चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
वाटणे
देवाची पण कमाल आहे.. माणसाला नेमकं का पाठवलय पृथ्वीवर..तेच कळत नाही.येताना भेट म्हणून सर्व काही ग्रहण करण्याची क्षमता असलेला मेंदू दिला आणि भावनांचा कल्लोळगुच्छ दिला.
मेंदू कुलुपाचे काम करतो तर भावना किल्ल्यांचे.
दैनंदिन आयुष्यात मेंदूला प्रश्न पडणारच...कुतूहलाची मास्टर की आणि विचारांची भावना,प्रश्न सुटण्यासाठी धडपड करायची भावना,चिकाटी,जिद्द या किल्ल्या लागतील. प्रत्येक प्रश्नाला वेगवेगळ्या किल्ल्या लागतील..आणि प्रश्नही असेच की ज्याला एकापेक्षा जास्त किल्ल्या लागतील ते कुलूप उघडायला.पण कुतूहलाची मास्टर की हवीच.
कधी कधी वाटतं की आपण कायम कुलुपच आहोत की काय? बालपण,तारुण्य, प्रौढत्व अशी वेगवेगळी कपाटे ..ज्ञान भांडाराने भरलेली जगताना उघडावी लागतात.तेव्हा मात्र आपण किल्ली होतो.
भेटणारी माणसे सुद्धा सुरुवातीला कुलूप असतात..सहवासामुळे मात्र नंतर खुशाल त्यांच्या किल्ल्यांच्या duplicate किल्ल्या आपल्याला देतात. हवं तेव्हा त्यांच्या मनाचं कुलूप आपण उघडू शकतो.त्याच सोबत आपण कुणासाठी कायम कुलूपच राहायचं हे पण ठरवतात.
आपण जितक्या आपल्या किल्ल्या नाती,मैत्री,छंद अशा कपाटाच्या आत असलेल्या कप्प्यांना उघडायसाठी वापरू... वाटू....तितके "जाताना" बरेच प्रश्न सुटले,उत्तरे मिळाली ..अनेक कुलूपे उघडली याचे समाधान असेल.
कधी कधी यातील काही किल्ल्या हरवतात...तेव्हा त्याच्या duplicate ज्यांना दिल्यात ते येतात,धीर देतात आधार देतात...कुलूप उघडून मनाचे दार कीलकीले उघडते..पुन्हा नव्याने प्रश्न शोधायला,आपल्या किल्ल्या वाटायला.
गंमत म्हणजे वाटायला शब्द पण असा आहे की ज्यात मनाला वाटणे ही भावना आणि दुसऱ्याला देणे हे देखील आभिप्रेत आहे.
चला किल्ल्या वाटायला...नव्या नव्या प्रश्नांच्या शोधात.
लेखन: मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment