चित्र वेध
अंतर्यामी अंतर्रामी
हा विशाल अखंड भारत आहे..जिथे अयोध्या आहे. अयोध्या...म्हणजे जिथे युद्ध होऊ शकत नाही अशी जागा..जिथे नेहमी रामराज्यच वसते.अयोध्या हे नाव इतके विचार प्रवर्तक आहे...तशीच एक अयोध्या माझ्या मनात आहे.जिथे मला कुणासोबत संघर्ष दिसत नाही.सर्व काही छान.. कारण इतक्या पराकोटीचे मतभेदच नाहीत.
पण तरी या माझ्या सात्विक अयोध्येवर पिसाटलेल्या विचारांचे रोज आक्रमण होते.माझी अस्मितारुपी सीता रोज पळवली जाते.
तिला सोडवण्यासाठी रोज मी राम होतो.रोज वनवास भोगतो...
हे माझ्या मनातील श्रीलंका बेट आहे.चहूबाजूंनी पाणी...एकीकडे असत्याचा महासागर,दुसरीकडे सत्याचा उपसागर...
मी रावण इथला राजा. उच्चविद्याविभूषित..सतत रूपे बदलू शकणार मायावी..हुशार...पण मोहाच्या मोहात पडलेला.त्यामुळे सतत संघर्ष.अशाच मोहापायी मी एका सितेला,लालसेला पळवून आणले आणि शोकवनात ठेवले.तो येण्यापूर्वी ते अशोकवन होते.
मी राम..इच्छाशक्तीचा हनुमान आणि सात्विक विचारांची वानरसेना सोबत घेऊन मी निघालो.पुरुषार्थाचे न बुडणारे दगड वापरून साहसाचा सेतू बांधला आणि लंकेवर आक्रमण केले आणि सीतेला सोडवून आणले. रावणासाठी जी लालसा होती..ती माझ्यासाठी माझी अस्मिता होती.
भारतावर अनेक आक्रमणे झाली...ती करणाऱ्यांकडे ' अविचार ' होता...म्हणून त्यांनी विचारांची मंदिरे फोडली.
भारताने एक आक्रमण केले ते अविचाराचे उच्चाटन करण्यासाठी.
५०००वर्षांपूर्वी राम करू शकला ते ५००वर्षांपूर्वी झाले नाही...मंदिराची तोडफोड करून अस्मितेची सीता आक्रमण करणाऱ्यांनी पळवून नेली होती तरीदेखील...
कारण माझ्यात 'राम ' राहिला नव्हता.
पण आज अस्मितेची पुनर्स्थापना होते आहे...प्रत्यक्ष,खऱ्या अयोध्येत,देखण्या मंदिरात आणि माझ्या अंतरातील,भक्तीने तेवत असलेल्या जाणिवांच्या पणत्यांनी सजवलेल्या मनाच्या गाभाऱ्यात राम लल्ला शोभून
दिसतो आहे.
लेखन:मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment