Fakemytrip by Mukund
म्हणजे (काही खरे काही खोटे)
अद्वैत
नांगरेवाडी मागे टाकून येवण्याच्या दिशेने निघाले की 2 किलोमीटरवर, छोटासा कुरांड्याचा घाट लागतो..रस्ता बरा आहे..छोटी छोटी वळणे घेत गाडी पुढे जात असते आणि "घाट संपला" अशी पाटी दिसते त्याच क्षणी हा प्रशस्त काशाचा तलाव दिसतो.गावातल्या काशी विश्वेश्वरावरून हे नाव पडले आहे.मी येतो अधूनमधून..पण गाडीने नाही.. सायकलवरून.
यातल्या कमळांशी गप्पा मारायला.दुरून वाटतात तितकी एकाकी नाहीत ती..दिवसभर आभाळाशी बोलत असतात.
गेलो की गुलाबी पाकळ्या अजून गुलाबी होतात आणि पाण्याच्या तूषारांनी चमकतात.त्यांचे संदेश पाण्यात उमटणारे तरंग माझ्यापर्यंत पोहोचवतात...आणि ती आणि माझे मान तासनतास आवाज न करता बोलत बसतात..त्यांच्या नव्हे..माझ्या सुखदू:खाबद्दल.
एकदा विचारलं त्यांना त्यांच्या कोमेजण्याबद्दल..
म्हणाली नव्या पाकळ्या लेऊन परत उमलतो.
तुम्ही आज आला आहात तर शांतपणे आपले मन काठावर न ठेवता पाण्यात सोडून द्या. बघा एका तरी कमळाचा तरंग त्याला प्रतिसाद देईल.
काय म्हणताय.. लोकं वेडा म्हणतील? हरकत काय.. इथं कोण शहाणं आहे?
फक्त जाताना एक करा..पलीकडे ते वाकलेले झाड दिसतंय ना त्याला सांगा ते खूप सुंदर आहे आणि त्याचे प्रतिबिंब देखील.
मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment