चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
जगातले,
जग आतले की
"जग" आतले
कोण जागे आहे?लक्ष्मी विचारते आणि जो जागा असेल त्याच्यावर कृपेचा वर्षाव करते.आज कोजागिरी आठवायचं खरं तर काहीच कारण नाही.पण वरचे तीन शब्द वाचले आणि मन अंतर्मुख झाले.
ज्योतिष थोतांड, विज्ञानाचा उगम पश्चिमेकडेच झाला आहे,मुहूर्त वगैरे काही नसतं, वास्तू शास्त्र म्हणजे वस्तू विकण्याची सोय इत्यादी आधुनिक शास्त्रकारांना हे अतर्क्य प्रश्न, कसलीही पडताळणी न करता, निदान विचारण्याची तरी सोय झाली...ती आपल्या पूर्वजांनी "आतले"जग जगताना पाहिले म्हणून.
त्यांनी आपापल्या "मी कोण"या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या पद्धती शोधल्या, मागे सोडल्या..आपण आज त्याला अध्यात्म म्हणतो.
त्या कुणीतरी जगताना आधी जगातले होऊन जगाकडे पाहिले...त्या व्यापाला माया म्हटले.
मग "आतले जग" नुसते पाहिले...तेव्हाच्या अनुभवाच्या प्रतिबिंबाला साक्षात्कार... म्हटले...
पण "आतले" पाहून मनाला मिळालेल्या तादात्म्याचा अनुभूती प्रमाणे जेव्हा "जग"णे सुरू झाले तेव्हा प्रश्नांची उत्तरे मिळत गेली...ते लिहीत गेले..सांगत गेले. आणि वेद शास्त्र पुराणाची निर्मिती झाली.
जो जगात आहे,जगत आहे..त्याची नुसती जागा आहे.
जो जगात आहे,आनंदाने जगत आहे...त्याला जागेची, जगायची माया आहे..पण तो जागा नाही.
जगात आहे,जगत आहे पण कुतूहलाच्या जाणिवेतून जगत आहे ...की "आत" ले जग काय आहे? तो खरा जागा.
वरील तिन्हीपैकी साऱ्यांच्या मुळाशी एकच प्रश्न...
यांतील कोण जागे आहे?
मीच मलाच विचारलेला...!
कोण जागे आहे?
जगातले,
"जग" आतले की
..जग "आतले"
लेखन:मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment