Saturday, January 6, 2024

मेरी आवाज ही पहचान है

मेरी आवाज ही पहचान है 

घरी मॅच पहात बसलो होतो.टीव्ही चा आवाज घरातला होताच आणि बाहेरून देखील काही आवाज येत होते. अचानक कुठला तरी आवाज बंद झाल्याचे जाणवले. एसी बंद झाला होता कुणाचा तरी.

तो आवाज बंद झाल्यावरच कळला.असाच अनुभव बस प्रवासात,विमानतळ इत्यादी ठिकाणी पण येतो.गंमत हीच की, तो बंद झाल्याशिवाय आपल्या लक्षात येत नाही.

चहूबाजूंनी येत असलेले... बाहेरचे आतले...सगळेच आवाज आपण कानांनी ऐकत नसतो. मात्र सगळे आवाज कानावर पडत असले तरी आपण मात्र निवडकपणे "आतून" ऐकत असतो. आपण अंतरावरून येणारे आणि अंतरातून येणारे...आवाज,

त्याकडे दुर्लक्ष केलं, तरी ते सुरूच रहातात.. फक्त त्यांचं जाणवणे थांबते.

काही आवाजांचे थांबणे मात्र जगणे आमूलाग्र बदलून टाकते,मुश्किल करते. आईवडिलांचे जाणे,आवडत्या व्यक्तीचे जाणे किंवा आयुष्यात न येताच आयुष्यातून दूर होणे...गुरुजनांचे शिकवणे...यासोबत स्वतः चा आवाजच विनाकारण एखाद्याला नकळत दुखावून जातो..सहेतुक अथवा अहेतुक...

हे आणि असे सगळे आवाज आतून ऐकावे लागतात. यांचे अवेळी,अचानक थांबणे स्विकारणे जड जाते.

काही आवाज उत्साह देतात...जरी ते फार लक्षपूर्वक ऐकत नसतो आपण.वाहणारा झरा,ओढा, वारा...गाण्यांचे अथवा सिनेमातील सीन्ससाठी दिलेले पार्श्वसंगीत..जंगलात फिरताना ऐकू येणारे आवाज. चंद्रप्रकाशात समुद्रकाठी रात्री फिरताना जाणवणारी हलकी गाज...किंवा एखादा गहाण वाटणारी आयुष्यातील समस्या मनाला सतावत असताना चौपाटीवर जाऊन नुसतं काही वेळ बसल्यावर..त्या समस्येची अनेक उत्तरे सुचतात, तेव्हाचा भरतीचा आवाज...

अशा वेळी आवाज थांबून चालत नाही.

आशा,लता,रफी,मुकेश, सुमन,महेंद्र कपूर, मन्ना डे,हेमंत कुमार,किशोर अशा सर्व  दिग्गज गायकांचे आवाज ऐकू येणे ,जाणवणे थांबले तर खुशाल समजा की तुमचे श्वास थांबले असतील म्हणून.

ऐकू येणाऱ्या आवाजांपेक्षा असे अचानक थांबल्यावर जाणवणारे आवाज जास्त व्याकूळ करतात आपल्याला.

लेखन:मुकुंद इंगळे


No comments:

Post a Comment