Sunday, December 18, 2016


<|>** दर्शन **<|>



मुक्काम अलिबाग. स्थळ विठ्ठल मंदिर. संध्याकाळचे सात सव्वा सात वाजले असतील. आम्हि काहिजण गाभार्‍य़ात शिरलो.अजिबात गर्दी नव्हती तिथे. विठ्ठल रखुमाईच्या समोर हात जोडुन उभा राहिलो.डोळे मिटले.आता फक्त मी आणि ते दोघे..माझ्या जाणिवेत फक्त आम्हि तिघेच.खुप निवांत दर्शन घेतले त्या दोघांचे..डोळे भरुन अन डोळे मिटुन पण. आणि प्रदक्षिणा घालण्यासाठी गाभार्‍य़ाबाहेरच्या मार्गाकडे वळलो.

मला कल्पना नव्हती कि केवळ माझ्या आयुष्यात येण्यासाठी देवाने एक विलक्षण क्षण प्रदक्षिणेच्या मार्गावर अगदी मुर्तिंच्या मागे ठेवला आहे म्हणुन.
जेमतेम 4-5 पावले चालुन मी उजवीकडे वळलो.आणि पाहिलं माझ्यापुढे असलेल्या आजीबाई बरोबर मुर्तिच्या मागच्या बाजुला उभ्या होत्या. मी गाभार्‍य़ात असताना त्यानी दर्शन घेतले व त्या बाहेर जाताना दिसल्या होत्या. कदाचित एखादी प्रदक्षिणा पूर्ण पण झाली असेल त्यांची. प्रदक्षिणा घालताना मी कितींदा तरी कित्येक जणाना पाहिले आहे. मुर्तीच्या मागे आल्यावर क़ुणी नाक घासते, क़ुणी कपाळ टेकविते..कुणी  दोन्ही हातांच्या बोटांनी तिथे स्पर्श करुन ती बोटे छातीला,गालाला लावतात.
आजीबाई एकीकडे तोंडाने काही स्तोत्र पुटपुटत होत्या. त्या ठिकाणी आल्यावर मात्र त्यानी क्षणभर बोलणे थांबवुन नमस्काराचे हात सोडुन ते वर करु भिंतिला लावले [जणु पलिकडल्या देवाला प्रेमाने जवळ घेतले] आणि चक्क एखाद्या लहान मुलाचा निरागसपणे मुका घ्यावा तसा त्या भिंतीचा मुका घेतला अन आपला गाल त्या भिंतीवर क्षणभर टेकवला.आणि ते पाहुन मी थरारलो.

त्यांची ती कृतिच इतकी गोड होती कि मला क्षणभर वाटले कि नातवासारखा बाल विठ्ठल त्यांच्या कुशीत आहे. त्याची आजी त्याचा अतिशय मायेने त्याचा मुका घेते आहे. दिवसभर कुठे क़ुठे गेला होतास..संध्याकाळचं घरी यावं, उगाच इकडे तिकडे फिरत बसु नये...असे अनेकदा सांगुन आज मात्र ते सर्व ऐकुन संध्याकाळचा घरी आलेला आपला नातु भेटावा त्या ओढीने त्यानी त्याचा मुका घेतला.

त्या क्षणापुरतं त्यानी बोलणं पण थांबवलं होतं.1-2 मिनिटात हे सर्व झाले असेल.पण मी मात्र त्या विठ्ठलाशी समरस झालेल्या आजीला पाहुन स्तिमित झालो.

किती अवघड गोष्ट आहे असा भाव देवाप्रत असणे..देव इतका आपला मानुन...मानुन नव्हेच तर आपलाच आहे या जाणिवेतुन त्याच्याशी इतके निर्व्याज समरस होता येणे...Total submission. आजीबाईनी खरच मला एका क्षणात सगुण आणि निर्गुण दर्शन दिले. तो [म्हणजे कोणितरी दूर असलेला] देव आणि मी त्याचा भक्त..देवळात येतो तेव्हा होते त्याची भेट..बाकि इतर वेळी तो त्याच्या कामात मी माझ्या. त्या देवाला आजीने आपलासा केला एका क्षणात. कदाचित त्यावेळी तिच्या समोर त्याची सगुण मुर्ति असेलही आणि निरलस प्रेमाचा तिच्या मनातला भक्तिचा झरा हे त्याचेच निर्गुण रुप असेल.

असतिल की त्यानाही काही व्यथा, दु:ख काळज्या..पण त्या क्षणी फक्त त्या माऊलीची माऊली होत्या. भक्ताच्या भावातला भगवंताचा क्षणभराचा भास मन मोहुन गेला. इथे खरं दर्शन झालं होतं मला. अन प्रत्यक्ष देव दिसुनही त्याच्या लेकरातली मायेची छ्टा मनावर अजुन तशीच रेंगाळत होती.

कळायला लागल्या पासुन देवळात जातोय,जसे संस्कार आहेत तसे त्याचे दर्शन घेतोय, जसा तो कळायला हवा तसा तो कसा कळेल याचे कधि विद्न्यान तर कधि भक्ति या द्वन्द्वात उत्तर शोधतोय.
पण आजीबाईनी त्या देवळात प्रदक्षिणा घालता घालता देवाच्या ‘मागे’ उभे राहुन जे दर्शन दिलय त्याने मी अवाक झालो.

नंतर मी विचार करु लागलो.कि हा प्रसंग असा सरळ आपल्या ह्रुदयाला का भिडावा. अध्यात्म अवघड खरच पण आपल्या परंपरेने जे आपल्याला दिलय ते अलौकिक आहे.अनेक प्रकारच्या साधना, अनेक मार्ग,पंथ. सर्व गोष्टिंचे वैचारिक स्वातंत्र्य देखिल.माना त्याला किवा नका मानु. पण तरीही साध्याच्या प्रेमात पडावे कि साधनेच्या....देव खरच असतो का, असेल तर जाणवतो का..कोणत्याही प्रकारचा किंतु मनी न येता फक्त त्याला आपला समजुन त्याच्याशी वागावे इतका साधा सोपा परमार्थ आज कृतित दिसला होता. नामदेव तुपाची वाटी घेऊन धावले होते माझ्याच मातीत,मुगल बादशहाला ही ज्याने मोहरा ओतताना दर्शन दिले माझ्याच मातीत...अशा अनेक प्रसंगांची नोंद आहे.मग आजच असे का वाटले..

जस जसा खोल उतरत गेलो तसे उत्तर सापडले. माझे माझ्या मातीशी असलेले नाते तुटले आहे. माझ्या इतिहासाबद्दल,अध्यात्मिक परंपरेबद्दल दुसरा कोण घेणार नाही इतक्या शंका मी घेतो आणि त्याला विद्न्यानाशी का कोण जाणे तोलत बसतो.
त्यामुळे असं आता कुणी असं देवावर प्रेम करेल हि शक्यताच बहुधा माझ्या मनाने गृहित धरली नव्ह्ती. सुदैव इतकंच की हा प्रसंग घडताना तो टिपण्याची बुद्धी [कि संवेदना] मला झाली.

एका भक्ताने आज निरलसपणे मला देवाच्या अस्तित्वाची जाणिव करुन दिली. खरच देव पाठिशी असावा असे आपल्याला नेहमीच वाटते..पण असा भक्त पाठिशी असावा असे मात्र देवाने ठरवुनच टाकले असावे. आजी, माहित नाही तुम्हि किती शिकलात ते, माहित नाही कुठे रहाता ते. फक्त एकच आज जाणतो तुम्ही देवाच्या घेतलेल्या मुक्याने माझ्या जाणिवा मात्र बोलक्या केल्यात. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो.




1 comment: