Friday, January 5, 2024

"परी "स्थिती

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

"परी "स्थिती

आपल्या आठवणींच्या एकेक पायऱ्या उतरत इतक्या घाईघाईने मी कुठे निघाले आहे..माझे मलाच ठाऊक नाही. पायऱ्या उतरत उतरत माझ्या रंगीत फ्रॉकने व्यापलेल्या, पसरलेल्या मखमली कपड्याने प्रत्येक पायरीला, काही क्षण तरी झाकोळले आहे...ज्यावर आपणही एके काळी रेंगाळत असू.जसजशी मी दूर चालले आहे तसा माझ्या फ्रॉकचा रंगदेखील अलिप्त निळसर होऊ लागलाय आता. मगाशी नकळत मागे वळून वर पाहिले...राजवाडा आता अंधुकसा उरलाय नजरे मध्ये....गंमत म्हणजे तिथे अजूनही प्रकाश आहे पसरलेला.

प्रत्येकाच्या आयुष्यात एक 'समय परी' मनात सतत सोबत असते.बाल्य,तारुण्य,वृद्धत्व या तीन पायऱ्यांच्या टप्प्यांना विलग करणाऱ्या काळाच्या सपाट सोप्यावर, त्या परी सोबत घालवलेल्या क्षणांच्या,आठवणींचे सोपान हळूहळू तयार होत जातात.पण जगण्याच्या धामधुमीत मनातल्या त्या परीचा हात  परिस्थितीमुळे कधी निसटतो,सुटतो कळतच नाही..त्या बेसावध क्षणी जगण्याचा भास संपतो.स्वप्नांचा राजवाडा धूसर होत जातो आणि त्या परीचा

एका पायरीवर, उतरताना पायातून तिने मुद्दाम काढलेला की निघालेला,राहिलेला ...सल आणि समाधान यापैकी एक समाधानाचा बुट.. या साऱ्याची साक्ष म्हणून आपली टोकदार टाच उंच करून तिथूनच आपल्याकडे पहात रहातो.

लेखन:मुकुंद इंगळे


No comments:

Post a Comment