पूजा करताना एका विशिष्ट क्षणी मी देवाला फुल वाहिलं आणि डोळे मिटून त्याच्याकडे (की आत) पाहिलं.
मला आठवलं..ते फुल ताजे मिळवण्यासाठी सकाळी उठून गेलो होतो बाजारात..विविध फुलांतून हेच नेमके नजरेत भरले आणि आता वाहिले.
या संपूर्ण कृतीत माझं असं काहीच नाही. फुलं "त्याची ", फुलवाला "तो" स्वतः...ते आणणारा "त्याचीच" निर्मिती....तरी देखील एक गोष्ट उरते मनात त्या क्षणी.त्याने दिलेल्या मनातला समर्पण भाव.
उद्या हे फुल कोमेजून जाईल. उद्या कशाला..परवा मथुरेतली कृष्ण जन्माची चित्रे टीव्ही वर पहात होतो. सुंदर गर्द जांभळ्या रंगाची कमळे वाहिली जात होती....आणि दहाव्या मिनिटाला ती कुणीतरी तिथून उचलली आणि नव्या फुलांसाठी जागा केली.
कारण वाहिल्या क्षणी ती निर्माल्य झाली होती.एक समर्पणाचा क्षण त्या प्रत्येक वाहणाऱ्याला मिळून गेला होता...कायमचा.
या पार्श्वभूमीवर हा कृष्ण वेगळा भासतो...नेहमी देवाचे डोळे उघडे असतात आणि भक्ताचे मिटलेले ..
यात कृष्णाचे डोळे मिटलेले आहेत...सुंदर फुल जवळ ठेऊन तो कुणाला वाहणार आहे ते ?एखाद्या राधेच्या की मीरेच्या सुंदर निरभ्र मनाला? तोच जाणे.
समर्पित केलेल्या फुलाने दिलेला प्रत्येक क्षण आपल्याला अलिप्त करत असतो...बाह्य..भौतिक जगापासून.त्यामुळे तो क्षणही लक्षात नसतो ठेवायचा...फक्त दुरून तटस्थपणे तो क्षण कालौघात विरताना फक्त अनुभवायचा असतो.
म्हणून "मी" आणलेलं.."मी" वाहिलेलं फुल "त्याला"अर्पण होतं तेव्हा "मी" उरत नाही मात्र "तो" त्या क्षणी "आत" येतो आणि त्याचे दर्शन घेण्यासाठी डोळे आपोआप मिटले जातात.
No comments:
Post a Comment