चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
कंदील..काजळी...का जळी?
एक कंदील जळतो आहे.
देहाच्या सुबक चौकटीत दोन बाजूंनी...कर्म आणि श्रद्धा यांनी बद्ध केला गेलेला..
त्या दोन्ही बाजूंच्या वर सुख आणि दुःख याची दोन छिद्रे आहेत...त्यातून सहज निघू नये अशी अडकवलेली दैव नावाची गोलाकार कडी.... बहुधा वर कुठेतरी, विधात्याने प्राक्तनाच्या खिळ्याला लावून ठेवली असावी...सहज दिसत नाही..पण अंदाज लावू शकतो.
दोन बाजू खाली येतात तिथे अनाहत ज्ञान ऊर्जेचा स्रोत देणारे इंधन साठवण्याची छोटीशी टाकीवजा जागा आहे.इंधन पुरवठा नियमित रहावा यासाठी आत्मविश्वासाचा गोल (Goal) आकाराचा नियंत्रक आहे.
त्याच्या वरील बाजूस...जिद्दीची वात ओवून ठेवलेला प्रयत्नांचा बर्नर आहे. वात आणि बर्नर यांचे योग्य संयोजन जिद्दीचा जळताना अपव्यय टाळते.
एक काचेसारखा पारदर्शी,नितळ,नाजूक पण आजूबाजूच्या तप्त वातावरणात पण टिकून रहाणारा..मनाचा गोल.. इंधन टाकी आणि वरील कडी जोडणारा एक दुवा आहे.संस्कारांच्या नेटक्या दिसणाऱ्या तारांनी मनाला स्थित केले आहे.,स्थिर केले आहे.
वात जळताना आपले वर्तन,विषय विकार, विसंवाद,अविश्वास,गैरसमजामुळे काचेवर काजळी धरते..आणि कंदीलातील प्रकाश यामुळे झाकोळला जातो.
तेव्हा त्या मनाला बाहेर काढून पुन्हा स्वच्छ..पुन्हा पुन्हा स्वच्छ करावे लागते.
एक सुंदर स्वच्छ नितळ काचेतून वात जळताना तेवणारा प्रकाश पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर पडतो.त्यालाही ऊर्जा देतो.
मात्र या साऱ्यात एक भाग महत्वाचे कार्य करतो.
वरच्या दोन बाजू आणि मनाच्या काचेच्या वरील भागात असलेले एक वायुविजन संकुल..ज्याला सगळ्या दिशांनी आरपार लहान लहान आनंद,छंद,भटकंती,संगीत असे झरोके असतात. त्यातून आतली तापलेली, ताण असलेली हवा बाहेर जाते आणि बाहेरील नवी ताजी हवा आत येते...कंदिलाच्या एकूण तापमानाचा समतोल राखते.
आपण देहाचे साधन वापरून जिद्दीच्या जळणाऱ्या तेजाची निर्मिती प्रयत्नांनी करत रहावी. बाहेरील जगाशी आणि आतल्या जगाशी समतोल साधावा..
मनावरची काजळी नित्य काढत रहावी.
(काजळी हा शब्दच जणू प्रश्न विचारतोय..की काचेवरील जमलेल्या काजळीतून जर प्रकाश बाहेर जाणार नसेल तर तू का जळी ? का जळतो आहेस?)
देहाचा कंदील विधात्याने इथे वापरण्यासाठी.. दिलाय.पण एक दिवस इंधन संपेल.
त्याने देताना जितका स्वच्छ, नीट दिला होता तसाच त्याला परत द्यायला हवा ना.
बाकी आयुष्यभर आपण जळताना दिलेल्या प्रकाशाचे आणि काजळीचे सुद्धा रेकॉर्डस तो ठेवतो आहे ...त्याच्या दैनंदिनीत.
कदाचित तेच आकाशिक रेकॉर्डस असावेत.
लेखन: मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment