चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
स्वप्नाशा
किती सुंदर स्वप्न पडलं आज. एक पिवळ्या रंगाचा टवटवीत गुलाब…
घरातच उमललाय...आणि प्रसन्न मनाने त्याकडे पहात बसलोय.
हळू हळू मला जाग येतेय.गुलाब नजरेसमोर आहेच अजून..सोबत
वास्तवाची फक्त एकच हिरवीगार खरखरीत फांदी... खरं तर
गुलाबाच्या झाडाला असणारं पान हवं...पण साधारण कर्दळीला
असते तसे एकच पान...अस्तित्वाचे..जाणिवेचे.
आणि फांदीचा देठ ऊर्जा मिळवतो आहे अर्ध्या भरलेल्या नियतीच्या
पेल्यात असलेल्या पाण्यातून.
हे माझे स्वप्न परस्परांशी विसंगत वाटेल अशा गोष्टींनी पुरेपूर भरले आहे कदाचित…
पण ते मला गुलाब होऊन फुलण्याला प्रवृत्त करत आहे..विविध प्रकारे ऊर्जा देऊन.
कळत नाही स्वप्न आहे की मनात मोहरलेल्या नितनूतन आशेचं एक ताजे फुल..
मन होऊन उमललेलं
लेखन:मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment