हिंडून आकाशी बघतो ,वाहते नदीचे पात्र
ओल्या तीरावर रेंगाळे मन मात्र क्षणमात्र !
कधी कधी अशी वेळ येतेच. जीवनप्रवाह चालू असतो पण मन मात्र कुठेतरी रेंगाळलेले असते. अनेक क्षण आयुष्यातले मागे पडलेले असतात आणि नव्यांची आपण वाट पाहत असतो. तरीही क्षणभर काही जुन्या जगलेल्या क्षणांचा मागोवा घेणे चालूच असते । ज्याच्या त्याच्या वाहणाऱ्या नदीच्या तीरावर निवांत बसून असलेले क्षण मन पुन्हा पुन्हा अनुभवते.
एखादे शाळेच्या पुस्तकातील मोरपीस ,मागच्या बाकावर बसून वहीच्या मागच्या पानावर केलेली शेरोशायरी,खालेल्ला मार , इतिहासाच्या पुस्तकात गिरवलेले चित्रकलेचे धडे …
थोडे मोठे झाल्यावरचे महाविद्यालयातले कापसाच्या म्हातारीचे दिवस…हाती न लागणारे पण हातात न मावणारे . …
हिमालयातल्या भटकंतीचे,सह्याद्रीच्या कुशीतले , आईच्या हातचे खाण्याचे आणी वडिलांच्या हि "हाताचे" खाण्याचे …. घरात आलेल्या नव्या हिरव्या बांगड्यांच्या आवाजाचे आणी सायकलवर बसून कामावर जाण्याचे …।
दोन मांजरांची पिले मोठे होण्याचे …!
कधी जमेल तेव्हा खेळत बसतो या कालीडोस्कोपशी ।आणी नव्या येणाऱ्या क्षणांना सामोरे जाताना भरल्या ओंजळीसोबत असतात थोडेसे भरलेले डोळे देखील ….! आणी अशा वेळ सुचते तेच तर वर लिहिलंय
छान! मनमुक्त आणि मनसोक्तही..
ReplyDelete