहरलेल्या आयुष्यातल्या विविध नात्यांच्या वेलींकडे पाहताना एकच विचार मनात येतो.... 

वेल डन 

लेखन: मुकुंद इंगळे 


Sunday, April 7, 2024

उदबत्तीचे घर

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

उदबत्तीचे घर

हे एक घर आहे जे प्रत्येक घरात असतंच.त्यात राहणारा प्रत्येक जण मौनात स्वच्छंद... सुवासात फक्त जळत असतो.घराची अवस्था कधी कधी बदलते..परिस्थितीनुसार.कधी अर्धा बटाटा, केळी तर कधी शोभिवंत वस्तू...ज्यात तिघांच्या एकत्र जळण्याची सोय असते.तर कधी चांदीचे बनलेले एका उदबत्तीचा सोय असलेले उदबत्तीचे घर.लावली उदबत्ती की जळल्यानंतर उरलेली राख कधी अंगारा म्हणून मस्तकी लावायची तर कधी फेकून द्यायची..घर स्वच्छ धुवून घ्यायचे नव्या उदबत्ती साठी.

आपला जन्म होतो त्याक्षणी त्या घराचे रूपांतर उदबत्तीच्या घरात होते.आई आणि वडील या दोन उदबत्त्या अडकवून , खोचून घेतात स्वतःला कर्तव्याच्या छिद्रात.एकदाच काय ते त्यांचे आयुष्य हेलकावते...निसर्गदत्त मिळालेल्या त्या कोनाला पत्करून..आपल्या आयुष्याला सुवास यावा म्हणून मंद .. नि:शब्द फक्त जळत राहतात...त्यांच्या आपल्याप्रती असलेल्या लगडलेल्या प्रेमाच्या जाणिवेची राख होईपर्यंत.मग एक वेळ अशी येते की जळण्यासारखं काही उरत नाही.उरते फक्त काडी...सहज असा काडीमात्र उपयोग नसलेली. हे सगळं घडत असताना लक्षात येत नाही की आपण पण आता उदबत्त्या झालो आहोत. नि:स्वार्थी जाळण्यासाठी तयार.

महत्वाचे हे आहे की उदबत्ती चेतवण्यासाठी काडेपेटीची काडी काडेपेटीवर घासावी लागते.नुसत्या उदबत्तीने दुसरी उदबत्ती पेटवता येत नाही.

काडेपेटी म्हणजे हे जग..समाज... आतील काड्या ही आपल्या आजूबाजूची माणसं...ओळखीची किंवा अनोळखी.ती जळायला तयार असतात...अनंत दिवे चेतवत असतात.कळत नकळत आपल्यावर प्रभाव टाकत असतात.अनेकदा काड्या नीट पेटत नाहीत...तेव्हा काडेपेटी वायाही जाते.शाळेतले शिक्षक,कॉलेज मधील प्राध्यापक...आपले मित्र मैत्रिणी..सहकारी...नातेवाईक.. आपलं सारं भावविश्व...आपल्याला एक प्रभावी सुगंध देते आणि एक उदबत्ती तेव्हा दीर्घकाळ जळण्यासाठी सक्षम होते.

एक नवी उदबत्ती पुन्हा जळणार असते आणि स्वतःच्या कर्तृत्वाने उजळणार असते.

लेखन:मुकुंद इंगळे 


Saturday, April 6, 2024

लय विलय

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

लय विलय

हे चित्र स्थिर आहे..पाणी वाहताना दिसत नाही. बर्फाच्छादित शिखरांवरून येणारे वारे जाणवत नाहीत.झाडांची पाने हलत नाहीत.शोभिवंत खांबांच्या मध्ये तितकेच सुंदर कठडे आहेत. स्थिर असल्यामुळेंच टिपॉय वरील शुभ्र फुले पण कोमेजणार नाहीत.हे सर्व जणू काही थांबले आहे..निश्चल आहे.

कारण...

अजून मी तिथे पोहोचलो नाही.

मी जन्माला येताक्षणी हे चित्र सजीव होईल.ते माझे तीन मित्र ही येतील माझ्यासोबत.मला एकटे वाटू देणार नाहीत.माझ्या श्वासांनी झाडांची पाने हलू लागतील.जगण्याच्या सफरीत मला अडचणींचे अनेक डोंगर चढा उतरावे लागतील तेव्हा वाहणारे प्रयत्नांचे वारे मला उल्हसित करतील. जीवन प्रवाह वाहू लागेल.नैतिकतेच्या शोभिवंत खांबांमध्ये माझ्या भल्याबुऱ्या वर्तनाचे कठडे असतील.मात्र ती शुभ्र दिवसांची अन रात्रीच्या गडद हिरव्या देठांची फुले तेवढी मला रोज बदलावी लागतील.रात्रंदिवस माझे तीन मित्र सत्व,रज आणि तम...सोबत असतील ..भटकंती करत आम्ही इथे आलो असू आणि ते तिघे इथून निघून गेलेत.त्यांच्या रिकाम्या खुर्च्या आणि पुन्हा माझ्यासाठी निश्चल झालेले सारे जग ...तो क्षण मी टिपला आहे.

मला त्यात शोधू नका.

लेखन:मुकुंद इंगळे 


Monday, April 1, 2024

वाटणे

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

वाटणे

देवाची पण कमाल आहे.. माणसाला नेमकं का पाठवलय पृथ्वीवर..तेच कळत नाही.येताना भेट म्हणून सर्व काही ग्रहण करण्याची क्षमता असलेला मेंदू दिला आणि भावनांचा कल्लोळगुच्छ दिला.

मेंदू कुलुपाचे काम करतो तर भावना किल्ल्यांचे.

दैनंदिन आयुष्यात मेंदूला प्रश्न पडणारच...कुतूहलाची मास्टर की आणि विचारांची भावना,प्रश्न सुटण्यासाठी धडपड करायची भावना,चिकाटी,जिद्द या किल्ल्या लागतील. प्रत्येक प्रश्नाला वेगवेगळ्या किल्ल्या लागतील..आणि प्रश्नही असेच की ज्याला एकापेक्षा जास्त किल्ल्या लागतील ते कुलूप उघडायला.पण कुतूहलाची मास्टर की हवीच.

कधी कधी वाटतं की आपण कायम कुलुपच आहोत की काय? बालपण,तारुण्य, प्रौढत्व अशी वेगवेगळी कपाटे ..ज्ञान भांडाराने भरलेली जगताना उघडावी लागतात.तेव्हा मात्र आपण किल्ली होतो.

भेटणारी माणसे सुद्धा सुरुवातीला कुलूप असतात..सहवासामुळे मात्र नंतर खुशाल त्यांच्या किल्ल्यांच्या duplicate किल्ल्या  आपल्याला देतात. हवं तेव्हा त्यांच्या मनाचं कुलूप आपण उघडू शकतो.त्याच सोबत आपण कुणासाठी कायम कुलूपच राहायचं हे पण ठरवतात.

आपण जितक्या आपल्या किल्ल्या नाती,मैत्री,छंद अशा कपाटाच्या आत असलेल्या कप्प्यांना उघडायसाठी वापरू... वाटू....तितके "जाताना" बरेच प्रश्न सुटले,उत्तरे मिळाली ..अनेक कुलूपे उघडली याचे समाधान असेल.

कधी कधी यातील काही किल्ल्या हरवतात...तेव्हा त्याच्या duplicate ज्यांना दिल्यात ते येतात,धीर देतात आधार देतात...कुलूप उघडून मनाचे दार कीलकीले उघडते..पुन्हा नव्याने प्रश्न शोधायला,आपल्या किल्ल्या वाटायला.

गंमत म्हणजे वाटायला शब्द पण असा आहे की ज्यात मनाला वाटणे ही भावना आणि दुसऱ्याला देणे हे देखील आभिप्रेत आहे.

चला किल्ल्या वाटायला...नव्या नव्या प्रश्नांच्या  शोधात.

लेखन: मुकुंद इंगळे 









Saturday, March 30, 2024

व्हॅल्यू ऍडिशन

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

व्हॅल्यू ऍडीशन 

समोर वाफाळता कॉफीचा कप...चवीप्रमाणे हवी तेवढीच घातलेली साखर विरघळवण्याचे काम करून बाजूला ठेवला गेलेला चमचा..आता फक्त एकेक घोट घेत निवांतपणे कॉफी संपवायची.

विरघळणे...याला समानार्थी शब्द बहुधा नसावा.सामावून जाणे,एकरूप होणे हे जवळ जाणारे शब्द...पण हे ज्याबद्दल बोलले जातात त्याचे वेगळे अस्तित्व उरत नाही...असे दर्शविणारे हे शब्द आहेत.

विरघळणे हे त्यापलीकडचे असते...आपले अस्तित्व दुसऱ्यात मिसळून त्याच्या अस्तित्वाला नवा अर्थ, नवे परिमाण देते.

समोरचा कॉफीचा कप म्हणजे जीवन..समाधानाची पुरेशी साखर हाताशी आहे..पण ती नुसती कपात टाकून उपयोग नाही.चमच्याने ढवळावी लागेल.तरच तिचे अस्तित्व नाहीसे होऊन कॉफीच्या अस्तित्वाला चव येईल.

आपल्या अस्तित्वाला चव आहे कारण परमेश्वररुपी चमचा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आयुष्यात चांगल्या अर्थाने ढवळाढवळ करून त्याला अर्थ देतो.कधी मीठ तर कधी साखर.. कधी दुःख कधी आनंद..काळानुसार विरघळवत असतो.

मैत्रीची साखर त्यानेच वापरली..विविध नात्यांची,स्नेहाची साखर त्यानेच वापरली.विविध छंद,भटकंती हे पण साखरेचेच प्रकार..जिथे पाहू तिथे फक्त विरघळणे असल्यामुळे आयुष्याला चव आली आहे.

लता,आशा, किशोर,रफी,मुकेश,सुमन...अशा साखरेच्या अनंत जाती त्याने या कपात ओतल्या आणि विरघळवल्या नसत्या तर...!नको..कल्पना पण नको करायला.

खरंय की नाही?

चला मी कॉफी घेतोय आता.. येताय का कंपनी द्यायला?तुमच्या कंपनीची साखर लगेच विरघळेल बघा...

लेखन:मुकुंद इंगळे 

Thursday, March 21, 2024

स्वप्नाशा


चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

स्वप्नाशा 

किती सुंदर स्वप्न पडलं आज. एक पिवळ्या रंगाचा टवटवीत गुलाब…

घरातच उमललाय...आणि प्रसन्न मनाने त्याकडे पहात बसलोय.

हळू हळू मला जाग येतेय.गुलाब नजरेसमोर आहेच अजून..सोबत 

वास्तवाची फक्त एकच हिरवीगार खरखरीत फांदी... खरं तर 

गुलाबाच्या झाडाला असणारं पान हवं...पण साधारण कर्दळीला 

असते तसे एकच पान...अस्तित्वाचे..जाणिवेचे.

आणि फांदीचा देठ ऊर्जा मिळवतो आहे अर्ध्या भरलेल्या नियतीच्या 

पेल्यात असलेल्या पाण्यातून.

हे माझे स्वप्न परस्परांशी विसंगत वाटेल अशा गोष्टींनी पुरेपूर भरले आहे कदाचित…

पण ते मला गुलाब होऊन फुलण्याला प्रवृत्त करत आहे..विविध प्रकारे ऊर्जा देऊन.

कळत नाही स्वप्न आहे की मनात मोहरलेल्या नितनूतन आशेचं एक ताजे फुल..

मन होऊन उमललेलं 

लेखन:मुकुंद इंगळे 


Wednesday, March 20, 2024

बेंच मार्क

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

बेंच मार्क

अतिशय सुंदर नयनरम्य ठिकाणी मी एकटाच  आहे ...विशाल पसरलेल्या अनंत आकाशाच्या एका विस्तीर्ण अवकाशाखाली..शुभ्र मेघाच्छादित.समोर दिसत आहेत निश्चल भासणारी पर्वतांची एक रांग...हिरवळीने भारून गेलेली. मधे मधे पायवाटांची मेंदी की टॅटू अंगावर गोंदलेली.

आणि हे सर्व मी रोज पाहतो...अनुभवतो...सर्व ऋतू..कडाक्याची थंडी, रणरणते ऊन, सुस्वर वारा,सुखद झुळुका किंवा वादळी पाऊस.. अनिर्बंधपणे.

पायथ्याशी असणाऱ्या या रिसॉर्ट मधे नेहमी पर्यटक येतात...काही येतात जवळ आणि काही क्षण मी ही रमतो त्यांच्या सोबत.माझ्यासोबतचे गोठलेले काही क्षण मी त्यांना भेट म्हणून देतो..

या रम्य दृश्याला आकार येतो तो पर्यटकांच्या डोळ्यात...डोळ्यातून मनात साकार होते तो क्षण.तो क्षण मी त्यांना भेट देतो.ते खूष होतात.

ज्या दिवशी पर्यटक नसतील त्या दिवशी अस्तित्वच उरत नाही..कशाचच.

इथे आलो कधी...कुणी आणलं..आठवत नाही आता.रमून गेलो बघता बघता ...दुरून हे सुंदर दृश्य डोळे भरून पाहता पाहता त्याचाच एक भाग होऊन गेलो.

आज तुम्ही आलात..माझाही या देखण्या देखाव्यासोबत फोटो काढलात..त्याबद्दल धन्यवाद.

मी दिलेली भेट घेतली ना सोबत?

ऊन, वारा,पाऊस झेलत अजून किती काळ जाणार..ठाऊक नाही.त्यामुळे चिंता नाही.

आपण ही असेच आयुष्याचे सुंदर दृश्य पाहायला आलेलो पर्यटक आहोत...पाहता पाहता त्याचा भाग होऊन गेलो आहोत..सुख दू:खाचे ऊन्हा पावसाचे अनुभव घेत घेत... हळू हळू, या लाकडी अर्ध्या ओंडक्यासारखे...तटस्थतेकडे प्रवास करणारे.

तटस्थता हाच एक 'बेंच'मार्क आहे.

लेखन:मुकुंद इंगळे 

Saturday, March 16, 2024

मनो बिंब

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

मनोबिंब

फिरायला निघालो होतो...वाटेत कुठे तरी आरशांचे तुकडे पडलेले दिसले...यादृच्छेने... स्वैरपणे पडलेल्या त्या तुकड्यांकडे वरून..लांबून पाहताना आजूबाजूचा प्रकाश प्रतिबिंबित होत होता...आणि प्रत्येक तुकड्यात थोडा थोडा का होईना.. मी दिसत होतो.  नकळत मी एक तुकडा उचलला..जवळून पाहिले तर मी मलाच जवळून पाहिले त्यात.

आयुष्याच्या वाटेवर फिरताना आपल्याला भेटणारी माणसे या आरशाच्या तुकड्यासारखी असतात.

त्यांच्यात आपण स्वतःला थोडे थोडे दिसतो आणि पाहतो.काळजीपूर्वक, इजा होईल असे त्यांचे धारदार कंगोरे टाळून जवळ घेतो...मग आणखी जवळून स्वतःला त्यात पाहतो.

हळूहळू कंगोरे बोथट होतात आणि तो तुकडा मित्र की "मी"त्र बनून जातो.

माझे चालणे संपेपर्यंत हे असेच चालणार...चांगल्या अर्थाने कवितेची ओळ आठवत.."वाटेवरती काचा ग"...त्या उचलून..आयुष्याला डकवून ...आयुष्य शोभिवंत करत ..चालतच राहणार.

लेखन:मुकुंद इंगळे 




Wednesday, March 13, 2024

क्षणीकांचन योग

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

क्षणीकांचन योग

या बसा निवांत..सुंदर सूर्योदयाच्या साक्षीने...

मिटा डोळे...सर्वात प्रथम...कोणताही विचार मनात येण्या आधी कोणती व्यक्ती डोळ्यासमोर आली...तिच्याशी आपले कदाचित लौकिक नाते असेलही..नसेलही.पण अलौकिक नाते मात्र निश्चितच असेल...किती जुनी ओळख...नवी ओळख ...कुठलाच परिमाण लागू पडत नाही.

क्षणभर ती व्यापून गेली..व्यापून राहिली.सूर्याच्या किरणांसारखी...किरण एकेकटे करून सोडवता येत नाहीत...झाडाच्या फांद्यामुळे किरणे विभागल्यासारखी वाटतात नुसती.पण विभागलेल्या प्रत्येक किरणात अनामिक ऊब,धग,ऊर्जा तेवढीच असते.

क्षणभर कुणीतरी मनात प्रतिबिंबित होऊन गेलं ..जाणिवेची जांभळी फुले अवती भवती त्या क्षणी उगवली.

सुंदर उगवलेल्या सकाळच्या सोबत असीम सुंदर अस्वस्थता पण उगवली...दिवस जसजसा वर येईल..तशी ती इतकी वाढत जाईल.की निळ्याशार ओढीने हा तलाव असाच भरून राहील.

अनुत्तरित प्रश्न इतकाच राहील...ती व्यक्ती सहज अहेतुक का नजरेसमोर क्षणभर तरळली?

नका शोधू उत्तर...गुलजार म्हणालेत ते खरंय...

सिर्फ़ एहसास है ये रूह से महसूस करो

हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो

हा क्षण बराच रेंगाळला..वळूया पुढच्या क्षणाकडे..!

लेखन:मुकुंद इंगळे 





Monday, March 11, 2024

विचारहदारी

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

विचारहदारी

मी रस्ता आहे

कितीतरी लहान मोठ्या चारचाकी गाड्या, मोठाल्या बसेस , सायकल्स....रहदारी सुरू आहे. थांबायला कुणालाच आवडत नाही..म्हणून सिग्नल हिरवा झाल्याझाल्या हॉर्नचे कर्कश्श आवाज ऐकू येतात.

पण या सगळ्याला गती आहे.

ही रहदारी माझ्या मनातल्या विचारांची आहे.माझ्या मनात लहान चारचाकी,दुचाकी वाहनांसारखे सहज तात्काळ अंमलात आणाता येतील असे विचार ...किंवा काही काळ द्यावा लागेल असे बस सारखे मोठे विचार...याची रहदारी अहोरात्र सुरू आहे.

सिग्नलच्या खांबावर लाल दिवा लागतो तसा मी मध्येच विचारांना थांबवितो आणि त्यांचे काय करावे हे ठरवतो.नियमन करतो.सिग्नल हिरवा झाला की परत विचार वाहतूक सुरू.

कधी कधी अँब्युलन्स येते..तेव्हा बाकी विचार बाजूला ठेऊन, तातडीने हालचाल करून मेंदूला निर्णय घ्यावा लागतो...कारण अँब्युलन्स मधला विचार अत्यवस्थ असतो...अस्वस्थ करत असतो.

पण एक नक्की....इथे कुणी थांबत नाही...नव्या विचारांची अथवा विचारांची नवी वाहने सतत ये जा करत असतात.कुठे जातात ठाऊक नाही..नियमन करावेच लागते..नाहीतर पुढच्या पिढीची छोटी वाहने आणि मागच्या पिढीच्या ज्येष्ठ वाहने यातला समन्वय साधता येणार नाही.तो सांभाळावा लागतो.पण याच सर्व वाहनांच्या दिव्यांचा प्रकाश कधी उदास तर कधी उल्हसित करत असतो.सोबत वडीलधाऱ्यानी मनाच्या खांबांवर लावलेल्या दिव्यांचा प्रकाश..आणि तेच अनुभवीत मी दिवसरात्र इथेच असतो.

मी जणू रस्ता आहे.

लेखन: मुकुंद इंगळे 

Saturday, March 9, 2024

जागृत

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

जगातले, 

जग आतले की 

"जग" आतले

कोण जागे आहे?लक्ष्मी विचारते आणि जो जागा असेल त्याच्यावर कृपेचा वर्षाव करते.आज कोजागिरी आठवायचं खरं तर काहीच कारण नाही.पण वरचे तीन शब्द वाचले आणि मन अंतर्मुख झाले.

ज्योतिष थोतांड, विज्ञानाचा उगम पश्चिमेकडेच झाला आहे,मुहूर्त वगैरे काही नसतं, वास्तू शास्त्र म्हणजे वस्तू विकण्याची सोय इत्यादी आधुनिक शास्त्रकारांना हे अतर्क्य प्रश्न, कसलीही पडताळणी न करता, निदान विचारण्याची तरी सोय झाली...ती आपल्या पूर्वजांनी "आतले"जग जगताना पाहिले म्हणून.

त्यांनी आपापल्या "मी कोण"या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या पद्धती शोधल्या, मागे सोडल्या..आपण आज त्याला अध्यात्म म्हणतो.

त्या कुणीतरी जगताना आधी जगातले होऊन जगाकडे पाहिले...त्या व्यापाला माया म्हटले.

मग "आतले जग" नुसते पाहिले...तेव्हाच्या अनुभवाच्या प्रतिबिंबाला साक्षात्कार... म्हटले...

पण "आतले" पाहून मनाला मिळालेल्या तादात्म्याचा अनुभूती प्रमाणे जेव्हा "जग"णे सुरू झाले तेव्हा प्रश्नांची उत्तरे मिळत गेली...ते लिहीत गेले..सांगत गेले. आणि वेद शास्त्र पुराणाची निर्मिती झाली.

जो जगात आहे,जगत आहे..त्याची नुसती जागा आहे. 

जो जगात आहे,आनंदाने जगत आहे...त्याला जागेची, जगायची माया आहे..पण तो जागा नाही.

जगात आहे,जगत आहे पण कुतूहलाच्या जाणिवेतून जगत आहे ...की "आत" ले जग काय आहे? तो खरा जागा.

वरील तिन्हीपैकी साऱ्यांच्या मुळाशी एकच प्रश्न...

यांतील कोण जागे आहे?

मीच मलाच विचारलेला...!

कोण जागे आहे?

जगातले,

"जग" आतले की

..जग "आतले"

लेखन:मुकुंद इंगळे 


Tuesday, March 5, 2024

वेळवंट

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

वेळवंट 

मनाचे वाळवंट विशाल असेच पसरलेले असावे...अनेक थरांत... कसे आकाराला येत असतील हे आकार बदलणारे विविध थर?...विचारांचे वारे देत असतील का हे आकार?

उमेदीच्या रखरखीत उन्हात तापणारे वेळेच्या वाळूचे जगण्याच्या क्षणांचे कण..आयुष्याच्या संध्यासमयी,रात्री तितकेच थंडगार होत असावेत...

कुठे कुठे आशेच्या निवडुंगांची हिरवी रोपे ...खोलवर असलेल्या प्रयत्नांच्या पाण्याच्या आसपास.

तर जो जो मनाच्या जवळ येईल त्याला त्याला त्याचे स्वतःचे मैत्रीचे,नात्याचे,प्रेमाचे मृगजळ दिसेल...कदाचित ते देखील दिसणे बंद होईल एखाद्या विचारांच्या वादळाने थरांचा आकार,ही परिस्थिती बदलली तर..

वाळवंट तसेच राहील..पण थरांचा आकार बदलत राहील...

वेळ सतत बदलत असते...आपण वेळेनुसार बदललो तर स्थिरत्वाचा भास तयार होतो...आणि वाटतं की हे वाळवंट असंच होतं..असंच राहील पुढे देखील.

फिरणाऱ्यांचे वाळूत उमटलेले पायही कालांतराने दिसेनासे होतील..

काही असो..इतके गोजिरवाणे वाळवंट (खरं म्हणजे वेळवंट) प्रत्येकाच्या मनाचे,ज्याच्या त्याच्या मनातल्या मनात असते...असेच अथांग पसरलेले..

काहींच्या मनातल्या या वाळवंटात गेली अनेक वर्षे एक वाढता थर माझाही आहे..

ही किती मोहक गोष्ट आहे.

लेखन:मुकुंद इंगळे 


Sunday, March 3, 2024

ब्लॅक अँड व्हाइट मधे रंगलेले भाव विश्व

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

ब्लॅक अँड व्हाइट मधे रंगलेले भाव विश्व

आमची पिढी नशीबवान कारण लहानपणी ब्लॅक अँड व्हाइट चित्रपट यायचे..सुंदर गाणी त्यात असायची.पाहणाऱ्याला रंगांची अपेक्षा नसायची....कारण त्यातील रंग भरण्याचे स्वातंत्र्य त्याला

असायचे.साधना,नूतन,मधुबाला इत्यादी अनेक नायिका त्यावेळी प्रत्यक्ष समोर आल्या असत्या तर ओळखायला काही क्षण गेले असते इतक्या त्या ब्लॅक अँड व्हाइट रुपात डोक्यात वसतिगृह बांधून राहिलेल्या आहेत.

दुष्टपणा दाखवण्यासाठी वेगवेगळे पोशाख आणि अवतार केसांची स्टाईल यापेक्षा डोळे आणि देहबोली प्रभावीपणे वापरायचा प्राण.

 ब्लॅक अँड व्हाइट या दोन टोकांच्या रंगछटांमध्ये संपूर्ण आयुष्याचे रंग उलगडले जात होते.पडद्यावरील कथानकाच्या सादरीकरण,दिग्दर्शन,ब्लॅक अँड व्हाइट मध्ये शोभेल,उठून दिसेल असे कपडे कदाचित तत्कालीन वेशभूषाकार करत असतील.

जे जे म्हणून त्याकाळच्या चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये असतील त्यांनी या सर्व गोष्टींचा विचार केला असावा..आणि म्हणून पडद्यावर इतक्या उत्कृष्ट आणि प्रभावीपणे त्याचे सादरीकरण झाले असावे.

कागज के फूल सारखा ब्लॅक अँड व्हाइट मधील निव्वळ अप्रतिम सिनेमा म्हणजे ब्लॅक अँड व्हाइट सिनेमांच्या रत्नहारात मध्यभागी जडवलेला हिराच जणू.

चॅनल सर्फ करताना आजही  ब्लॅक अँड व्हाइट गाणे लागलेले दिसले तर पुढे जाताच येत नाही...आणि कधी निवांतपणे यू ट्यूब वर त्याचा आस्वाद घेता येतो.

त्यामुळे भावविश्वात फक्त ब्लॅक आणि व्हाईट  या दोन रंगांमधील नव्हे अवस्थांमधील सर्व छटा आहेत.त्यात पूर्वग्रहांचे रंग नसल्याने ते जास्त कायम जास्त खुलते आणि जुनी गाणी,चित्रपट पाहताना अतीव आनंद देते.

लेखन:मुकुंद इंगळे 


Sunday, February 25, 2024

सु - व्यत्यय

सु-व्यत्यय

काही काही अडथळे खूप रचनात्मक असतात.इथेच बघा ना .. सुर्याची सकाळची कोवळी किरणे या शुष्क झाडाने अडवली आणि त्या किरणांची प्रभा प्रसन्नतेने सुंदर होऊन गेली. जणू त्या राकट रांगड्या फांद्यांना किरणांची पाने आलीत आणि प्रकाशाचे झाड दिसू लागले.

मात्र हा नजारा पाहायला आपण त्यापासून योग्य अंतरावर असायला हवं.

भिंतीवर पडणाऱ्या प्रकाशाला दोन्ही हाताच्या बोटांनी अडथळा निर्माण करून भिंतीवर पडणाऱ्या छायेतून पक्षी, कुत्रा इत्यादी गोष्टी दाखवता येतात...हा देखील रचनात्मक अडथळा.ओडिशातील रावणछायाचा खेळ..किंवा भर उन्हात सावली देणारा वृक्ष किंवा वाहत्या पाण्याच्या प्रवाहात अडथळा आणू उडणारी कारंजी....अनेक उदाहरणे सापडतील.

सगळेच अडथळे प्रगती रोखत नाहीत...तर आपण योग्य अंतरावरून सकारात्मकतेने अनुभवले तर ते आयुष्यात आनंदही निर्माण करू शकतात.

लेखन: मुकुंद इंगळे


Friday, February 23, 2024

रि-डेव्हलपमेंट

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

रिडेव्हलपमेंट

सध्या पुनर्विकासाचे कितीतरी प्रकल्प येता जाता दिसतात.इमारतीला ३५-४०वर्षे झाली की पुनर्विकास करावा लागतो...सध्याचे रहिवासी तात्पुरते स्थलांतर करतात आणि मग ४-५ वर्षात नवी बहुमजली सुसज्ज इमारत तयार होते.मधल्या काळात साईट वर सभोवती लावलेले निळ्या रंगाचे पत्रे,लहान मोठे काँक्रीटचे मिक्सर,राबीट आणि प्रचंड धूळ.. एवढ्याच गोष्टी दिसत असतात.

इमारत जुनी झालेली असते,सतत दुरुस्तीची कामे निघतात...त्यामुळे पुनर्विकासाचा निर्णय घ्यावा लागतो.त्यालाही दोन पर्याय असतात...कुठल्यातरी बिल्डरकडून नवी इमारत सर्व कागदपत्रांची पूर्तता करून बांधून घेणे किंवा स्वयंपुनर्विकास करणे.

केवळ जुनी झाली म्हणून एखादी इमारत पुनर्विकसित करावी लागते.

आपलं मन आपल्यासोबत जन्माला येतं.. तितकंच दिवसागणिक वृद्ध होत जातं...त्याचां पुनर्विकास नको का करायला?

मनाच्या अशा साईटवर जुन्या विचारांचे राबिट सगळीकडे विखरून पडलेले,नव्या विचारांचे काँक्रिट मिक्सर सुरूच आहेत...मनात अनेक इमले चढणार तो भार सहन व्हावा म्हणून खोलवर पाया भरावा लागणार.नव्या मनात राहणार नवे विचार..तेच रहिवासी.मात्र विचार मनोवेगे कुठेही जाऊ शकत असल्याने लिफ्टची सोय नसली तरी चालेल.पार्किंगची मात्र हवी..कधी कधी आपल्याला अग्रक्रमानुसार त्यांना काही काळ पार्क करून ठेवावे लागेल...म्हणून पार्किंग हवं.

पण खरं तर मनाला अशा प्रकारच्या पुनर्विकासाची अजिबात गरज नसते...ते स्वतःहुन अद्ययावत होत असते.पालक गुरुजनांच्या कष्टांमुळे पाया नेहमीच भक्कम असतो.तात्पुरत्या विचारांचे भाडेकरू जास्त दिवस टिकत नाहीत...मात्र सण,उत्सव,परंपरा या सांस्कृतिक सार्वजनिक सोहळ्यात कायमचे उत्साही रहिवासी भाग घेतात.

अनुभवांचे मजले काळानुरूप चढत रहातात त्यामळे दृष्टीच्या बाल्कनीज मधून दिसणाऱ्या दृश्याचा कक्षा रुंदावतात.छंदांच्या उद्यानात प्रयत्नांच्या शोभिवंत प्रांगणात लावलेले गायन,वादन,चित्रकला इत्यादी वृक्ष जोमाने बहरतात.मनातले वातावरण नित्य ताजे ठेवतात.

मन म्हणजे एखादी जीर्ण होत जाणारी इमारत नव्हे..तर परमेश्वराने वेरूळ मधले, एका दगडात वरून कोरत आणलेले नक्षीदार,कलात्मक कैलासनाथ लेणे आहे...ते पुरातन होत नाही पण श्र्वासासोबत नित्य चिरंतन असते.

त्याची रि-डेव्हलपमेंट प्रत्येक क्षणी होत असते.

लेखन: मुकुंद इंगळे


Wednesday, February 21, 2024

नजर आणि दृष्टी

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
*नजर आणि दृष्टी*
कॅमेरा कधी कधी एखाद्या छायाचित्रातील जवळच्या गोष्टी स्पष्ट आणि मागील गोष्टी अस्पष्ट दाखवतो...त्यासाठी छायाचित्र काढताना भिंग, हव्या असलेल्या परिणामानुसार, मागे पुढे सरकवून काढावे लागते.
पण आपली दृष्टी,पाहताना दूर आणि जवळ असलेल्या गोष्टींमधील अंतर त्रिमिती स्वरूपात स्पष्टपणे दाखवते.

आपल्या मनाला या दोन्ही कला अवगत असतात....
एखादा ओळखीचा माणूस भेटला तर ते कॅमेऱ्याच्या भिंगाप्रमाणे...त्याचा आपल्याला माहीत असलेला भूतकाळ डोळ्यासमोर पार्श्वभूमी म्हणून काहीसा अस्पष्ट, पण नोंद घ्यावी लागेल इतके भान ठेवून त्याच्याशी वागते...
तेव्हा आपण *नजरेने* पाहतो त्याच्याकडे.

तर नव्याने ओळख होतांना...ओळखीच्या संदर्भांची ..वर्तमानातील काळाचे पदर...त्यातील अंतर...त्रिमितीय पद्धतीनुसार स्पष्टपणे उलगडते.
यावेळी आपण *दृष्टीने* पाहतो त्याच्याकडे.
समोरच्या माणसाला "आत" रजिस्टर करण्यासाठी आवश्यक असलेली ही KYC( Know Your Consciousness) प्रोसेस असावी बहुधा.
लेखन:मुकुंद इंगळे 

Tuesday, February 20, 2024

मनातलं जी मॅप

चित्र वेध

मनातलं जी मॅप

रोजच्या जगण्यात कितीतरी माणसे आपल्याला भेटतात..आपण त्यांच्या सहवासात कधी काही काळ अथवा दीर्घ काळ असतो...पण ती सारी आपल्यापर्यंत किंवा आपण त्यांच्या पर्यंत नेमके कसे पोहोचतो? आपण आपल्या मनाचे "जी" मॅप सतत वापरत असतो आणि त्या त्या माणसाकडे जाण्याचा मार्ग ते ॲप आपल्याला सतत दाखवत असते.एखादी व्यक्ती आपल्याला कशी भेटली याचा मनाच्या ड्राईव्ह मधे जतन केलेला लॉग काढून पहा.

सर्वप्रथम आपल्याला जवळचे मार्ग..जसे काही इव्हेंट...सहल,कार्यक्रम, ऑफीस इत्यादी गोष्टी दिसतील..जी व्यक्ति भेटली होती तिच्या ठिकाणी,विठ्ठलाला लावतो त्या गंधाच्या उलट आकाराची लोकेशनची लाल खूण दिसेल.तिथपर्यंत जायचे अनेक मार्ग दिसतील कदाचीत...पण तुम्ही भेटलात तोच जवळचा रस्ता आहे..होता हे तुमच्या लक्षात येईल.कुतूहल म्हणून एखाद्या इतर रस्त्याला निवडून पाहिलं तर त्या व्यक्तीकडे जाणारे आपल्या मित्रांचे पुल,व्यक्तित्वाचे टॉवर्स,प्रेरणेची शाळा कॉलेजेस..कर्तृत्वाची उद्याने..एकत्रित सम विचारांचे रिक्षा स्टँड, त्या मार्गावरील विचारांच्या वाहतुकीची वर्दळ इत्यादी गोष्टी दिसतील.आणि डावीकडे खाली तिथपर्यंत पोहोचण्याचा वेळ खरं तर दिसायला हवा.

आपण स्टार्ट पर्याय निवडून समोर येणाऱ्या मार्गाने वळणे घेत, निमित्ताच्या खुणा पहात,त्या प्रत्येक व्यक्तीजवळ गेलेलो असतो..जात असतो.विविध माणसांना मित्र,नातेवाईक,सहकारी...इत्यादी अनेक निमित्ताने भेटत असतो...पण त्यांच्या मनाने तुमची नोंद घेतल्यावर आपण खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीजवळ पोहोचतो.

मनाचा "जी"मॅप उघडुन पहा..किती जणांच्या "मन"या डेस्टिनेशनला आपण पोहोचलो आहोत...आणि किती वेळात.

लेखन:मुकुंद इंगळे 

Monday, February 19, 2024

"माळ"लेले गजरे

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

"माळ"लेले गजरे

किती छान प्रसन्न वाटतंय नुसतं या भरगच्च गजऱ्यांकडे पाहून.फुलला गंध असतोच..पण गजरा म्हणजे दोऱ्यात ओवलेला सुगंध.आता एकत्र दिसणारे गजरे थोड्या वेळात वेगवेगळे होतील आणि "त्याच्या" फक्त रोमांचक,प्रेमळ भावनेत गुंतून "तिच्या" केसात माळले जातील. हार आणि गजरा यात हा फरक आहे.हार अनेक भावनांमध्ये गुंतलेला असतो.त्यामुळे तो कधी घातला जातो तर कधी चढवला जातो. गजऱ्याचे तसे नाही...तो फक्त माळला जातो.

या प्रत्येक गजऱ्याचा दोरा वेगळा दिसत असला तरी "दोरा" म्हणून तो एकच आहे...आपल्या परमेश्वरासारखा.

प्रत्येक गजरा उद्या कोमेजणार आहे..पण तरीही तो दोघांच्या नात्यातला सुगंध नाजूक भावनेतून दरवळत ठेवेल...निदान गजरा माळण्याच्या क्षणापुरता तरी..आणि नंतर त्या क्षणाच्या जाणिवेतून...दिवस पुढे सरकेल.

निश्चितपणे अनिश्चित आयुष्य असूनही ते गुंफले गेल्यावर, एकमेकांच्या नात्याचा गुंता न करता...अलिप्त राहूनही परस्परांच्या सहवासात दरवळत रहातात.

फुले कोमेजून जातील,शेवटी फक्त गंधभारीत दोरा उरेल...पण मनात नात्याचा गुंफलेला गजरा कायम टवटवीत राहील.

लेखन: मुकुंद इंगळे 

Saturday, February 17, 2024

Flame-in-go

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

Flame-in-go

हे पक्षी खूप लांबचा प्रवास करून विस्तीर्ण जलाशयावर उतरतात...काही तिथेच रहातात...तर काही परत निघून जातात.काहींच्या पंख फडफडण्याचा आवाज येतो तर काही शांतपणे विहार करत रहातात.काही वरवर तरंगतात ..काही खोलवरचे पाहतात.

इतक्या संख्येने येत असले तरी एकमेकात गुंतत नाहीत.

त्यांचा थवा गुलाबी भासतो..जवळून पाहिले की त्यातल्या इतर छटाही नजरेस पडतात.

ते सतत काही ना काही हालचाल करतच असतात..स्थिर राहत नाहीत.

आकाशातून आलेले पक्षी पाण्यावर लाटा निर्माण करतात...आपल्या अस्तित्वाने ..बदलून टाकतात वातावरण...रात्रंदिवस.

आणि एक दिवस असा येतो की ते परत जातात...सारे काही शांत झाल्यासारखे वाटते. पण ते जिथे जातात तिथे वातावरण बदलते...

स्थलांतर हा त्यांचा स्थायीभाव असल्याने ते फिरतच रहातात...परत परत येतच रहातात.

विचारांचे हे पक्षी खूप लांबचा प्रवास करून मनाच्या विस्तीर्ण जलाशयावर उतरतात.

लेखन:मुकुंद इंगळे 

Friday, February 16, 2024

व्हेलेंटाईन डे

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
व्हेलेंटाईन डे 
तू ठेऊन गेलेली फुले दिसली आणि खुप छान वाटले.मन भूतकाळात परत गेले.कॉलेजच्या ग्रंथालयात आपली झालेली ओळख..काही मोजक्याच भेटीगाठी...नंतर तू लग्न होऊन कुठेशी निघून गेलीस.नंतर अजिबात गाठभेट नाही..बोलणे नाही.मोबाईल वगैरे गोष्टी अजून अस्तित्वात यायच्या होत्या तेव्हा.

आणि गेल्या वर्षी,अचानक तू एका कॉन्फरन्समधे दिसलीस..नंतर भेटलीस..याच रिसॉर्टमधे.. याच बेंचवर..फेब्रुवारीत.
आधी बराच वेळ आपल्यापैकी कुणीच बोलले नाही.नंतर आपण एकमेकांशी ..एकमेकांच्या तत्कालीन परिस्थितीवर बोललो..पण या संभाषणापेक्षा आधीचे मौन जास्त बोलके होते. परत दरवर्षी भेटू..इथेच असे ठरवून आपण मोबाईल क्रमांकाची अदलाबदल केली आणि आपापल्या दिशांना गेलो.
पुढच्या फेब्रुवारीत तुझा मेसेज आला आणि मी परत "कॉन्फरन्स"ला आलो.
बेंचवर फुले आणि तुझ्या पुस्तकात किल्ली ठेऊन तू गेली असशील..त्या फुलांना..किल्लीला तुझा परीसस्पर्श लाभला होता.त्याच रूम मधे तू काल राहिली होतीस...कालच व्हेलेंटाईन डे होता.
आज मीही तिथेच राहीन..रात्री तू भेट म्हणून दिलेलं रॉय किणीकरांचं रात्र उत्तररात्र वाचण्याचा प्रयत्न करत..तुझ्या त्याच जुन्या आठवणीत रमून जाईन.. सकाळी सज्जात उभे राहून ताज्या कॉफीचा वाफाळता कप घेऊन मी समोरच्या दरीकडे पहात उभा असेन...मोबाईल वर रफी माझ्यासाठी गात असेल..लाल पत्थर मधलं गाणं...आणि माझ्यासोबत ते ऐकायला दरीतून धुकं वरती येत असेल..
उनके खयाल आये,आके चले गये..
दीवाना जिंदगी को बनाके चले गये
दरी अशीच कायम राहील..पण धुकं मात्र पुन्हा पुन्हा नजरेसमोर येत राहील
परत भेटूच(?)पुढच्या वर्षी.
लेखन:मुकुंद इंगळे