Wednesday, March 13, 2024

क्षणीकांचन योग

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

क्षणीकांचन योग

या बसा निवांत..सुंदर सूर्योदयाच्या साक्षीने...

मिटा डोळे...सर्वात प्रथम...कोणताही विचार मनात येण्या आधी कोणती व्यक्ती डोळ्यासमोर आली...तिच्याशी आपले कदाचित लौकिक नाते असेलही..नसेलही.पण अलौकिक नाते मात्र निश्चितच असेल...किती जुनी ओळख...नवी ओळख ...कुठलाच परिमाण लागू पडत नाही.

क्षणभर ती व्यापून गेली..व्यापून राहिली.सूर्याच्या किरणांसारखी...किरण एकेकटे करून सोडवता येत नाहीत...झाडाच्या फांद्यामुळे किरणे विभागल्यासारखी वाटतात नुसती.पण विभागलेल्या प्रत्येक किरणात अनामिक ऊब,धग,ऊर्जा तेवढीच असते.

क्षणभर कुणीतरी मनात प्रतिबिंबित होऊन गेलं ..जाणिवेची जांभळी फुले अवती भवती त्या क्षणी उगवली.

सुंदर उगवलेल्या सकाळच्या सोबत असीम सुंदर अस्वस्थता पण उगवली...दिवस जसजसा वर येईल..तशी ती इतकी वाढत जाईल.की निळ्याशार ओढीने हा तलाव असाच भरून राहील.

अनुत्तरित प्रश्न इतकाच राहील...ती व्यक्ती सहज अहेतुक का नजरेसमोर क्षणभर तरळली?

नका शोधू उत्तर...गुलजार म्हणालेत ते खरंय...

सिर्फ़ एहसास है ये रूह से महसूस करो

हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो

हा क्षण बराच रेंगाळला..वळूया पुढच्या क्षणाकडे..!

लेखन:मुकुंद इंगळे 





No comments:

Post a Comment