3D
काही वेळापूर्वी एक यान पांढऱ्या धुराची रेघ ढगांच्या अंगावर उमटवून आकाशात गेलं. ती रेघ आता अस्पष्ट होऊ लागली आणि एखाद्या ओरखड्यासारखी दिसू लागली आहे.
मी हे सर्व दुरून पाहताना हे चित्र द्विमितीय.. एकाच प्रतलावर पहात असतो.
ओरखड्याची खूण नाहीशी होईल थोड्या वेळात.काही कोटी मैलावरून इथे प्रकाश देणारा सुर्य...त्याच्या खिजगणतीत देखील हा पांढऱ्या धुराच्या खुणेचा प्रसंग नसेल...त्याला ढगांच्या थरांबद्दल,रचनेबद्दल काहीच माहीत नसेल.
हा सर्व फक्त या कोणातून पाहणाऱ्याच्या, माझ्या नजरेच्या मनाचा (की मनाच्या नजरेचा)खेळ आहे.
मनात भक्तीचे, श्रद्धेचे विविधरंगी ढग दाटून येतात.आणि त्या अनेकविध पदरांतून मी श्रद्धास्थानाकडे ...म्हणजेच देवाकडे पहात असतो.
दुःखाचे एक यान कुठून तरी येते आणि वेदनेचा एक ओरखडा, चरा मनावर उमटतो.कालांतराने त्याची तीव्रता कमी होते.पण तो उमटतो तेव्हा त्या देवाचे किती काळ पूजन..खऱ्या भक्तीभावाने केले हे मी देवालाच सांगून ...जणू या यातना "तरीही" तू मलाच का दिल्यास असा व्यवहारी पण अव्यवहार्य..त्याला दोष देणारा.. प्रश्न विचारत असतो.
मन स्थिर करून या चित्राकडे नीट पाहिले तर त्रिमितीय उलगडा होतो यानाची रेषा,ढग यात अंतर असू शकेल...त्या सर्वापलिकडे सुर्य, नैमित्तिक माझ्या समोर आलेल्या ढगांबद्दल अनभिज्ञ असेल.
या सर्व दिसणाऱ्या गोष्टीतील अंतर.... 'अंतरा'तून त्याकडे पाहिले तरच दिसते.
सुर्य..माझा देव प्रकाशत राहीलच...मी जोपर्यंत 2D नजर 3D करत नाही...तोवर मी भक्तीच्या तुलनेत सुखाची नव्हे....तर दुःख न देण्याची प्रार्थना,अपेक्षा करत राहणार.
देवाची भक्ती,श्रद्धा याचा आपल्या वेदनेशी.. दुःखाशी कुठल्याच गुणोत्तराने संबंध नसतो.
देव,दैव आणि दुःख...या 3D चे आकलन मला हे चित्र देऊन गेले.
लेखन:मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment