Monday, February 5, 2024

काळ शिल्प

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

काळ शिल्प

हे चित्र पाच ते सात हजार वर्षांपूर्वीचे आहे.नदी संथ वाटावी इतक्या वेगात वाहते आहे आणि तिच्या दोन्ही तीरांवरती मोठमोठे दगड दिसताहेत.

काही माणसं इथे पाण्याच्या शोधात येऊन गेली.भारतीयांचे पूर्वज होते ते..जाताना बराच काळ त्यांनी दगडांचे निरीक्षण केले.एका छोट्या धारदार उपकरणाने त्यावर काही खुणा केल्या.आणि पुढच्या त्यांच्या तीन पिढ्या त्या दगडातून विविध मंदिरे,कमनीय मूर्ती, नंदी,नक्षीदार कमानी इत्यादी असंख्य अलौकिक गोष्टींची निर्मिती करण्यात मग्न होत्या.पहिल्या पिढीने निर्मितीचे पाहिलेले स्वप्न त्यांनी मागे ठेवलेल्या...कदाचित भूर्जपत्रावरील आकृत्या,आराखडे,मोजमापे,यानुसार पुढच्या पिढ्यांनी पूर्ण केले.पहिल्या पिढीने स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची सुरुवात केली...पुढच्या काही पिढ्यांनी त्याला आकार दिला आणि त्या नंतरच्या कुठल्या तरी पिढीने निर्मिती पूर्ण केली.निर्मितीचा ध्यास निर्मितीची परंपरा निर्माण करतो.नुसता विचार करून पाहू...की आपण मधल्या पिढीतील आहोत आणि दगडावर छिन्नी सारखे हत्यार घेऊन एखादे शिल्प कोरत बसलो आहोत.राजाश्रय असल्याने जेवण,राहणे इत्यादीचा प्रश्नच नाही.भविष्यात हे किती सुंदर दिसेल जेव्हा मी साकार केलेली मूर्ती मंदिरात प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठित होईल किंवा योग्य जागी ठेवली जाऊन त्याचे सौंदर्य वाढवेल.पण आपण फक्त आयुष्यभर हेच कोरीव काम करायचे.. न थकता, न कंटाळता...आयुष्यभर.

इतका सुंदर निर्मितीचा विचार प्रत्यक्षात आणणारे आपले पूर्वज खरंच महान होते.भारतवर्षात जागोजागी असणारी लेणी,मंदिरे याची साक्ष आहे.

महामूर्ख अविचाराने भारलेले आक्रमक लोंढे येईपर्यंत हे असे निर्मितीचे सुंदर निसर्गचक्र उन्हापावसात अखंड सुरू असावे.

दोन्ही तीरांवर दगड असलेल्या या नदीतून कालप्रवाह अजूनही अनाहत वाहतो आहे.

लेखन:मुकुंद इंगळे 

No comments:

Post a Comment