Tuesday, January 30, 2024

आर्द्र का(त)ळ

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

आर्द्र का(त)ळ 

हा अवशेष नाही..तर एका चिरंजीव किल्ल्याचा भाग आहे. 

पाहिलं तर एक,त्या काळी चौकोनी आकार दिला गेलेला एक खळगा..कदाचित खाली झरा असावा किंवा पावसाचे वहात येणारे पाणी जवळच्या टाक्यात वहात जाईल तेव्हा हा चौकोन देखील पाण्याने भरून जाईल अशी रचना...रचनाकाराची कमाल. असंख्य पावसाळे नुसते पाहिले नसतील..तर अंगावर झेलले असतील. विजांचे कडकडाट,रात्रंदिवस कोसळणारा पाऊस,कडाक्याची थंडी आणि आग ओकणारे उन या कातळाने सहन केले असेल.आणि या साऱ्या निसर्गाच्या खेळात आपल्यातला ओलावा खळगाभर कायम जपला असेल...अजून जपतोय.जुना झाला, राकट असला तरी शेवाळे बिलगून असते ..आजूबाजूच्या फटीतून इवलेसे गवत उगवते कधी कधी.

प्रत्येकाच्या मनात एक असाच किल्ला बांधला जात असतो.रचनाकार असतो वहात जाणारा काळ..जो वाहता वाहता तो एखादा ओलाव्याने भरून जाणारा खळगा कोरून ठेवतोच.

किल्ला कधी म्हातारा होत नाही...तो चिरंजीव असतो.

लेखन: मुकुंद इंगळे


No comments:

Post a Comment