Monday, September 4, 2023

दर्शनमात्रे मन....

दर्शनमात्रे मन..

प्लॅनिंग सुरू आहे तुमचे..

ती मूर्ती नजरेसमोर येते रिझरवेशन्स..किंवा कार बुकिंग..

.तिथे गेल्यावर उतरायची, राहायची व्यवस्था...ती मूर्ती 

आहेच डोळ्यासमोर..

गर्दी टाळूच शकत नाही...आपण रांगेत उभे राहतो.

देव दर्शनासाठी काहीपण...

अखेर एका रांगेचा भाग होऊन जातो आपण…

तिथे सुद्धा विविध भाव असलेले चेहरे,मंदिर रचना पाहण्यात 

वेळ जातो.

हळूहळू रांग पुढे सरकते..

समोर ती मूर्ती असते (की खरेतर आपण मूर्तीसमोर असतो.)

 डोळे बंद करून आता आतमध्ये फक्त "त्या"ला सामावून घ्यायचे..

फक्त

 "तो" आणि मी..

"तो" आणि मी

असा क्षण मिळावा यासाठी केलेली धडपड...

तो क्षण मिळतो..पण प्रचंड कोलाहलात विरून जातो.

'पुढे सरका'.. एवढाच मंत्रोच्चार ऐकू येतो.डोळे उघडल्यावर 

लक्षात येतं..की आता आपण ढकलले गेलो आहोत पुढे.

आता समोर मूर्ती नाही.

तीर्थाटन संपवून घरी परत .

देवाचं दर्शन झालं का? 

उत्तर हो आहे....पण कुठल्या रुपात?

तुम्ही तिथे हॉटेलवर उतरलात..तिथला मदत करणारा नोकर

रिक्षा केली असेल..तो रिक्षावाला,

जवळच्या दुकानातून मुलांसाठी खाऊ घेतला असेल,

देवळाबाहेर असलेल्या दुकानातून हार,फुले घेतली असतील..

त्या साऱ्यांना देवाचे दर्शन झाले...तुमच्या रुपात,

ते त्यांच्या कर्मयोगामुळे.

घरी परत आल्यावर  आठवा ते तीर्थाटन..

जी पहिली व्यक्ती,गोष्ट,घटना..तुमच्या बंद डोळ्यासमोर 

येईल त्या रुपात तुम्हाला दर्शन झाले होते.

मनातली मूर्ती फक्त निमित्तमात्र.

विश्र्व दर्शनाचा सोहळा "तोच"प्लॅन करतो..तुम्ही फक्त साधन…

आणि साधक.

स्थान महात्म्य म्हणून,

सकारात्मक उर्जेचा प्रसाद मिळावण्यासाठी समर्पित मनाचा नैवेद्य, 

तिथेच जाऊन दाखवावा लागतो.

लेखन:मुकुंद इंगळे

No comments:

Post a Comment