Sunday, June 16, 2024

इंद्रधनुष्य

चित्र वेध (चित्र सौजन्य:श्री प्रमोद ओरपे)


इंद्रधनुष्य


मस्त ढगांनी आच्छादलेली होऊ घातलेली ओलसर संध्याकाळ...किंवा सकाळ.

आकाशात अवतरलेले नितांत सुंदर इंद्रधनुष्य...सृष्टीच्या सृजनशीलतेने गाठलेला परमोच्च सौंदर्य क्षण. वाहता वारा,कोणत्याही स्वरूपाचा पाऊस,प्रकाश,अंधार,सागर,नद्या,डोंगरदऱ्या,

सुर्य,चंद्र,तारे आणि असिमित असणारे... कधी आकाश तर कधी आभाळ अन असंख्य आकाशगंगा....

या विश्व पसाऱ्यात आपल्या सूक्ष्म बिंदुरुप पार्थिव अस्तित्वाची जाणीव करून देणारे वास्तव...पण त्याच क्षणी या सर्व गोष्टी बघण्याची,अनुभवण्याची, कुवतीप्रमाणे जाणून घेण्याची क्षमता असलेले आपले मन...कधी कधी कुतूहल,उत्सुकता या पलीकडे जाऊन फक्त निवांतपणे अनुभवते...असे ते हे इंद्रधनुष्य.

पण ते दिसायला योग्य कोन तयार व्हावा लागतो..

पाण्याचे हवेतील सूक्ष्म थेंब आणि पाहणाऱ्याच्या पाठून येणारा सुर्य प्रकाश यांच्या संयोगाने सप्तरंगात ते फक्त दिसते.. कधीतरी दिसते.

पाण्याच्या थेंबांसारखी असंख्य माणसे आयुष्यात येतात. काळाच्या आभाळात अनुभवाचा सोबत पण पाठीमागून येणारा प्रकाश सर्वांवर पडतो. आपला दृष्टीकोन योग्य असला की ती व्यक्ती इंद्रधनुष्य होऊन आपल्याच मनावर,मनात सप्तरंगात उमटते...तशीच रहाते.

आकाशातील इंद्रधनुष्य मनाला आनंद देते ..माणसातील इंद्रधनुष्य आनंदाला मन देते.

लेखन:मुकुंद इंगळे 


No comments:

Post a Comment