Monday, May 13, 2024

चेतना

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

चेतना

सगळीकडे अंधार आहे ...एक दोन रस्त्यावरचे दिवे आणि तरीही सुसाट वेगाने धावणाऱ्या गाड्या.वेगामुळे गाडी कॅमेऱ्यात स्थिर टिपता पण येत नाही.पण वेगामुळे गाडीच्या दिव्याच्या प्रकाशाची शलाका मात्र अखंड दिसते.जणू दोन दिव्यांच्या प्रकाशाचे त्या क्षणी झालेल्या हालचालीचा आलेख.तोच तेवढा खरा.पुरेसा असतो अंधार नाहीसा करायला. प्रकाशाचा वेग आणि आवेग दोन्ही दिसतात चित्रात...अन् त्यामुळेच अंधाराची व्याप्ती देखील कळते.

अंतराळात जसा अंधार आहे तसाच शरीरात सुद्धा.एखादी रक्तवाहिनी मेंदूपर्यंत रक्त वाहून नेते अशाच अंधारात.पण तिथेही आत अंधार असला तरी सुप्त चैतन्य असते..असावे. रक्तवाहिन्यांसारखे जाणिवांचे ..कदाचित अंधारामुळे न दिसणारे जाळे पण शरीरात आहे. पंचेंद्रियानी टिपलेल्या अनुभवाचे, संवेदनेचे..प्रकाशात ..जाणिवेत रूपांतर केले जात असावे आणि मग त्या प्रकाशाची जाणिव मेंदूपर्यंत वाहून नेली जात असावी... क्षणोक्षणी..श्वास सुरू असेपर्यंत.

तुम्हाला फक्त एक स्थिर कॅमेरा लागेल..दुरून ते टिपण्यासाठी.नक्की हा वर आहे अगदी तसाच फोटो येईल.संवेदना वाहतानाचा..अगणित जाणिवांच्या प्रकाशाचा .

आनंद,दु:ख,वेदना इत्यादी अनेक संवेदना.. शरीरात सुसाट गाड्यांसरख्या फिरत असतात.

जर स्थिर मनाच्या कॅमेऱ्यात तटस्थपणे टिपल्या तर दिसतील त्या क्षणी. 

टिपल्याच नाही तरी त्यांचे वहन अहोरात्र होतच  राहील.

चेतनेचे असंख्य प्रकाशबिंदू मेंदूत लखलखत रहात असतीलच...हर क्षणी..!

लेखन:मुकुंद इंगळे 


No comments:

Post a Comment