चित्र वेध
मानसी
जातेच आहेस तिथे तर...
बहुतेक उजवीकडे छोटे दार आहे ते उघड म्हणजे या ठिकाणी येशील.खूप सुंदर फुले असलेल्या तितक्याच सुंदर कुंड्या आहेत.त्यांना पाणी घाल..त्यांनाही फ्रेश वाटू दे जरा.
टेबलावरची मोठी फुलांची टोपली थोडी सरकव..नाहीतर चहाचा कप आणि किटली ठेवण्यासाठी जागा उरणार नाही. किटलीवर टिकोझी पण लागेल..वातावरण थंड आहे ...कपात चहा जास्त वेळ गरम नाही रहाणार.
खुर्चीत बसलीस तर समोरचे फक्त हिरवेगार डोंगर दिसतील...पण वाहतं पाणी नाही दिसणार.थोडी फिरवून घे डावीकडे.. दूरवरून संथ वाहणारा प्रवाह मनात निरव देखील वाहू लागेल.
सर्व रंगीत फुले,पाने झाडे...निसर्ग यांची प्रेमाने विचारपूस कर.
वाऱ्यामुळे झाडाच्या फांद्या हलतील...काही पाने उडून अंगावर पडतील.त्यांना झटकू नकोस..तू आल्यामुळे आनंदित झालेल्या झाडाची तुझे स्वागत करण्याची ती परंपरा आहे.राहू देत पाने तशीच.
समोर पाहता पाहता एक क्षण असा तुला जाणवेल की तू या पर्णफुलात फुलत आहेस..प्रवाह होऊन वाहते आहेस...डोंगर होऊन फक्त अविचल आहेस आणि या सर्वासहीत निळे अलिप्त निरभ्र आकाश होऊन चहा पीत निवांत बसलेल्या कुमुदकडे पहाते आहेस.
एकतर तंद्री मोडेल किंवा चहा गार होईल...घे परत एक कप ओतून...निवांत निसर्गाचा उल्हसित करणारा एकेक घोट घेत रहा.
मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment