बेंच मार्क
अतिशय सुंदर नयनरम्य ठिकाणी मी एकटाच आहे ...विशाल पसरलेल्या अनंत आकाशाच्या एका विस्तीर्ण अवकाशाखाली..शुभ्र मेघाच्छादित.समोर दिसत आहेत निश्चल भासणारी पर्वतांची एक रांग...हिरवळीने भारून गेलेली. मधे मधे पायवाटांची मेंदी की टॅटू अंगावर गोंदलेली.
आणि हे सर्व मी रोज पाहतो...अनुभवतो...सर्व ऋतू..कडाक्याची थंडी, रणरणते ऊन, सुस्वर वारा,सुखद झुळुका किंवा वादळी पाऊस.. अनिर्बंधपणे.
पायथ्याशी असणाऱ्या या रिसॉर्ट मधे नेहमी पर्यटक येतात...काही येतात जवळ आणि काही क्षण मी ही रमतो त्यांच्या सोबत.माझ्यासोबतचे गोठलेले काही क्षण मी त्यांना भेट म्हणून देतो..
या रम्य दृश्याला आकार येतो तो पर्यटकांच्या डोळ्यात...डोळ्यातून मनात साकार होते तो क्षण.तो क्षण मी त्यांना भेट देतो.ते खूष होतात.
ज्या दिवशी पर्यटक नसतील त्या दिवशी अस्तित्वच उरत नाही..कशाचच.
इथे आलो कधी...कुणी आणलं..आठवत नाही आता.रमून गेलो बघता बघता ...दुरून हे सुंदर दृश्य डोळे भरून पाहता पाहता त्याचाच एक भाग होऊन गेलो.
आज तुम्ही आलात..माझाही या देखण्या देखाव्यासोबत फोटो काढलात..त्याबद्दल धन्यवाद.
मी दिलेली भेट घेतली ना सोबत?
ऊन, वारा,पाऊस झेलत अजून किती काळ जाणार..ठाऊक नाही.त्यामुळे चिंता नाही.
आपण ही असेच आयुष्याचे सुंदर दृश्य पाहायला आलेलो पर्यटक आहोत...पाहता पाहता त्याचा भाग होऊन गेलो आहोत..सुख दू:खाचे ऊन्हा पावसाचे अनुभव घेत घेत... हळू हळू, या लाकडी अर्ध्या ओंडक्यासारखे...तटस्थतेकडे प्रवास करणारे.
तटस्थता हाच एक 'बेंच'मार्क आहे.
लेखन:मुकुंद इंगळे
👍
ReplyDelete