Tuesday, May 7, 2024

स्वप्नाचा कंदील

चित्र वेध (चित्र सौजन्य: अनामिक)

स्वप्नाचा कंदील 

कधी कधी असं होतं..आपण काहीतरी शोधत असतो..ते न सापडता वेगळंच काहीतरी शोधण्याच्या जागी दिसतं...आणि ते नव्यानं पाहिल्यासारखे आपण हरखून जातो. कधी होतं असं?  

दिवसभराच्या थकव्यानंतर झोप मस्त लागते.कधीतरी अचानक पहाटे जाग येते...का जागे झालो काहीच कळत नाही. बाहेरच्या शोभिवंत कंदीलाचा प्रकाश, चंद्र किरणांसोबत अर्धवट उघड्या खिडकीतून झिरपत असलेला दिसतो. परत झोपेच्या शोधात डोळे बंद करून आपण ... फक्त असतो.

तेव्हा ना धड झोप ना धड जाग..अशा अवस्थेत अचानक...तर्काच्या साऱ्या कसोट्या सोडून डोळ्यासमोर एखादे सुंदर स्वप्न चित्रपटासारखे उलगडू लागतो.कधी आपण त्यातले पात्र रंगवतो..तर कधी फक्त प्रेक्षक असतो.

खरी जाग आल्यावर आपण ते स्वप्न पुन्हा..तसेच,तिथेच शोधतो..पण सुरेख हुरहूर लावणारे ते स्वप्न काही केल्या परत आठवत नाही.आपण अस्वस्थ होतो..पण उदास होत नाही....मात्र मनात रेंगाळणारी एक आनंददायी हुरहूर सतत सोबत रहाते. एक अनामिक समाधान असंच मनाला जाणवत राहतं.

अजून तसा थोडा अंधार असतो बाहेर... आपण ज्या स्वप्नाला मनात शोधत असतो त्याने या कंदीलाप्रमाणे रात्र बहरून आणि भारून टाकलेली  असते. शोभिवंत कंदीलासारखे...एक स्वप्न डोळ्यासमोर तरळून गेलेले असते.

कंदीलाभोवती फुलांनी घातलेल्या मोहक आणि आर्जवी मिठीप्रमाणे... एक सुंदर रात्र, मनासोबत प्रसन्नपणे गुरफटून गेलेली असते...केवळ न आठवणाऱ्या स्वप्नामुळे. 

लेखन:मुकुंद इंगळे 





No comments:

Post a Comment