Tuesday, November 1, 2022

भग्न मग्न

Fakemytrip by Mukund
म्हणजे (काही खरे काही खोटे) 
भग्न मग्न
दोन वर्षापूर्वी ताज पाहायला गेलो होतो.आधी एकदा बघितला होता..एक कबर छान सुशोभित केलेली..गर्दी होती चांगलीच.मुख्य दरवाजा पासून विद्युत गाडीने तिकीट खिडकीजवळ सोडले आणि तिथून आत आलो.उजवीकडे सुंदर, गुलाबी रंगाचे उत्तम स्थितीत असलेले सज्जे आणि डावीकडे हळू हळू चालत असताना ताज थोडा थोडा दिसू लागला.
मला प्रश्न पडला की तीन चारशे वर्षात या सज्ज्यांच्या भिंती, खांब,खांबासाठी खाली आधाराचे दगड हे झिजले कसे नाहीत? अगदी टकाटक कसे राहिले?
ताज पाहून परत येताना तिथल्या शासनाच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्याला कुतूहल म्हणून हा प्रश्न विचारला.त्याने सांगितले की याची देखरेख आम्हीच करतो. या प्रकारे दगडात कलाकुसर करणारी राजस्थानी कलाकार इथे आहेत.जेव्हा एखादा चिरा,आधाराचा दगड झुकतो,निखळतो तेव्हा अगदी हुबेहूब तसाच बनवला, घडविला जातो आणि जुन्याची जागा घेतो. जुना जबाबदारी पूर्ण करून पुढील प्रवासाला जातो आणि नवा नव्याने वारसा सांगत उभा राहतो.आणि हे सर्व शासकीय काम आहे.
क्षणभर विचारात पडलो...जुन्या सज्ज्याना केवळ "झिजल्यामुळे"बदलता येते.पण कुणा माथेफिरूच्या हातोड्याचे घाव सोसलेल्या मंदिरांचे, कलात्मक मुर्त्यांचे विद्रुपीकरण झाले त्याचे पण नूतनीकरण व्हायला हवे.जिथे शक्य आहे तिथे हे व्हायलाच हवे.
कारण असे करणे म्हणजे नुसती दुरुस्ती नव्हे तर काळाने मूर्ख माथेफिरू मानसिकतेवर घेतलेला सुड ठरेल आणि संस्कृती संवर्धनाची फुंकरदेखील
बरोबर ना..तुम्हाला काय वाटते?
मुकुंद इंगळे

No comments:

Post a Comment