चित्र वेध (चित्र सौजन्य: अनामिक)
क्लाउड शेअरिंग
आभाळाचे मन कधी कधी दाटून येत असेल का?आनंदाने अथवा दुःखाने? ते आपल्या भावना कुणाशी, कसे शेअर करत असेल..की ढगांनी भरून आलेले आभाळ त्यांना सांगत असेल आपली कहाणी आणि मग ढगांचे अश्रू पाऊस म्हणून पडत असतील.
कधी आभाळ आनंदाने वाऱ्याशी हितगुज करत असेल..आणि ते ऐकून वारा हसत हसत सैरावैरा धावत असेल…आपण म्हणत असू की वादळ आलंय.
की कधी नुसतंच आभाळ आणि वारा जुनी गाणी ऐकण्यात रमलेले असतील आणि वारा त्या लयीत डोलत असेल..आपण म्हणत असू की आज किती सुंदर गारवा आहे हवेत.हलकासा वारा मस्त वाहतोय .
कधी कधी आभाळ मेघांना बोरकरांची,पाडगावकरांची कविता ऐकवत असेल...मेघांच्या अंगावर रोमांच उभे रहात असतील..आपण म्हणत असू की फुलांवर,पानांवर पडलेलं दव किती सुंदर दिसतेय.
कधी भरून आलेल्या आल्हाददायक वातावरणात आभाळाला क्षितिजाची खूप तीव्रतेने आठवण येत असेल..तेव्हा आठवणींचे इंद्रधनूष्य त्याच्या शुभ्र अंगावर सप्तरंगात उमटत असेल...
कधी कधी आभाळ निरभ्र होऊन त्याचे आकाश झालेले असताना…क्षितिजाला कवेत घेऊन चांदण्यात निवांत बसलेले दिसेल.
लेखन : मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment