व्हॅल्यू ऍडीशन
समोर वाफाळता कॉफीचा कप...चवीप्रमाणे हवी तेवढीच घातलेली साखर विरघळवण्याचे काम करून बाजूला ठेवला गेलेला चमचा..आता फक्त एकेक घोट घेत निवांतपणे कॉफी संपवायची.
विरघळणे...याला समानार्थी शब्द बहुधा नसावा.सामावून जाणे,एकरूप होणे हे जवळ जाणारे शब्द...पण हे ज्याबद्दल बोलले जातात त्याचे वेगळे अस्तित्व उरत नाही...असे दर्शविणारे हे शब्द आहेत.
विरघळणे हे त्यापलीकडचे असते...आपले अस्तित्व दुसऱ्यात मिसळून त्याच्या अस्तित्वाला नवा अर्थ, नवे परिमाण देते.
समोरचा कॉफीचा कप म्हणजे जीवन..समाधानाची पुरेशी साखर हाताशी आहे..पण ती नुसती कपात टाकून उपयोग नाही.चमच्याने ढवळावी लागेल.तरच तिचे अस्तित्व नाहीसे होऊन कॉफीच्या अस्तित्वाला चव येईल.
आपल्या अस्तित्वाला चव आहे कारण परमेश्वररुपी चमचा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आयुष्यात चांगल्या अर्थाने ढवळाढवळ करून त्याला अर्थ देतो.कधी मीठ तर कधी साखर.. कधी दुःख कधी आनंद..काळानुसार विरघळवत असतो.
मैत्रीची साखर त्यानेच वापरली..विविध नात्यांची,स्नेहाची साखर त्यानेच वापरली.विविध छंद,भटकंती हे पण साखरेचेच प्रकार..जिथे पाहू तिथे फक्त विरघळणे असल्यामुळे आयुष्याला चव आली आहे.
लता,आशा, किशोर,रफी,मुकेश,सुमन...अशा साखरेच्या अनंत जाती त्याने या कपात ओतल्या आणि विरघळवल्या नसत्या तर...!नको..कल्पना पण नको करायला.
खरंय की नाही?
चला मी कॉफी घेतोय आता.. येताय का कंपनी द्यायला?तुमच्या कंपनीची साखर लगेच विरघळेल बघा...
लेखन:मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment