चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
मनोबिंब
फिरायला निघालो होतो...वाटेत कुठे तरी आरशांचे तुकडे पडलेले दिसले...यादृच्छेने... स्वैरपणे पडलेल्या त्या तुकड्यांकडे वरून..लांबून पाहताना आजूबाजूचा प्रकाश प्रतिबिंबित होत होता...आणि प्रत्येक तुकड्यात थोडा थोडा का होईना.. मी दिसत होतो. नकळत मी एक तुकडा उचलला..जवळून पाहिले तर मी मलाच जवळून पाहिले त्यात.
आयुष्याच्या वाटेवर फिरताना आपल्याला भेटणारी माणसे या आरशाच्या तुकड्यासारखी असतात.
त्यांच्यात आपण स्वतःला थोडे थोडे दिसतो आणि पाहतो.काळजीपूर्वक, इजा होईल असे त्यांचे धारदार कंगोरे टाळून जवळ घेतो...मग आणखी जवळून स्वतःला त्यात पाहतो.
हळूहळू कंगोरे बोथट होतात आणि तो तुकडा मित्र की "मी"त्र बनून जातो.
माझे चालणे संपेपर्यंत हे असेच चालणार...चांगल्या अर्थाने कवितेची ओळ आठवत.."वाटेवरती काचा ग"...त्या उचलून..आयुष्याला डकवून ...आयुष्य शोभिवंत करत ..चालतच राहणार.
लेखन:मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment