Thursday, August 10, 2023

Sunday, August 6, 2023

Blue-tiful Wall mounts

चित्र सौजन्य:अनामिक
ब्लुटिफुल वॉल माऊंटस
काल आपण इथून निघालो तेव्हा मुद्दाम घरामागे जाऊन हा फोटो घेतला.अधून मधून वेळ मिळाला की येत असतो ना आपण.उठून आणि कुठूनही दिसणारा निळा रंग तू हट्टाने लावून घेतलास.मलाही आवडतो तो.
आताशी ८वाजलेत.थोडा गारवा असेल हवेत तिथे. हळूहळू उन वाढेल आणि ११च्या सुमारास किरणे खिडकीला, तावदानाला न जुमानता तुझ्या आवडत्या पडद्याच्या फटीतून, थेट आत जातील आणि आपण नोर्थकोट रोड वरील दुकानातून घेतलेल्या पुरातन सुबक नक्षीदार अशा टेबलवर ठेवलेल्या, आपल्या फोटोवर पडतील.लग्नात काढलेल्या त्या फोटोवर किरणे पडली की तू आणखी सुंदर दिसतेस.
कधी एकटा आलो इथे तर बराच वेळ मी आपला फोटो न्याहळत बसतो.मला आवडतं ते.
हळूहळू संध्याकाळ होईल आणि निळी भिंत अंधारात दिसेनाशी होईल.दिवा लावला तरी फार काही उजेड नसतो त्याचा. तू सोबत नसतेस तेव्हा फार उदासवाणी दिसते ती भिंत.झाडांना पाणी घातले अशा वेळेस की बरे वाटते.
चला..काही काळ उघडलेली आठवणींची, पांढरीशुभ्र चौकट असलेली खिडकी आता लावून घ्यायची वेळ झालीय.
रचना:मुकुंद इंगळे