फुलकीत
आमचं असं काहीच ठरलेलं नसतं..कुणी आधी फुलायचं की एकत्र फुलायचं....आम्हालाही माहीत नसतं.या तळ्यात स्थिर वाटणाऱ्या पाण्याला वारा दुरून डोंगरावरून येऊन तरंग निर्माण करतो.तो वाहताना अंगावरून पुढे गेला की मोहरुन जातो आम्ही..फुलण्यासाठी मोहरणे आवश्यक असते. आनंदाच्या भरात ते मोहरणे आठवून हलकेच स्मित ओठावर येते.तुम्हाला वाटतं की पाकळ्या किलकिल्या झाल्यात..लवकरच आम्ही फुलणार.
पायाशी गुदगुल्या करणारं, कधी कधी हलणारे पाणी देखील सुखावह असते. पाकळ्यांचे स्मित आणखी खुलते.आणि..दिवस रात्र, काळ वेळ कुठलीही असताना तो क्षण येतो.मिटल्या, अर्ध्या खुललेल्या पाकळ्यांचे सुख त्या क्षणी अनिर्बंध होते..आणि एक फुल पूर्ण उमलते.
जे पाहणाऱ्याला आनंद देते ते स्वतः किती आनंदात जगत असेल. देठाशी जोडलेल्या फुलाला कधी हताश,मलूल पाहिलंय का कुणी.
या तळ्यासारखी अनेक तळी आसपास आहेत.नीट पहा स्वतःच्याच डोळ्यात.
सगळीकडे हे असेच होते.विविधरंगी फुले सहज त्यात कधीही फुलण्याच्या प्रक्रियेत रमलेली दिसतील.भावनेच्या तीव्रतेचे मनाकडून वाहत येणारे वारे तरंग निर्माण करतील.पायाशी असणारे आसक्तीचे पाणी...या मुळे तो क्षण कधीही उगवेल.
अन् डोळ्यांच्या तळ्यात एक अश्रूंचे फुल उमलेल.
भावना अनंत,तळी अनंत,फुलांचे रंग अनंत...फुल फक्त एकच...अश्रूंचे.
कधी आनंदाने उगवलेले..कधी आवेगाने.
लेखन: मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment