ज्याचा त्याचा चंद्र
चंद्र...आपला सर्वांचा मित्र,सखा, सजण जे काही म्हणाल ते तो आहे.आपल्या गद्यात,पद्यात,हिंदी मराठी सिनेगितात तो हटकून असतोच.कारण सरळ आहे की तो आपल्यापैकी प्रत्येकाच्या स्वप्नांचे रुप घेऊन उगवतो.आपल्या प्रत्येकाचा चंद्रावर एक लॉकर आहे आणि त्यात आपण आपली स्वप्ने सांभाळून ठेवली आहेत.स्वप्नांचा साठा वाढला की सुंदरशी पौर्णिमा येते...स्वप्ने पाहणारी मने ओसरली की अमावस्या.अमावस्येच्या परत पौर्णिमा येतेच.. कारण माणूस स्वप्ने पाहिल्याशिवाय जगूच शकत नाही.त्यावर मनातल्या महासागरांची भरती ओहोटी अवलंबून असते.
झपाटल्यासारखे आपण परिश्रमांची शिडी करून ती स्वप्ने पृथ्वीवर वास्तवात आणण्याचा प्रयत्न करतो.
आपल्याला चंद्र हवाच असतो...नुसती जगातल्या माणसांवर नजर टाकली तरी पराग्रहावरच्या माणसाला समजेल..की हे सारे यांच्या स्वप्नांनी, स्वप्नांमुळे चंद्राशी बांधले गेलेत.यांच्यापासून त्याला वेगळा करता येणार नाही. कदाचित पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा या स्वप्नबंधामुळेच तो पृथ्वीभोवती फिरत असावा.
एकच आहे पण पुरेसा आहे.
पराग्रहावर जीवसृष्टी आहे की नाही यासाठी संशोधनाची गरज नाही.ज्या ग्रहाला चंद्र आहे..एक किंवा अनेक तिथे नक्की मानवी मन अस्तित्वात असणार...नाहीतर आपली मौल्यवान स्वप्ने ते दुसऱ्या कुणाकडे ठेवणार?
लेखन: मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment