चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
ओ मेहेस्कुबा
पूर्ण तयारीनिशी आपली ही पाण्याखालची सफर सुरू आहे.हर क्षणी नवनवे अनुभवांचे प्रदेश दृष्टोपत्तीस येत आहेत.मनाचा विशाल पसरलेला अथांग समुद्र.कितीतरी खोल...अगम्य आहे.अजूनही ज्ञानाचा प्रकाश पोहोचू शकत नाही अशा अगणित जागा इथे आहेत. आणि विविध विचारांचे विशाल.. सर्वदुर पसरलेले प्रचंड कातळ...त्यांचेच डोंगर आणि दऱ्या.
अगणित छटांचे ..विविध भावनांचे लहान लहान ते देवमाशासारखे प्रचंड आकाराचे मुक्त संचार करणारे मासे आजूबाजूला संक्रमण करत आहेत.
षड्रीपूंच्याच्या लोभस हिरव्यागार वनस्पती, वेली त्यांची जंगले,शेवाळे...लहान मोठ्या प्रसंगांचे अनंत शंख शिंपले. जुन्या बुडालेल्या घटनांचे..भूतकाळाचे सांगाडे..
सारं काही पहातोय आपण...
व्यक्तिमत्वाचा स्कुबा सुट परिधान करून....सफर सुरू ठेवायची. पाठीवर कर्तृत्वाच्या प्राणवायूचा काही काळ पुरेल असा सिलिंडर आहेच.
पाण्यात अवरोध न होता शिताफीने,जलद,सहज हालचाल करता यावी यासाठी पायाला लावलेले पसरट..आजूबाजूच्या लोकांशी असणाऱ्या संपर्काचे,नात्याचे आकाराने मोठे फीन्स..पावले आहेत.
खोलवर जाताना वाढणाऱ्या दाबाला आणि एकूणच पाण्याखालच्या संचाराला नियंत्रित करण्यासाठी मेंदू नावाचा संगणकमीटर..
प्रत्येक गोष्ट नजरेला नीट,व्यवस्थित दिसावी...आणि पाहताना डोळ्यात, नाका तोंडात पाणी जाऊ नये म्हणून व्यवस्थित लावलेले वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाचे हेल्मेट ...सगळं काही व्यवस्थित आहे.
थांबू नका... मनक्रमण करत रहा.
हेल्मेटवरचा प्रखर प्रकाश देणारी इच्छाशक्तीची विजेरी मात्र अहोरात्र 'ऑन'च असायला हवी.
आपण फक्त तटस्थपणे या स्कुबा सफरीचा आनंद घेत राहू..त्यातले साहस अनुभवत राहू.
लेखन: मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment