Tuesday, May 18, 2021

 

तू ...कोण?

    अजूनही अधूमधून दिसतेस मला तू..अजूनही आपली ओळख नाही 

झालेली...पुढे होईल की नाही देव जाणे.

१९७६..पावसाळा सुरु होत होता. कॉलेज नुकतंच सुरु झालं होत. अजून 

सर्व मुली पाहूनही नव्हत्या झाल्या ..आणि  एका सकाळी तू वर्गात 

आलीस. अगदी फ्रेश तयार झालेला मित्रांचा ग्रुप, तुझा अतिशय फ्रेश,

प्रसन्न चेहरा पाहून खलास झाला. गोरा रंग म्हणजे संगमरवर हे तुला 

पाहताक्षणी पटलं .नितळ चेहरा, धारदार नाक आणि जबरदस्त डोळे..

गुलाबी काड्यांच्या चष्म्यातूनही किंचीतशी हिरवट झाक दाखवणारे.. 

नियमानुसार तुझ्या जाण्यायेण्यावर वेळा ठरू लागल्या. तू ज्या तासाला 

बंक मारायाचीस तेव्हा आम्ही पण बाहेर असायचो. आम्ही म्हणजे 

आणखीही काही जण होते ...आमच्यासारखे पण स्वतंत्र निरिक्षक.. 

आमच्या ग्रूपव्यतिरिक्त .

    आणि एके दिवशी, साधारण महिना दोन महिन्यांनी तू दिसलीस 

त्याच्याबरोबर. कृश म्हणावी अशी शरीरयष्टी..डोळ्यावर येणारे केस ...

तू नेमकं काय पाहिलंस 

त्याच्यात ते तुलाच ठाऊक. तो पण होता आमच्याच वर्गात. मधल्या 

दिवसांनी जादू केली तुम्हा दोघांवर. पण जोडी मस्त जमली. आमच्या 

चडफडण्याचा काहीही उपयोग झाला नाही. एकदा तुमच जमल्यावर 

नावगाव जाणून घेण्याची उत्सुकताच संपली.

मग मात्र तुम्ही दोघे नियमित दिसु लागलात एकमेकांसोबत...एकमेकांत 

गुंतुन गेला होतात कधी पायऱ्यांवर तर कधी लायब्ररी मध्ये, कॉलेजच्या 

स्नेहसमेंलनाच्या कार्यक्रमात ..वर्गात पण असे बसायचात की एकमेकांना 

खाणाखुणा करू शकाल.

    चार वर्षे गेली. पदवी मिळाली आणि पोटार्थी नोकरी पण मिळाली. 

नोकरीसाठी मुबंई गाठली. बाकी पुन्हा कुणी भेटण्याची शक्यता नव्हतीच. 

दहा दिशांना उडून गेलेले पक्षी आपण. काही काळ एकत्र होतो. तेही 

बिनओळखीचे. हे असं खूपदा होतं. त्यात काय.. आता कोण भेटणार परत. 

जे मित्र झाले ते राहणार. तेच तेव्हढे भेटत राहणार. काळाच्या कसोटीवर 

माणसं संबंध घासून घेत असतात. जे राहतात ते बावनकशी समजले तरी 

जातात.

    चार वर्षाचा कॉलेजचा काळ आला आणि अपरिचितासारखा निघून गेला. 

आता खरी जिंदगी सुरु झाली होती. साधारण दीड वर्षाने तुम्ही दोघेही मला 

दिसलात.आणि अधूनमधून शनिवारी रविवारी संध्याकाळी दिसतच राहिलात. 

माझ्या घराच्या थोडं आधी ५ मिनिटे आधी अंतरावर एका इमारतीत तुम्ही 

भाड्याने जागा घेतली होती.   

    एकदा दिसलात असेच आणि लक्षात आल की तुझी चाल मंदावलीय. 

पोटातला भार वाढू लागलाय. आणि तुझ्या चेहऱ्यावर आणखी तेज आले. 

तो तुझी खूप काळजी घेताना दिसायचा. सामान आणताना तुला हाती काही 

घेऊ द्यायचा नाही.माझ्या काही सेकंदाच्या निरिक्षणात इतके लक्षात यायचे तर प्रत्यक्षात तो खूपच काळजी घेत असेल तुझी. नंतर तू गेली असशील माहेरी कारण आता तो 

एकटाच दिसायचा अधून मधून.

    खूप दिवसांनी तू पण दिसलीस आणि परत दिसू लागलात कधी तुम्ही 

दोघे कधी तुम्ही तिघे. नाही म्हटलं तरी थोडास बाळसं तू पण धरलं होतस.

काळ वहावत गेला. सुखी समाधानी संसाराचे साधारण आठवे किवा नववे वर्ष 

असेल कदाचित. आणि अचानक कुणीतरी सांगितले .. बहुधा कामवाल्या बाईने ..

की त्या इमारतीतील  कुणीतरी हृदयविकाराच्या झटक्याने गेले. कोण याचं 

उत्तर ‘तो’ हे अनपेक्षितपणे खूप उशिरा मिळालं. आणि खूप दिवसांनी तू 

दिसलीस. एकटीच. हातात सामानाची पिशवी. गोऱ्या हातावर पिशवीचे बंद 

जिथे काचले होते तिथे लाल चट्टा उठलेला. आणि चेहऱ्यावर उदास भाव, 

सोबती अचानक निघून जाण्याने भांबावलेली, कदाचित हे मलाच जाणवलं 

असेल. तुझ्या डोळ्यात त्याची आठवण मला तेव्हाही दिसत होती.

काळ वहातच होता. तू दिसायचीस अधून मधून, मोठ्या होत जाणाऱ्या 

लेकासोबत. त्याच्यामागे..  सर्व वेदना गिळून, तू छान सांभाळला असावास 

संसार ...शिकवलं असशील लेकाला. सांगितलं असशील त्याला त्याच्या 

स्वप्नांबद्दल. सगळं मनातलं दु:ख गिळून. खूप हिमतीने जगते आहेस तू.

परवा तू अचानक एका दुकानात लेकासोबत दिसलीस आणि हे सगळं  

सिनेमासारखं समोर उभं राहिलं.

    बघता बघता, छिद्र पडलेल्या पिशवीतून अजाणतेपणे सांडावा तसा 

बर्‍याच वर्षांचा काळ सांडत गेला.  काय गंमत आहे ना. जर उद्या 

मी तुला भेटून हे सगळ सांगितलं तर तू खलासच होशील. माणसाचं माणसाशी 

काय असतं नातं ? तुझ्या अख्या आयुष्याच्या वाटचालीचा मी खुप लांबचा 

साक्षीदार आहे असं कसं म्हणणार मी. जिचं नाव गाव माहित नाही, 

ज्याचे नाव गाव माहित नाही ते मला अपरिचित वाटत नाहीत. 

    असं असू शकतं? त्यांचं सुखदु:ख देखील... दु:खाला अंतर नाही ‘अंतर’ 

लागते हेच खरं. पण तू न बोलता खूप शिकवलंस. तुझ्या चेहऱ्यावरचे ठाम 

भाव तुझ्या आयुष्याला सामोरे कसे जावे हेच सांगतात.. डोळ्यात जिद्द तेव्हाही दिसत 

होती.

    माहित नाही आपल्या दोघांच्या जाण्या"आधी हे तुला कळेल का...  

आणि कळले तरी तुझी प्रतिक्रिया काय असेल? अथवा कळण्याची गरज पण नाही.  

पण मला मात्र लक्षात येत नाहीय की आपण ओळखीचे की अनोळखी ...की हे 

अनोळखीपण हाच एक दुवा आहे आपल्यातला,

हँटस आँफ टू यु ....परमेश्वर तुला भरभरून आयुष्य देवो.

कथाकार: मुकुंद इंगळे

 

1 comment:

  1. Khaas jamliy ekdum ..eka व्यक्तीपेक्षा ही एका व्यक्तिमत्त्वावर केलेले निरपेक्ष अबोल प्रेम .जे व्यक्त होण्यासाठीही त्याची कबुली द्यावी लागत नाही असं प्रेम एक सुहृद च करू जाणे. खूपच छान.

    ReplyDelete