पास पास आणि करीब
परवा व्हाट्सअँप वर कुणीतरी हे चित्र पाठवले आणि मला या गाण्याची आठवण झाली .
वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब है
वो कल भी पास-पास थी, वो आज भी करीब है
"द कमाल " कवी गुलजार यांनाच हे सुचू शकते. जीवनावरील खूप सुंदर भाष्य म्हणजे हे गाणे. चित्रपटातल्या कथेला आवश्यक असलेला आशय त्यात आहेच पण तरीही ते गाणे त्या पलीकडे जाऊन मनात ऐकू येत राहते.
आधी ओळख , मग परिचय, मग नाते, मग ओढ मग तगमग, मग सोबत, मग पुढे काय? या सव पायऱ्या यशस्वीपणे पार झाल्यावरही उरणारा मनातला प्रश्न ...इतका काळ मध्ये गेल्यावरही ?
वरच्या कडव्यातली दुसरी ओळ .....
आठवणीतील संध्याकाळ पास पास ..मराठीत आसपास म्हणता येईल आणि दुसरी संध्याकाळ करीब म्हणजे जवळ .
पण पास पास मध्ये फक्त अस्तित्व जाणवण्याएवढी कुणी तरी घेतलेली नोंद आणि करीब ...फक्त जवळ या शब्दाचा अर्थ आपण समजतो त्याच्या अगदी विरुद्ध आहे हे दर्शवणारा. ...जवळ आहे..जोडलेले नाही, अभंग नाही.
मनाच्या दृष्टीने पाहिले तर आपणही अशीच नाती जपत असतो आयुष्यात ...काही पास पास तर काही करीब.
नात्यातले द्वैत अद्वैत बाजूला ठेऊन पाहण्यासाठी नजर तटस्थ असावी लागते. ..त्रयस्थ असावी लागते. कारण त्या नजरेने पाहिल्यावरच नाते पास पास पुरते कि करीब ते ठरेल.
वरचा चंद्र शुक्राच्या युतीचा फोटो पहा. चंद्र कुठे, शुक्र कुठे... पण पृथ्वीवरून माणूस नुसत्या त्याच्या नजरेला, त्यांच्यातले अंतर कमी झाल्याच्या भासामुळे त्याला "युती" असे संबोधतोय. ना ते पास पास ना ते करीब . पण चंद्रावरचा माणूस म्हणेल कि पृथ्वी आणि शुक्राची युती झालीय. शुक्रवारच्याला तर चंद्र दिसणारच नाही इतका तो दूर असेल.
नाते दृष्टिसापेक्ष भासते पण मनातून जोडलेले असते तेव्हा पास पास असणे अथवा करीब असणे याने फरक पडत नाही.
याच नजरेचा संदर्भ पुढच्या ओळींमध्ये येतो.
झुकी हुई निगाह में कहीं मेरा ख़याल था
दबी-दबी हँसी में इक हसीन सा गुलाल था
मैं सोचता था मेरा नाम गुनगुना रही है वो
मैं सोचता था मेरा नाम गुनगुना रही है वो
न जाने क्यों लगा मुझे, के मुस्कुरा रही है वो
मेरा ख़याल है अभी झुकी हुई निगाह में
खिली हुई हँसी भी है, दबी हुई सी चाह में
मैं जानता हूँ मेरा नाम गुनगुना रही है वो
मैं जानता हूँ मेरा नाम गुनगुना रही है वो
यही ख़याल है मुझे, के साथ आ रही है वो
झुकलेल्या नजरेत माझी आठवण असेल असा अंदाज आणि त्यामुळे ओठावर तरळलेले हसू पण पुढच्या कडव्यात अंदाजाचे खात्रीत झालेले रुपांतर..आणि हसण्यामागे असलेल्या सुप्त आवेगाची जाणीव.
आधी फक्त तिच्या विचारात, मनात असलेले माझे अस्तित्व आणि मग तिच्या जाणिवेत "अंतरीची खुण" पटल्यावर दिसणारे माझे अस्तित्व
म्हणून पहिल्या कडव्यात ती हसल्या सारखी वाटतेय पण नंतर ती सोबतहि येतेय ही पूर्तता.
पास पास कडून करीब आणि नंतर एकरूप होण्याचा प्रवास सुरु.
संध्याकाळ, पास पास आणि करीब याची जाणीव, नजर आणि हास्य ..आणि याचाच विचार करणारे माझे मन...इतकी रूपके घेऊन गाणे थेट मनात आत खोल उतरते.
आणि शब्दांना अर्थाने दिलेले सामर्थ्य पाहून आपण नतमस्तक होतो. ..अवाक होतो.
म्हणून आपण चंद्र शुक्र "जवळ " आलेले दिसले कि युती म्हणून आकाशातल्या त्या दृश्याकडे पाहायचे. .. आणि म्हणायचे...
वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब है
नात्याला जोपासायला नजर लागते अन्यथा नात्याला नजर लागेल.
छान संवेदनशील लिहिलंय. गुलजारजींच्या काव्याला वेगळ्या नजरेतून बघता आलं. सुरेख! 👌
ReplyDelete