Tuesday, January 21, 2025

अम्लान

चित्र वेध 
(चित्र सौजन्य:अनामिक)
अम्लान 
गेली कित्येक वर्षे ही सुंदर ताज्या मनमोहक चाफ्याने भरलेली परडी अशीच आहे..माझ्या मनात.
आठवणीतल्या...तुझ्या माझ्या अगणित न झालेल्या भेटीत...पण तुझ्या फक्त दर्शनाने फुललेल्या आठवांचा चाफा...
तुला आठवतं का...सुट्टी लागली की तू तुझ्या काकांकडे यायचीस...माझ्या घरावरूनच त्यांच्याकडे जाणारी वाट होती...तू तिथूनच त्यांच्याकडे जायचीस....सुट्टीत रमायचीस...गावातल्या मैत्रिणींसोबत उनाडायचीस..
आणि काही दिवसांनी त्याच वाटेने कुठल्याशा गावात की शहरात परत जात असावीस.
त्या वाटेवर एक तळे होते. तळ्याच्या काठावर अनेक चाफ्याची झाडे होती.
तू आल्यावर ..तुला पाहिल्यावर त्या चाफ्याचा गंध थेट मनात पसरत असे.
जितके दिवस तू असायचीस तितके दिवस चाफा दिवसरात्र फुलत असायचा...आपली नजर भेट गंधित व्हायची अधून मधून..पण बोलणं झालं नाही कधी...
माझ्या मनातलं सगळं,चाफ्याची फुले तुझ्याशी गंधबोलीतून तुला सांगायची.. शब्दात कधी ते उतरवता आलंच नाही...मलाही आणि ..तुलाही.
अशीच एक सुट्टीच्या काळात तू आली होतीस..तुझ्या आठवणींच्या झाडाखाली ... तळ्याकाठच्या देवळात बसलो होतो.त्या दिवशी तू परत जाणार होतीस...पुढच्या मे महिन्यापर्यंत डोळ्यांना कोरड पडणार होती. तू अचानक समोर आलीस..तुझ्या हातात एक चाफ्याचे फुल होते. क्षणभर वळून माझ्याकडे पाहिलेस..आणि हात उंचावून ते मला दाखवलेस ..आणि समोरच्या मूर्तीला वाहीलेस... अन् निघून गेलीस.
त्या फुलाच्या गंधाने मनाचा गाभारा भरून गेला होता...मी उठलो..ते फुल डोळे भरून पाहून घेतलं...त्या सुगंधित क्षणांच्या परडीत आधीची नजरबंद अम्लान फुले देखील होती.
इतकी वर्षे झाली...त्या क्षणांची परडी अजूनही टवटवीत,प्रफुल्लित चाफ्याच्या फुलांनी भरलेली आहे.
जिथे कुठे तू असशील तिथे या क्षणी चाफ्याचा सुवास तुझ्या आजुबाजूस दरवळेल...
या क्षणी...
याच क्षणी
लेखन: मुकुंद इंगळे

No comments:

Post a Comment