Wednesday, January 10, 2024

जिंदगी इक सफर है सुहाना..

चित्र वेध

जिंदगी इक सफर है सुहाना...!

एका कारमधे बसून प्रवास सुरू आहे.कार  आपणच चालवत आहोत.डावीकडे,उजवीकडे दाराच्या बाहेरच्या बाजूला आरसे आहेत आणि एक आरसा आतमधे मधोमध बसवलेला आहे..ज्यात मागे असणारी वाहने दिसतात. खिडकीबाहेरच्या डावीकडील आरशात कोण  ओव्हरटेक करून पुढे जाणारे वाहन दिसते..तसेच ते उजवीकडच्या आरशात देखील दिसते.मागे वहान नसेल तेव्हा आरशात रिकामा रस्ता,मागे जाणारी माणसे,झाडे इत्यादी दिसत राहते.

या सर्वात आपण कोणत्या लेन मधे आहोत ते महत्वाचे..तारुण्याची लेन पहिली.सुसाट वेगाने जाणाऱ्यांसाठी...दुसरी मध्यमवयीन..कार्यरत पण वेग जरा कमी.तिसरी आरामात,कोणतीही घाई नाही अशा वरिष्ठांची..

पहिल्या लेन मधे आहेत त्यांना उजवीकडील आरशात इतर वाहन दिसत नाही...फक्त डाव्या आरशात ओव्हरटेक करून पुढे जाणारी वाहने...त्यांचे दोनच पर्याय..त्यां वाहनांना पुढे जाऊ देणे किंवा आपला वेग वाढवणे.

दुसऱ्या लेनमधील वाहनाच्या चालकाला दोन्ही आरशांवर  लक्ष ठेवून असावे लागते.

म्हणून त्यांना वेग पहिल्या लेन मधील वाहनांपेक्षा थोडा कमी असतो.

तिसऱ्या लेन मधील चालकाला डावीकडे कुठलेच वाहन दिसत नाही...ओव्हरटेकचा प्रश्नच नाही.उजवीकडून जाणारी वाहने धीम्या गतीने जात असतात...पहिली लेन दूर राहिलेली असते.

प्रवास सुरू असताना निवांतपणे गाणी ऐकता येतात,गप्पा मारता येतात.डावीकडे असल्याने कधीही वाहन थांबवता येते...बाहेर पडून कितीही वेळ निसर्गाचा,एखाद्या दृश्याचा,वातावरणाचा,निवांततेचा अनुभव घेता येतो.

उजव्या आरशातून गतकालाची आपलीच प्रारुपे चालक पाहू शकतो ..ते पाहून ठरवू शकतो की ही जीवनाची सफर कशी आहे?

Suffer की सफर की सुहाना सफर.

उजवीकडचा आरसा भूतकाळ दाखवतो..मधला वर्तमानातील नुकत्याच होऊन गेलेल्या गोष्टी प्रतिबिंबित करतो.डावीकडचा आरसा बघायच्या,करायच्या राहून गेलेल्या गोष्टी करून पाहण्याची प्रेरणा देत राहतो.

आपण गाडी या साऱ्याचा आनंद आस्वाद घेत मस्त मुडमधे चालवत राहतो.

लेखन:मुकुंद इंगळे


No comments:

Post a Comment