Saturday, May 1, 2021

Anubhav Siddha



अनुभव-सिद्ध

2008 मधे मी कामासाठी सोलापुरला गेलो होतो. दिवसभराचे काम झाल्यावर, पायी हॉटेलवर जाता जाता डावीकडे एक तटबंदी दिसली. उत्सुकतेने मी त्या दिशेने जाणारी गल्ली पकडली आणि पुढे गेलो. पुढे पायवाट लागली. तेव्हाच त्या भागातले दिवे गेल्याचेदेखिल कळले नाही. कारण थोडासा तरी तेव्हा उजेड होता. कंटाळुन विटलेला सुर्य कलला असे नुसते वाटले.6-6.30 चा सुमार एका छोट्या गल्लीतुन निघालेली वाट मला तिथे घेऊन गेली. जेमतेम 5- 7 मिनिटे चालल्यावर लक्षात आलं की अंगावर थेंब पडतायत. बहुतेक सुर्याला उन्हाने घाम आला असेल इतकी गरम हवा अजुनही होती. मी थांबलो एका कुंपणापाश. तिथुन खाली उतरायला घाट होता. मी उतरलो अंधाराने बराच भाग काबीज केला होता. अंधारातच दिसलेल्या पाटीने सांगितले की मी सिद्धिविनायक मंदिरापाशी उभा आहे. काय करुया ? असेच पुढे जाउ या की माघारी फिरुया.. शेवटी त्या वातावरणाच्या प्रेमात पडल्यामुळे पुढे जाण्याचे ठरवले. आणि निघालो. ही वाट समोरच्या तलावाच्या काठाकाठाने जातेय इतकाच मी अंदाज केला. एका ठिकाणी वाट उतरली आणि छान उतरत जाणार्‍या पायर्‍या लागल्या..काठाशी गणेश मंदिर..आत चार डोकी आणि वरुन पडणारा पाऊस फक्त बोलतोय. आणि समोर अथांग असा सिद्धेश्वराचा तलाव. थोड्या गार वार्‍याच्या झुळुका जाणवु लागल्यात. तलावाभोवती झाडांनी अंधाराची तटबंदी उभी केली आहे. गुढ.. अतिशय आनंदमय वातावरण.

पाऊस कधी थांबणार.. माहित नाही. इथुन कधी निघणार ...माहित नाही. हा आनंद किती वेळ? जाऊ दे.. विचार कशाला करायचा. Just enjoy. बाजुला एका मोठ्या झाडाच्या बुंध्याशी एक शिवलिंग होतं.ते पण माझ्या सोबत हे क्षण enjoy करत बसलं होतं न जाणो किती वर्षांपासुन.

पाऊस थोडा कमी झाल्यावर मी पुढे निघालो. गजाननाच्या दर्शनाने “शरणमात्र” झालेलं मन अवचित सावध झालं.डावीकडे तलावाकाठचे कुंपण आणि उजवीकडे एक भग्न विशाल तटबंदी यामधुन जाणारी वाट. नवे शहर नवे लोक त्यात काहीही माहिती नसताना केवळ अंदाजाने कुतुहलापोटी चाललेली वाटचाल. अंधार वाढला.  अंधारात पुढे जावे का या वाटेने की मागे फिरावे? तितक्यात कुणीतरी समोरुन येताना दिसले. देवच पावला. त्याला थांबवुन विचारले की बाबा जाते का ही वाट पुढे... तो म्हणाला हो..निर्धास्त जा. मी तिकडुनच आलोय. आयुष्य पण असंच आहे.. ना वाट ओळखीची ना वाट दाखवणारा.

तसाच पुढे गेलो. तटबंदीच्या सावल्यादेखिल अंधाराने आता गिळल्या होत्या. भग्नावशेषानां इतिहास नसतो असते ते फक्त आपल्यापुरते वर्तमान. काही शे वर्षांपुर्वीही काळाचा असाच कवडसा त्यावरुन फिरला आणि त्या क्षणाचा फक्त इतिहास झाला. खरे तर आधीचा आणि नंतरचा.. दोन्ही वर्तमानच.

वाट संपत नव्हती. इकडुन तिकडे वाकडी पळत, मला नादावत होती.

अचानक टाळ्यांचा आवाज ऐकु आला.समोरुन कुणीतरी येत असल्याची चाहुल लागली पण वळणामुळे कळेना. एक जण आपल्याच नादात टाळ्या वाजवत येत होता आणि त्याच्यामागे त्याची माय.

नादावणारी वाट अखेरीस संपली आणि समोर पाहतो तर सिद्धेश्वर मंदिराकडे जाणार्‍या दरवाजासमोर मी उभा होतो. आत जाऊन दर्शन घेणे ही फक्त एक औपचारीकता होती.

इतक्यात दिवे आले. अचानक तलावात प्रकाशाचे कारंजे तरंगु लागले. त्या दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेले मंदिर आणि माझे मन.  आधीच उल्हसित झालेले मन आता भरुन पावले. “त्याचे” खरे दर्शन तर मला या क्षणीच झाले होते.

भरुन आलेली पावले फक्त सोबत घेऊन मी निघालो.. पुढे आलो. पण “ते” तिथेच आहे..त्या पावसात..त्या वार्‍यात ..त्या नीरवतेत त्या प्रकाशाने उजळलेल्या आकारात आणि सुंदर अंधारातल्या निराकारात. .. कधी भेटलंच तुम्हांला तर एकच करा. माझ्या त्या मनाला परत नका आणु.तिथेच राहु दे ते.

आयुष्यभर मनात साठवुन ठेवावी अशी एक अर्ध्या पाऊण तासाच्या वाटचालीने समृद्ध झालेली संध्याकाळ मला सोलापुरमधल्या वास्तव्याने दिली आहे.   

मुकुंद इंगळे


                                     

2 comments:

  1. मुकुंदा काय अप्रतिम लिहिलयस रे.उत्तम ललित लेखन काय असते रे आणखीन...मी सोलापूरचा आमचं सिद्धेश्वर हे ग्रामदैवत।आज तिथं नेऊन आणलस मला।. लेखातील अनेक ओळी घर करून राहतात वानगीदाखल- *ना वाट ओळखीची ना वाट दाखविणारा* तुझ्या आणि तुझ्या परिवार यांवर सदैव कृपादृष्टी आहे त्या सिद्धरायाची.नंदकिशोर लेले

    ReplyDelete
  2. मुकुंदराव नमस्कार,
    अत्यंत सुंदर लेख. मी सिद्धेश्वरला दोन वेळा गेलो होतो. त्यावेळच्या स्मृती जागृत झाल्या. असेच आपले ललित लेखन वारंवार वाचायला मिळो ही सदिच्छा आणि शुभेच्छा.
    जयंत काळे, पुणे.

    ReplyDelete